07 June 2020

News Flash

नऊ लक्ष फुले!

या काव्यसंग्रहांतील काही पुस्तकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेली पार अगदी १९६१..१९६३ मध्ये.

विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने पॉप्युलर प्रकाशनाने त्यांच्या बालकवितासंग्रहांचा संच पुन्हा प्रकाशित केला

विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने पॉप्युलर प्रकाशनाने त्यांच्या बालकवितासंग्रहांचा संच पुन्हा प्रकाशित केला आहे. त्यानिमित्ताने..

मुळीच सोपे नसते लहानग्यांसाठी काही चांगले लिहिणे. विशेषत: कविता. उगाच जंगलातले प्राणी घेतले उदाहरणादाखल, उगाच पऱ्याबिऱ्या घेतल्या उदाहरणादाखल, उगाच राक्षसबिक्षस घेतले उदाहरणादाखल आणि त्यांची हिशेबी गोळाबेरीज करून पांढऱ्यावर काहीतरी केले काळे.. इतके सोपे नसते ते. म्हणजे करता येते तसे.. आणि करतातही कोण कोण. पण ते तर निव्वळ हवेने फुगवलेले फुगे. टाचणीही न लावता फुस्सकन् हवा निघून जाईल असे.

मुळीच सोपे नसते लहानग्यांसाठी काही चांगले लिहिणे. मोठय़ांसाठी ते अवघड का? तर, त्यांच्या मनावरील मोठेपणाचे ओझे. वयाचे मोठेपण, विचारांचे मोठेपण, प्रतिष्ठेचे मोठेपण.. असे काय काय. लहानग्यांसाठी लिहायचे तर हे मोठेपण ठेवावे लागते दूर. खरे तर भिरकावूनच द्यावे लागते एका झटक्यानिशी. स्वतला अस्ताव्यस्त करावे लागते. तेव्हाच हाती गवसू शकते लहानग्यांच्या विश्वातील अद्भुत असे काही. विंदा करंदीकर.. मोठेपण भिरकावून देण्याची विलक्षण क्षमता, लहानग्यांच्या मानसिकतेशी एकरूप होऊन त्या मानसिकतेशी स्वच्छंद खेळण्याची ताकद, विलक्षण कल्पनाशक्ती, शब्दांमधील नादाची नेमकी समज, वेगळ्या वाटांवर चालण्याची असोशी अशा अनेक गोष्टींचा धनी असलेला हा विलक्षण कवी. अशा तमाम गोष्टींच्या मालकीतून साकारत गेल्या त्यांच्या छोटय़ांसाठीच्या वेगळ्याच कविता..

‘राणीची बाग’, ‘सशाचे कान’, ‘एकदा काय झाले’, ‘परी ग परी’, ‘एटू लोकांचा देश’, ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’, ‘टॉप’, ‘सर्कसवाला’, ‘बागुलबोवा’, ‘सात एके सात’, ‘अडम् तडम्’.. ही विंदांच्या बालकवितासंग्रहांची नावे. विंदांचे आणि त्यांच्या बालकवितांचे येथे स्मरण करण्याचे प्रयोजन म्हणजे ही सारी पुस्तके पुनर्माडणीसह नव्याने उपलब्ध होणे! विंदांच्या या कवितांमध्ये खूप काय काय आहे!! एका विलक्षण जगात वाचकांना सोबत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यात भुलवणारी शब्दकळा आहे, नाद आहे. विषयांचे बघायचे तर पुराण आहे, निसर्ग आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, वर्तमान आहे.. आणखीही खूप काही आहे. आणि त्या सगळ्याकडे पाहणारी खास विंदांची अस्सल कोकणी, खोडकर दृष्टीसुद्धा आहेच! या काव्यसंग्रहांतील काही पुस्तकांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेली पार अगदी १९६१..१९६३ मध्ये. म्हणजे ५० पेक्षाही अधिक वर्षांमागे. पण तरीही त्या कविता आज ताज्या वाटतात. त्यातील उत्फुल्लता आजही जाणवते.

‘परीचा पडला

दगडावर पाय;

दगड म्हणाला,

आय् आय्.

परी म्हणाली,

तू तर दगड!

तुला का होते

परी जड?’

या ओळी काय, किंवा-

‘एका परीचे

नाव उनी

तिला लागते

उन्हाची फणी..’

या ओळी काय, किंवा..

‘एक परी

फूलवेडी

फुलासारखी

नेसते साडी..’

या ओळी काय.. त्या कितीही वर्षांमागच्या असल्या तरी शिळ्या होऊ शकत नाहीत.

विंदांच्या बालकवितांमध्ये प्राण्यांचा मुक्त, मनसोक्त आणि बहारीचा वावर आहे. त्या प्रत्येक प्राण्याला त्याचे स्वतचे असे ठाशीव व्यक्तिमत्त्व आहे.

‘माकडाने घातली

छत्रीएवढी हॅट,

म्हणाले, मी हॉलंडचा

डॉक्टर व्हॉन व्हॅट.

कोल्होबाने घातली

पगडी लालेलाल,

म्हणाला, मी काशीचा

पंडित बन्सीलाल..’

ही रचना, किंवा-

‘कासव उगाळते

मणभर सुंठ,

सुईच्या नेढय़ातून

जातो उंट.

सशाच्या पाठीवर

चढतो हत्ती

आणि मालवतो

चंद्राची बत्ती..’

ही रचना त्याची साक्ष देतात.

या कवितांमधील निसर्ग अत्यंत प्रसन्न, खेळकर, हसरा आहे. तो इतका जिवंत आहे, की शब्द वाचताना तो आपल्याशी खेळत असल्याचा भास होतो.

‘पाऊस मुलांचा,

पानांचा, फुलांचा,

पडतो टपटप,

जातो झपझप.

भिजवतो दप्तर,

पुसतो पाटी,

फुलपाखरांच्या

लागतो पाठी.’

यातले बेडकांचे गाणे मोठे गमतीचे..

‘चिखल सभोती अमुच्या सुंदर,

शेवाळ कसे दिसे मनोहर,

स्वर्ग न दुसरा राव, डरांव् डरांव् डरांव्..’

आणि पावसाचे गाणेही तसेच छानसे..

‘येरे येरे पावसा

देईन तुला आणा,

आणा नाही थोडा

आण निळा घोडा.

येरे येरे पावसा

डोंगर तुझा मावसा,

टाक सगळे नाणे

फुकट नाही गाणे..’

लहान मुलांचे विचारविश्व मोठय़ांच्याहून पार निराळे. वास्तवाचा जाच त्यांच्या विचारांना नसल्याने ते फार वेगळा विचार करू शकतात, वेगळ्या विचारविश्वात वाट्टेल तशा उडय़ा, कोलांटउडय़ा मारू शकतात. अडचण होते ती पुढे.. मोठे झाल्यावर! ही अडचण होण्याआधीच्या मनमुक्त अवस्थेतील अद्भुतता विंदांच्या ‘एटू लोकांचा देश’मध्ये पुरेपूर उतरलेली दिसते :

‘तिबेटाच्या

जरा खाली

हिमालयाच्या

जरा वर

एटू लोकांचा

अद्भुत देश

प्रत्येकाजवळ

उडते घर,

टिंग म्हणता

येते खाली,

टुंग म्हणता

जाते वर..’

हे एटू लोक कसे असतात? तर,

‘एटू असतात

गोरे, गोरे,

एटू असतात

छोटे, छोटे.

पण पुरुषाच्या

पाठीमागे

शेपूट असते

फार मोठे.

तेच फिरवून

डोक्यावरती

एटू बांधतात

छान फेटे..’

मनावरील मोठेपणाचे कृतक ओझे उतरवले की या एटू लोकांच्या देशात मोठय़ांनाही मुक्त प्रवेश.

विंदांच्या बालकवितांमधील एक मोठा भाग आहे तो घाबरगुंडीचा. ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’, ‘बागुलबोवा’ या संग्रहांतील कविता या घाबरगुंडीच्या धाटणीच्या. कितीही भीती वाटत असली तरी भुताच्या, राक्षसाच्या गोष्टी लहानग्यांना आवडतातच. (तसे तर मोठय़ांसाठीही हे वाक्य लागू पडू शकते!) या कविताही तशाच.

‘मसणवटीच्या राईमध्ये,

पडक्या घुमटीच्या वाटेवर,

भेंडवताच्या डोहापाशी,

पिशी मावशीचे आहे घर.

पिशी मावशीच्या पायाशी,

मनीमांजरी दिसेल काळी,

ती न कधीही खाते उंदीर,

फक्त खातसे सफेद पाली..’

पिशी मावशीचे हे वर्णन आणि तिच्या उचापती घाबरगुंडी उडवणाऱ्या आहेत. मात्र तरीही वाचण्यासाठी भाग पाडणाऱ्या.. जणू चेटूक करणाऱ्या.

तसाच बागुलबोवाही..

‘बागुलबोवा पण म्हातारा

उमर तयाची काय विचारा,

सात कमी वय सात हजार

काही न त्याला दुसरे पचते

पोर शेंबडे रडवे रुचते..’

विलक्षण रंगांचे, नादाचे, भाषेचे, रूपाचे विश्व पुढय़ात आणून ठेवणाऱ्या अशा विंदांच्या या बालकविता आहेत. वसंत सरवटे, दत्तात्रेय पाडेकर, पद्मा सहस्रबुद्धे, रत्नाकर मतकरी, सुभाष अवचट, अनिल दाभाडे, साईनाथ रावराणे, पुंडलिक वझे यांच्या चित्रांनी विंदांच्या शब्दांना अधिक खुलाव दिलेला आहे. आजच्या लहानग्यांना या कविता लागू होतील का, असा प्रश्न काही शंकेखोर विचारतील. त्या प्रश्नाला ठोस उत्तर ‘होय’ असेच. मुळात आजच्या मोठय़ांनी त्या नीट वाचाव्यात आणि लहानग्यांना त्या वाचून दाखवाव्यात. वर उल्लेख केल्याप्रमाणे मोठेपणाचे कृतक ओझे दूर भिरकावले तर मोठय़ांना या कविता आवडणारच.

‘जर कोणी

कविता केली,

प्रथम पुरतात

जमिनीखाली.

पण जुनीशी

झाल्यानंतर

शहाणे करतात

जंतर-मंतर.

मग कवितेतून

रुजतो वृक्ष,

फुले येतात

नऊ लक्ष..’

विंदांच्या कविताही अशाच आहेत.. नऊ लक्ष फुले फुलवणाऱ्या..                                           ल्ल

‘विंदा करंदीकर बालकवितांचा खजिना’

पॉप्युलर प्रकाशन

११ बालकवितासंग्रहांचा संच- ११०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 4:02 am

Web Title: vinda karandikar marathi poem collection for kids
Next Stories
1 उदारमतवादी परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख
2 सदरलेखनाचा आदर्श वस्तुपाठ
3 हिंदी-मराठी मावसबोलीचा सेतूबंध
Just Now!
X