माणूस हा मुळातच मिथक निर्माण करणारा आहे. मिथक म्हणजे पुराणकथा किंवा दिव्यकथा. जे घडावं, प्रत्यक्ष व्हावं असं वाटतं, त्याची कल्पना करून रचलेली ही कथा. भारतातल्या आदिम समूहांनी रचलेल्या अशा अनेक पुराणकथा मौखिक परंपरेतून प्रवाहित होत आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी या कथांचं संकलन तर केलं आहेच; पण त्यांचा अन्वयार्थ लावत संस्कृतीच्या अंधाऱ्या वाटाही उजेडात आणल्या आहेत. अर्थात संस्कृतीच्या विकासाबरोबर सगळ्याच कलांमध्ये बदल झाला, तसा तो कथेच्या रूपातही झाला. शतकानुशतकांच्या प्रवासात कथेला असणारं मिथकांचं झळाळतं अस्तर काही वेळा विरळ, जीर्ण झालं आणि काही वेळा तर ते पूर्ण गळूनही पडलं. केवळ रंजनमूल्यावर भर देणाऱ्या कथेची जागा वास्तववादी कथेनं घेतली आणि अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्याचं ‘पॅशन’ घेऊन कथा अवतरू लागली.

मराठी कथाक्षेत्रानंही हा बदल पाहिला.. अनुभवला आहे. याचा अर्थ फँटसी इथून पूर्ण हद्दपार झाली असा नव्हे. पण सामाजिक प्रश्न किंवा सामाजिक व्यंग समोर आणणाऱ्या कथांनी मात्र बहुतांशी वास्तवाचंच बोट घट्ट पकडलेलं दिसतं. माणसाच्या भौतिक, नसíगक, वैचारिक, भावनिक विश्वातले तरंग आणि कंगोरे स्पष्ट करणाऱ्या या कथांनी मराठी कथाप्रवाहाला समृद्ध केलं आहे. विजय तांबे या प्रयोगशील कथाकाराचा ‘तथाकथित’ हा संग्रह मात्र सामाजिक वस्तुस्थितीकडे कल्पनेच्या डोळ्यांनी पाहणारा आहे. २००७ ते २०१७ या दहा वर्षांतल्या त्यांच्या पाच कथा या संग्रहात आहेत. अस्वस्थता, अंधश्रद्धा, स्वार्थ, प्रसिद्धीचा हव्यास, स्त्रीवर अधिराज्य गाजविण्यात पुरुषार्थ मानणारी मानसिकता अशा ज्या अनेक विकृतींनी सध्याचा समाज प्रदूषित झाला आहे, त्या विकृती अधोरेखित करण्यासाठी त्यांनी थेट मार्ग न स्वीकारता कल्पनेचा हात धरला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

गावातल्या नागोजी वस्तादांकडून त्यांच्या मृत्यूपूर्वी मिळालेल्या एका अमानुष विद्येमुळे भयानक अस्वस्थ आणि वेडापिसा झालेला रघू पहिल्याच ‘अखून’ या कथेत भेटतो. कुणालाही न कळता माणसाची कवटी फोडायची ही विद्या वस्तादांनी आपल्यालाच का दिली, या प्रश्नानं तो अस्वस्थ झाला आहे. उलटसुलट विचारांनी डोक्याचा भुगा झाला की ताण अस होऊन माणसाऐवजी मातीच्या मडक्यावर अनेक र्वष तो या विद्य्ोचा वापर करतो आहे. मात्र, कुठल्याशा दुर्गम खेडय़ात अस वेदनांनी कळवळणाऱ्या एका मरणासन्न स्त्रीला पाहताना त्याला त्या विद्य्ोमागचं प्रयोजन कळतं आणि त्याच्या डोक्यातला ‘जीवघेणा’ कोलाहल शांत होतो. त्या स्त्रीच्या नवऱ्याला अनेक र्वष पडणारं स्वप्न, गावातल्या कुणा एका बुवानं त्याला आणि रघूला सांगितलेले उपाय.. रघू आणि गणपत या दोघांची मानसिक गुंत्यातून एकाच घटनेनं केलेली मुक्तता या कथेत रंगवलेली आहे.

‘तिठय़ावरचा तोडगा’ ही करणीसारखे अघोरी उपाय करण्याच्या प्रथेवर घाला घालणारी कथा आहे. पण हा घाला सरळसोट नाही. खोटय़ा तक्रारीमुळे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होणं, मग धीर एकवटून करणीच्या विरोधात आवाज उठवणं, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणं, लोकमत तयार करणं आणि अखेर गुन्हेगाराला शिक्षा होणं असा या कथेचा प्रवास नाही. सोसायटीत समोर राहणाऱ्या एका स्त्रीनं केलेल्या खोटय़ा तक्रारीमुळे पोलिसांचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या एका मध्यमवर्गीय, नोकरदार माणसाच्या डोक्यात घडणाऱ्या गोष्टी आणि त्याच्या कल्पनेची भरारी ही कथा वाचकांसमोर मांडते. कथानायकाच्या सोबतीनं इथे कथाकारही काही वेळा सूत्रं हातात घेतो. गोष्टीचं तथ्यही शेवटी तोच सांगतो.

माणसाच्या तावडीत सापडल्यामुळे जंगलाच्या सेनापतीचं उरलेलं तथाकथित रूप रंगवताना जंगलविश्व, माणूस आणि प्राणी यांच्यातले संबंध, जंगलातले न्याय, माणसाची प्रसिद्धीची हाव, स्वत:चा खोटेपणा लपवण्यासाठी चालणारी त्याची धडपड, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा निसर्ग-पर्यावरणाविषयीचा तकलादू दृष्टिकोन, माध्यमांचा बातमी मिळवण्यासाठी चालणारा खटाटोप अशा अनेक गोष्टींचे धागे लेखकानं ‘तथाकथित’ या दीर्घकथेत गुंफले आहेत. माणसाप्रमाणे बोलणाऱ्या आणि त्याच्यासारख्याच उत्कट भावना असणाऱ्या प्राण्यांच्या तोंडून जगण्यातल्या अनेक कटू सत्यांचा उद्गार त्यांनी घडवला आहे. संपूर्ण कल्पनाविलासावर आधारलेली ही कथा जंगलातले नसíगक बारकावे आपल्या चित्रमय शैलीत टिपते आणि कथा वाचताना जणू एक मोठा दृक्श्राव्य पटच आपल्या डोळ्यांसमोर उलगडत नेते.

आपल्याला होणारं मूल सुदृढ आणि सद्गुणसंपन्नच होईल ना, या आशंकेमुळे अनेक व्रतं, पोथ्यावाचन, स्तोत्रपठण आणि असले नानाविध उपाय करणारी सुनंदा ‘भीतीचा मॉल’ कथेमध्ये चित्रित झाली आहे. लोकांच्या घाबरटपणाचा फायदा घेण्यासाठी समाजात कार्यरत असणाऱ्या काही शिस्तबद्ध यंत्रणा, प्रत्येक गोष्टीचं झालेलं बाजारीकरण, आत्मकेंद्रित वृत्तीतून वाढीला लागणाऱ्या अंधश्रद्धा याविषयी उपरोध दर्शविणारी ही कथा आहे.

‘उठ मुली, दार उघड’ ही कथा जंगलातल्या साहचर्यातून स्त्री-पुरुष यांच्यातल्या असंतुलित नात्यावर प्रकाश टाकणारी आहे. एकीकडे जंगलाचं दर्शन घडवत असताना ती प्रेमाची व्याख्याही समजावून सांगू बघते. ‘‘तुला नवरा हवाय, का राणोबा हवाय, हे नक्की ठरव,’’ असं म्हणणारी या कथेतली राणीमाशी हा स्त्रीचा अंत:स्वर असल्याचं सूचित करणारी ही कथा एक प्रकारे स्त्रीच्या आत्मसामर्थ्यांला जागवणारी आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घालणाऱ्या, किंबहुना कल्पनेचा धागा अधिक गडद करणाऱ्या या सगळ्या कथांचा घाट नवा आणि साचेबद्धपणा मोडणारा आहे. तो सगळ्या वाचकांना खात्रीनं आवडेलच असं नाही. मात्र, यानिमित्तानं मराठी कथेत एक वेगळा प्रयोग झाला आहे. समीक्षक आणि अभ्यासक यांनी त्याचं मूल्यमापन करावं, हे बरं. या कथा वाचताना ग्रॅहम ग्रीन यांचं कथा या वाङ्मय प्रकाराविषयीचं म्हणणं आठवतं.. ‘‘A story has no beginning or end: arbitrarily one chooses that moment of experience from which to look back or from which to look ahead.’’ विजय तांबे यांनी आजच्या सामाजिक स्थितीकडे बघण्यासाठी असे पाच बिंदू पकडले आहेत. त्या बिंदूंवर उभं राहताना कदाचित त्यांना अपेक्षित आणि अनपेक्षित असं आणखीनही काही वाचकांना स्वत:लाही दिसेल. ते ज्याचं त्यानं जाणून घ्यावं.

तथाकथित’- विजय तांबे,

  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई,
  • पृष्ठे -१८४, मूल्य – २२० रुपये.