संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (तथा अण्णा) यांची जन्मशताब्दी १२ जानेवारी रोजी सुरू होत आहे. हिंदी चित्रपट संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द झळाळती राहिली आहे. गायक म्हणूनही त्यांनी सुमारे पस्तीसेक गाणी गायिली आहेत. त्यांची हिंदी गाणी रसिकांना माहीत आहेत, परंतु अन्य गैरफिल्मी गाणी मात्र काहीशी विस्मरणात गेली आहेत. जन्मशताब्दी वर्षांरंभानिमित्त त्यांच्या या वेगळ्या पैलूचे  पुन:स्मरण..

रामचंद्र नरहर चितळकर (जन्म : १२ जानेवारी १९१८) म्हणजेच संगीतकार सी. रामचंद्र (आणि जवळच्यांचे अण्णा) यांची जन्मशताब्दी १२ जानेवारी २०१७ रोजी सुरू होत आहे. संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली. १९४२ ते १९७२ अशा तीसेक वर्षांच्या कारकीर्दीत १२० हिंदी, सात मराठी, पाच तामिळ, तीन तेलुगु आणि एका भोजपुरी बोलपटात त्यांनी आठशेहून अधिक गाणी संगीतबद्ध केली. त्यात ३५ हून अधिक गाणी त्यांनी स्वत: गायली आहेत. हिंदी बोलपटांतली त्यांची सगळी गाणी कानसेनांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. त्यांचा तपशील सिनेसंगीताचे अभ्यासक विश्वास नेरूरकर यांनी टंकलिखित करून ठेवला आहे. मात्र, ‘गायक सी. रामचंद्र’ हा त्यांचा परिचय काहीसा विस्मरणात गेला असल्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांरंभानिमित्त गायक म्हणून त्यांनी गायलेल्या काही गाण्यांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न..

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत

‘माझ्या जीवनाची सरगम’ या आत्मकथनात आणि ‘बी. बी. सी. टी. व्ही.’वरच्या मुलाखतीत ‘मी नायक बनण्यासाठीच सिनेमात आलो होतो..’ असं अण्णा म्हणाले आहेत. ही हौस १९३५ च्या ‘नागानंद’ आणि १९६६ च्या ‘धनंजय’ या मराठी बोलपटांतून नायकाची भूमिका साकारून त्यांनी फेडून घेतली. या बोलपटांतून त्यांनी अभिनय केला आणि गाणीही गायिली. ‘नागानंद’चं संगीत वामनराव सडोलीकर यांचं. त्यात सी. रामचंद्र एकल गाणं गायले आणि आझमबाई यांच्याबरोबर युगलगीतही गायले. दुर्दैवानं हा बोलपट मध्यंतरापर्यंतच चालला व प्रेक्षक उठून गेल्यानं थिएटरातनं काढून घेण्यात आला. अण्णांना तो काही कधी पुन्हा पाहता आला नाही. पण दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या फिल्म अर्काइव्हमध्ये मला अनपेक्षितपणे तो पाहायला मिळाला. भीमपलास व बागेश्री या अण्णांच्या आवडत्या रागांतली गाणी त्यात ऐकायला मिळाली. पुढं ‘धनंजय’ व ‘एक दोन तीन’मध्ये महेंद्र कपूरसह, तर ‘धर्मपत्नी’मध्ये सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर त्यांची गाणी आहेत. त्यांच्याच संगीतातल्या ‘घरकुल’ व ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या मराठी बोलपटांतही ते गायले आहेत. त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळातला व पन्नाशी उलटून गेल्यावरचा त्यांचा हा आवाज आहे.

१९३८ च्या सुमारास संगीतकार नौशाद (अली) यांच्या पुढाकारानं मुंबईत रेनबो नावाच्या रेकॉर्ड कंपनीची सुरुवात झाली. काही वर्षांतच ती बंद पडली. पण तिथं सी. रामचंद्र यांची दोन मराठी गाणी ‘मास्टर राम चितळकर’ या नावानं ध्वनिमुद्रित झाली आहेत. शब्द आहेत- ‘प्रभुवर नटविशी’ आणि ‘श्यामा घेऊनी मुरली मनोहर’! लेबलवर संगीतकार म्हणून सदाशिव नेवरेकरांचं नाव आहे. आज ही दोन गाणी फक्त संग्राहकांकडंच उपलब्ध आहेत. त्यात विशीतल्या अण्णांचा आवाज खणखणीत, पण शिकाऊ विद्यार्थ्यांचा वाटतो. लेबलवरचं नाव तसं परिचयाचं नसल्यानं ज्येष्ठ ध्वनिमुद्रिका संग्राहक प्रभाकर दातार यांना ती रेकॉर्ड मुंबईच्या चोरबाजारात आठ आण्यांना मिळाली. विशेष म्हणजे अण्णांनी दातारांच्या कुर्ला येथील घरी जाऊन ती एकदा ऐकली होती अशी आठवण आहे.

१९७० च्या सुमारास ७८ गतीच्या ध्वनिमुद्रिका बंद होत आल्या होत्या. पण त्याच वेळी अण्णांनी अनेक गैरफिल्मी गाणी मुद्रित करून ठेवली होती. १९६४ च्या सुमारास काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचं गाणं त्यांनी मुद्रित केलं होतं. त्याचे शब्द आहेत- ‘ध्यानी धर रं मुला, ध्यानी धर गं मुली, बैलजोडीच्या चित्राम्होरं करा मताची फुली..’ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, दादर यांनी बनवून वितरित केलेली ही अत्यंत दुर्मीळ ध्वनिमुद्रिका मुलुंडच्या भावे या संग्राहकांना अशीच चोरबाजारात सापडली. सफेद लेबलवर गायक व संगीतकार म्हणून सी. रामचंद्र असं लिहिलं आहे. कवीचं नाव नाही, पण ग. दि. माडगूळकरांची ही रचना असण्याची शक्यता आहे. १९६६ मध्ये राम गुलाम यांच्या रचनेतला ‘श्रीसाईबाबा पोवाडा’ अण्णांनी ७८ गतीच्या रेकॉर्डवर दोन भागांत मुद्रित केला. हा पोवाडा खास ऐकावा असाच आहे. ते स्वत: साईभक्त होते. १९६८ साली ‘श्रीसाई दरबार’ ही लाँग प्लेइंग रेकॉर्ड निघाली. त्यात हिंदी व मराठी गाणी आहेत. १९९९ साली त्याची सी. डी.पण ‘श्रद्धा-सबुरी’ या नावानं वितरित झाली. त्यात अण्णांच्या आवाजातली दोन गाणी आहेत. ‘गीत गोपाल’ हा कृष्णकथेवरचा कार्यक्रम अण्णा करीत असत. ग. दि. माडगूळकरांच्याच रचना, पण रामकथेच्या ‘गीत रामायणा’एवढी लोकप्रियता काही या गाण्यांना मिळाली नाही. त्याचं संगीत व बरंचसं गाणं अण्णांचंच होतं. तो सगळा ठेवा आता दोन सी. डी.मध्ये उपलब्ध आहे.

१९६५ ते १९७५ च्या काळात संत ज्ञानदेव, संत तुकाराम, मीराबाई, मिर्झा गालिब यांच्या तसेच मराठीतल्या नामवंत कवींच्या रचनांना चाली लावून अनेक गाणी दिग्गजांनी केली व ती लोकप्रियही झाली. या क्षेत्रात मीरा आणि गालिब वगळता इतर प्रयोग अण्णांनीसुद्धा केले. ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ बोलपटातली गाणी व त्यांच्या आवाजातलं पसायदान अप्रतिमच आहे. १९७९ साली तुकारामांच्या सात रचना ‘इनरिको’ कंपनीच्या रेकॉर्डवर वितरित झाल्या. त्या ध्वनिमुद्रिकेच्या वेष्टनावर मधोमध कटेवरी कर ठेवलेल्या पांडुरंगाची मूर्ती आहे, तर खालच्या बाजूला टाय लावलेला अण्णांचा फोटो आहे. १९७२ साली त्यांनी दोन बालगीतांच्या रेकॉर्ड केल्या. पैकी एकीत त्यांनी गायिलेली चार गाणी आहेत. ‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’, ‘कोल्ह्यची फजिती’, ‘सिंह आणि उंदीर’ व ‘बेडूक आणि बैल’ या गोष्टी त्या गाण्यांत आल्या आहेत. ही गाणी शांताराम नांदगावकरांची आहेत. दुसरी रेकॉर्ड बालगायिका सुषमा श्रेष्ठनं गायिलेल्या गाण्यांची असून त्यात शांता शेळके यांची चार गाणी आहेत. ‘आई बघ ना कसा हा दादा’ व ‘मारू बेडूक उडी’ ही गाणी अजूनही कधीतरी ऐकायला मिळतात. १९७५ मध्ये दोन हिंदी भजनांच्या रेकॉर्ड्स निघाल्या. पैकी एकीत पुष्पा पागधरे यांच्याकडून चार गाणी गाऊन घेतली, तर दुसरीत अण्णांनी स्वत: चार गाणी म्हटली. रचनाकार होते-सरस्वती कुमार दीपक. १९७४ मध्ये त्यांनी ‘लावणी भुलली अभंगाला’ या नाटकाला संगीत देऊन चार गाणी विश्वनाथ बागुल यांच्या आवाजात गाऊन घेतली.

या सगळ्या काळात चित्रपट संगीतातनं ते बाहेर पडत होते. १९७७ साली इनरिको कंपनीनं ‘शब्दसंगीत’ नावाची एक रेकॉर्ड आणली. त्यात सुरेश भटांच्या दोन (‘पहाटे पहाटे मला जाग आली’ आणि ‘मागता न आले म्हणूनी’) आणि कुसुमाग्रजांच्या दोन कवितांना (‘नवलाख तळपती दीप विजेचे जेथ’ आणि ‘दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे’! मुंबईतल्या वास्तव्यात या मायानगरीचं चपखल वर्णन करणारी कुसुमाग्रजांनी पत्नीला लिहिलेली पत्रकाव्ये.) त्यांनी चाली लावल्या व गायनही केलं. शेरोशायरीमध्ये भाऊसाहेब पाटणकरांच्या रचना त्यांना प्रिय होत्या व खासगी मैफिलीत ते त्या सादरही करीत असत. वसंत निनावे, मंगेश पाडगांवकर व अण्णा जोशी यांच्या रचनांना त्यांनी सुरेख चाली लावल्या आहेत. अशा २२ गाण्यांची सी. डी. २००९ साली प्रकाशित झाली. ऐंशीच्या दशकातली अवीट गोडीची गाणी त्यात ऐकायला मिळतात. गाण्याचे शब्द नुसते वाचले तरी कानसेनांच्या मनात ती वाजायलाच लागतात. ‘पळभर थांब जरा रे विठू’, ‘प्रभू तुझ्या दारी आलो’, ‘पाहिला भाकरीत भगवान’, ‘मजेदार झोपडी’ आणि ‘पाचोळे आम्ही पाचोळे..’

१९१८ च्या जानेवारी महिन्यात जन्मलेले अण्णा याच महिन्यात- म्हणजे ५ जानेवारी १९८२ रोजी हे जग सोडून गेले. पण मागे शेकडो अवीट गोडीची गाणी ठेवून गेले. ती गाणी अजरामर आहेत. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाली आहेत. अण्णा अनेकदा परदेशी गेले. खासगी मैफिली त्यांनी गाजवल्या. अशा खासगी मैफिलीत ते अधिकच खुलत. गाण्यांच्या खूप आठवणी व किस्से सांगत. ‘ए मेरे वतनके लोगो’ हे अमर गीत तर ते नेहमी शेवटी म्हणत. सुदैवानं त्यांची काही ध्वनिमुद्रणं संग्राहकाकडं अजूनही उपलब्ध आहेत. त्यांचं एकमेव पुस्तक ‘माझ्या जीवनाची सरगम’ कितीही वादग्रस्त असलं तरी आता ते इतिहासाचा भाग बनलं आहे. त्यामुळे या आत्मकथनाचा हिंदी व इंग्रजी अनुवाद होणं जरुरीचं आहे. या जन्मशताब्दीनिमित्तानं भावी पिढय़ांकरिता हे काम कुणीतरी मनावर घेईल अशी आशा करू या.

सुरेश चांदवणकर chandvankar.suresh@gmail.com