22 March 2018

News Flash

अद्भुतरम्य प्राणीविश्व!

आयुष्यातली ऐन उमेदीची चार दशकं मी जंगलात व्यतीत केली.

राखी चव्हाण | Updated: January 7, 2018 1:47 AM

कुठल्याही कोशाची निर्मिती हे तसं खूपच क्लिष्ट काम. कोशनिर्मिती ही एकटय़ाने नाही, तर समूहाने करण्याची गोष्ट आहे. पण समूहात मतभेदांची शक्यता बरीच असते. मग त्यातून कोशनिर्मितीचे कामही लांबत जातं. किंबहुना, कधी कधी ते पूर्णत्वासही जात नाही. मी अर्ध्याहून अधिक आयुष्य जंगलात घालवलेलं असल्याने पक्षी, प्राणी, वृक्ष आणि मत्स्यकोशनिर्मितीचं काम आपण एकटय़ानेच करायचं असा निर्णय घेतला. कारण एकटय़ाने निर्णय लवकर घेता येतात. जिज्ञासू आणि अभ्यासू व्यक्तींसाठी हे कोश म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या पक्षीकोशाच्या निर्मितीप्रक्रियेला मला तब्बल बारा वर्षे लागली. आणि आता येऊ घातलेल्या प्राणीकोशासाठी सहा वर्षे लागली.

आयुष्यातली ऐन उमेदीची चार दशकं मी जंगलात व्यतीत केली. त्यामुळे तेथील प्राणी, पक्षी, वृक्ष अशा सर्व सजीवांशी आपोआपच माझी नाळ जोडली गेली. जंगलात पडलेल्या प्रत्येक पावलागणिक त्यांच्याविषयीचे कुतूहल जागृत होत गेलं आणि तिथूनच मग डायरीतील नोंदींचा प्रवासही सुरू झाला. चार दशकांच्या नोंदीचा हा प्रवास माझ्या अनेक पुस्तकांद्वारे वाचकांसमोर आला. परंतु जंगलातील आदिवासींकडून मिळालेली पशुपक्षी-प्राण्यांबद्दलची अनवट माहिती, अरण्यांवरची वाचून काढलेली असंख्य पुस्तकं, तसंच प्राचीन ग्रंथांमधून मिळालेलं ज्ञान असा अधिकच्या संशोधनाचा प्रवास आता कोशनिर्मितीतून मूर्तस्वरूपात येत आहे. कोश तयार करायचा तर आपणच असं मी ठरवलं याला  कारण त्यासाठी लागणारे प्रचंड श्रम. कदाचित दुसरी कुणी व्यक्ती एवढे परिश्रम करू शकणार नाही. म्हणूनच इतर कुणी अशी कोशनिर्मिती करू शकेल का, ही शक्यता धूसर असल्याने मीच मग याकामी पुढाकार घेतला. माझ्या पहिल्या पक्षीकोशाच्या जन्मासाठी बारा वर्षे लागली. या पक्षीकोशात तब्बल २० हजार नवीन शब्द आहेत. भारद्वाज पक्ष्यालाच २७ पर्याय त्यात दिलेले आहेत. हा कोश म्हणजे फक्त विविध भाषांमधील पक्ष्यांची नामावली नव्हे, तर या सर्व पक्ष्यांचं आयुष्य या कोशात मी उलगडून दाखवलेलं आहे. प्राणीकोशाचंही तसंच आहे. पक्षीकोश पूर्ण झाल्यानंतर जाणवलं की आपण प्राणीकोशही तयार करायला हवा. आणि तेव्हापासून मग टिपणं काढणं, त्यासाठी भरपूर आणि विविधांगी वाचन करणं यास सुरुवात झाली. प्राणीकोशाची रचनाही जवळजवळ पक्षीकोशासारखीच आहे. भारतातील ४५० प्रकारच्या प्राण्यांचा या कोशात समावेश आहे. मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत या जुन्या भाषा आणि तेलगू, तामीळ, कानडी, मल्याळम्, गुजराती या भाषांमधील संबंधित प्राण्यांची नावं यात मी समाविष्ट केली आहेत. ही नावं शोधणं  म्हणजे एक दिव्यच होतं. त्यासाठी कधी जुन्या ग्रंथांचा आधार घ्यावा लागला, तर अनेकदा स्थानिक आदिवासींना भेटून त्यांच्याकडून ते जाणून घ्यावं लागलं. त्या- त्या राज्यांत जाऊन आणि पुस्तकांतले संदर्भ घेऊन ही नामावली मी तयार केली. हे शब्दांचं भांडार शब्दांकित करायलाच पाच ते सहा वर्षे लागली. दरम्यानच्या काळात काही अडचणीही आल्या आणि त्यामुळे ते काम पडून राहिलं. आता मात्र त्याने वेग घेतला आहे आणि संगणकावर त्याची जुळवणीही सुरू झाली आहे.

या कोशात केवळ प्राण्यांच्या नावांचं भांडार असू नये, तर त्यांच्याशी संबंधित छोटय़ा छोटय़ा कथाही द्यायला हव्यात असं मला वाटलं. याचं कारण प्राण्यांची नुसती नावं देऊन प्राणीजगताचं पुरेसं आकलन लोकांना होणार नाही. म्हणून मग प्राणीकोशात प्राण्यांच्या नावासोबतच त्यांच्याविषयीची कधीच कुणाला माहिती नसलेल्या गोष्टींची अनेक प्रकरणं दिली आहेत. सर्वसामान्यांना दोन-तीन प्रकारचीच वटवाघळे माहीत आहेत. पण या प्राणीकोशातून त्यांना तब्बल १५० वटवाघळांची नावं कळणार आहेत. उंदीर म्हणजे उंदीर एवढंच सामान्यांना माहीत आहे. पण या कोशातून उंदीर, घूस यांचे शंभर प्रकार त्यांच्यासमोर येणार आहेत. उंदरांची ही नामावली शोधताना माझी पुरती दमछाक झाली. उंदीर, वटवाघळांची नावं शोधताना माझ्या सहनशीलतेचा कस लागला. इतर प्राण्यांची नावं शोधताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास उंदीर आणि वटवाघळांनी दिला. यादरम्यान मला खूप प्रवासही करावा लागला. जंगलातले आदिवासी आणि गावाबाहेरच्या पारध्यांना भेटणं, त्यांना पुस्तकातील छायाचित्रं दाखवून किंवा शब्दांतून प्राणी उलगडून दाखवून त्यांच्याकडून त्यांची नावं जाणून घेणं.. अशा बऱ्याच कसरती, खटपटी-लटपटी कराव्या लागल्या. बरीच नावं संस्कृत ग्रंथांमधून मिळाली. सामान्य माणसाला वटवाघूळ हा पक्षी आहे की सस्तन प्राणी, हेच माहीत नाही.

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाडय़ावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरही फार हुशार! अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंचीएवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रूपक्षी आहे का, हे पाहतो. शत्रूपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या, तर काहींची माहिती गोळा केली. आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून लोकांसमोर येणार आहे.

मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाटय़ाला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात.

मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप  म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास-दौऱ्यांत हे अनुभवायला मिळालं. ‘मुकना’ हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात. काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.

अशा तऱ्हेनं जे कधीच पुस्तकांतून आलेलं नाही, कुणाला माहिती नाही अशा गोष्टी या कोशामध्ये असणार आहेत. आजच्या आणि जुन्या पिढीसाठीसुद्धा हे ज्ञान नवं असेल. आणि म्हणूनच ते कोशांद्वारे सर्वासमोर आणायचं मी ठरवलं. जिज्ञासू आणि अभ्यासू व्यक्तींसाठी प्राणीकोश हे अभ्यासाचे परिपूर्ण दालन ठरेल. प्राणीकोशात त्यांना प्राण्यांच्या विविध नामावलींसह त्यांच्या आयुष्याचा घटनाक्रमही अभ्यासता येईल. माझे प्रत्यक्षानुभव आणि अभ्यासाच्या पोतडीतून हे ज्ञानभंडार मी सर्वासमोर मांडतो आहे. याकामी आदिवासी, पारधी लोकांनी केलेलं सहकार्य अतिशय मोलाचं आहे. कारण पारधी लोक या गोष्टी कधीही सांगत नाहीत, दाखवत नाहीत. पण मला त्यांनी त्या सांगितल्या आणि दाखवल्यासुद्धा! म्हणूनच आज हा प्राणीकोश पूर्णत्वास गेला. वृक्षकोश आणि मत्स्यकोशाचे कामही बरंचसं आटोपलं आहे. डायऱ्या भरलेल्या आहेत. त्यांचं एकत्रीकरण बाकी आहे. खरं तर ४० वर्षांच्या नोंदी असलेल्या या डायऱ्या इतकी वषेर्ं जपून ठेवणं कठीण आहे. पण त्या जपून ठेवल्यामुळेच ही कोशनिर्मिती मला शक्य होत आहे.

शब्दांकन : राखी चव्हाण

First Published on January 7, 2018 1:47 am

Web Title: the success story of maruti chitampalli
 1. I
  Ishani P
  Jan 11, 2018 at 12:40 pm
  Please mention the name in the article.. Came to know the name of the person in comments.. Its common sense right.. I was thinking Rakhi Chavan is making animal encyclopedia.... Not everyone can Identify from the photograph that its great Dr. Maruti Chitampalli.. Hats off to you sir!!
  Reply
  1. S
   sumeet
   Jan 7, 2018 at 5:02 pm
   सर, तुमच्या प्राणिकोशाची आतुरतेने वाट पाहतो आहे
   Reply
   1. S
    Sachin bhosale
    Jan 7, 2018 at 3:44 pm
    सर आपण खूप नशीबवान आहात आपल्याला इतका काळ जंगलात घालवता आला जंगल अनुभवता आलं आपणास भेटावेसे वाटते कृपया आपण ा वेळ देऊ शकाल ? लेखनाविषयी मार्गदर्शन कराल ? - एक निसर्गवेडा 9767557552
    Reply
    1. P
     pravin
     Jan 7, 2018 at 1:57 pm
     atlest mention name of the Author in article, very basic common sence.
     Reply
     1. P
      Priyal Ghangrekar
      Jan 7, 2018 at 11:39 am
      श्री. मारुती चितमपल्लीसरांचे काम अनुभव हा फार मोठा आहे, पक्षीकोश, प्राणिकोश, वृक्षकोष आणि मत्स्यकोश यांची निर्मिती करून असंख्य मराठी वाचकांसाठी ते जंगलांची दारे उघडत आहेत त्याबद्दल त्यांचे जेव्हढे आभार मानावेत तेव्हढे कमीच असतील. प्रत्येक सुसंस्कृत सुजाण साहित्यप्रेमी मराठी माणसाने हा अमूल्य ठेवा आवर्जून विकत घ्यावा आणि आपल्या संग्रही बाळगावा.
      Reply
      1. Load More Comments