ब्रेकअप हा शब्द आजच्या पिढीमध्ये अगदी कॉमन झालाय. सेलेब्रिटींचे ब्रेकअप पहिल्यापासून चघळले जायचे. पण सोशल मीडियामुळे सामान्य माणूसही सेलेब्रिटी होतोय आणि सामान्यांच्या ब्रेक-अपच्या चर्चाही या माध्यमांमुळेच चर्चिल्या जाताहेत. आज अनेक नाती लग्नापर्यंतदेखील पोहोचत नाहीत. याचं सगळ्यात मोठं कारण आहे ‘इमोशनल इंडिपेंडन्सी’, असं काही मानसोपचारतज्ज्ञांशी बोलताना जाणवलं.

‘पटत नव्हतं म्हणून घेतला निर्णय. इट्स नॉट वर्किंग एनी मोर, वी मूव्ह्ज ऑन..’ असं किती तरी वेळा आपण ऐकतो. सात र्वष असलेलं रिलेशनदेखील एका झटक्यात तुटतं. आणि फेसबुकवर कमिटेड असलेलं स्टेटस परत ‘सिंगल’ वर येतं. आज ‘ब्रेक अप’ हा शब्द खूप कॉमन झाला आहे. यामध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका आहे. काहींची मैत्री ही ब्रेकअपनंतरसुद्धा टिकून असते आणि ‘वी आर जस्ट फ्रेंड्स नाऊ’ असे म्हणणारी किती तरी कपल्स असतात. विराट कोहलीनेदेखील तथाकथित ब्रेकअपनंतर अनुष्का शर्माची बाजू घेऊन ते सिद्ध केलं आहे. सध्या बी टाऊनमध्येही तर ‘ब्रेकअप्स’चा पाऊसच पडतो आहे. रणबीर-कतरिना, विराट-अनुष्का, सुशांत-अंकिता यांची तर लग्नाअगोदरच घटस्फोटाची चर्चा आहे. लग्न झालेल्यांपैकी हृतिक-सुझ्ॉन, अरबाज- मलाइका, फरहान- अधुना अख्तर. या सेलेब्रिटींच्या घटस्फोटांनी अशाच चर्चा घडवल्या.

सेलेब्रिटींचे ब्रेकअप पहिल्यापासूनच सामान्यांचा चर्चेचा विषय असायचा. सोशल मीडियामुळे ही चर्चा आता चव्हाटय़ावर आली आहे, इतकंच. या सोशल मीडियामुळे सामान्य माणूसही सेलेब्रिटी होतोय आणि सामान्यांच्या ब्रेक-अपच्या चर्चाही या माध्यमांमुळेच चर्चिल्या जाताहेत. त्यांच्याशी संबंधित मित्र-परिवारापुरत्या चर्चा मर्यादित असल्या तरी दोन व्यक्तींच्या खासगी प्रश्नाची अशी समाज माध्यमांमुळे चर्चा होऊ लागली आहे, हे खरं.

आज अनेक नाती लग्नापर्यंतदेखील पोहोचत नाहीत. याचं सगळ्यात मोठं कारण आहे इमोशनल इंडिपेंडन्सी, असं काही मानसोपचारतज्ज्ञांशी बोलताना जाणवलं. किमान दाखवायला तरी आजची कपल्स भावनिक स्वातंत्र्य उपभोगतात. आजच्या जोडय़ांमधला मुलगा आणि मुलगी दोघेही इंडिपेंडंट असतात. स्वत:चं उत्तम करिअर, मित्र परिवार, प्राधान्यक्रम सगळंच त्यांचं स्वत:चं असतं. ‘वी बिलीव्ह इन इंडिविजुअल स्पेस’ असं म्हणणारीपण खूप कपल्स दिसतात. एकत्र असूनसुद्धा त्यांची स्वतंत्र आयुष्य सुरू असतात. असं असूनदेखील ते एकत्र असतात कारण त्यांना एकमेकांची गरज असते – मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी. आज सोशल मीडियाच्या प्रभावामुळे व्यक्त होण्यासाठी कुणी असण्याची गरजदेखील संपली आणि आपसातला संवाद कमी झाला आणि म्हणूनच वाढले ब्रेकअप्स.
या बद्दल मानसशास्त्रज्ञ गिरिजा पटवर्धन सांगतात, ‘बरेचदा इमोशनली अटॅच्ड असताना व्यावहारिक विचार करता येत नाही असा काही लोकांचा गैरसमज असतो.

रिलेशनशिपमध्ये जुळवून घ्यायला खूप महत्त्व असतं. सध्याची तरुणाई प्रत्येक बाबतीत इंडिपेंडंट आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ला वाटेल तसं करण्याची सवय झालेली असते. मनाविरुद्ध काही होत असेल तर त्यासाठी अॅडजस्ट करण्याची तयारी असावी लागते. ती त्यांच्यात नसते. सोशल मीडियावर स्वत:ला व्यक्त करण्याची सवय लागल्यामुळे आपल्या जोडीदाराला काही तरी स्पेशल सांगणं किंवा जोडीदारापाशी व्यक्त होणं आता दिसत नाही. जर दोघेही इमोशनली इंडिपेंडंट असतील तर त्यांना फारसा फरक पडत नाही आणि आपली पहिली प्रायोरिटी आपण स्वत: असल्यामुळे ब्रेकअपचा निर्णय पटकन घेण्यात येतो.’ पण दोघांपैकी एक जण भावनिकदृष्टय़ा स्वतंत्र असेल आणि दुसरा भावनिकदृष्टय़ा त्याच्यावर अवलंबून असेल तर मात्र प्रॉब्लेम उद्भवतात. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण याचे मोठे उदाहरण आहे. आपली गरज आणि अपेक्षा आपल्या जोडीदाच्या गरज आणि अपेक्षांपेक्षा वेगळी असल्यास ‘नातं वर्क आऊट होणार नाही’ या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याआधी आपल्या जोडीदाराशी संवाद साधणं आणि व्यक्त होणं आवश्यक आहे, असंही गिरिजा सांगतात.

सोशल मीडियावर व्यक्त होत असताना बरेचदा पुढचे परिणाम विचारात घेतले जात नाहीत. ब्रेक-अप झाल्यावर कपलच्या मित्रपरिवाराला ते लगेच लक्षात येतं. दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले जातात, स्टेटस ‘कमिटेड’वरून ‘सिंगल’वर येतं. सोशल मीडियावरून अचानक गायब होणं, कधी कधी अकाऊंट डिलीट करणं यावरून फ्रेंड्सलिस्टमध्ये चर्चा होत राहते ब्रेकअपबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात. अशाने त्या कपलच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. सोशली स्वत:च स्वत:ला बॉयकॉट केल्यावर व्यक्त व्हायला कुणीच नसतं. एम्बॅरेसमेंट फीिलगमुळे स्वत:ला जगापासून तोडणं महत्त्वाचं वाटतं आणि याच्यामुळेच हायपरटेन्शन, एन्ग्झायटी आणि डिप्रेशनसारखे आजार जन्माला येतात. इमोशनली कितीही स्वतंत्र असले तरीसुद्धा ही एक प्रकारची अवहेलना पेलण्याची ताकद सर्वामध्ये असते असं नाही. त्यातून कुटुंब, मित्रपरिवार, आपली माणसं यांनाही फेस करणं खूप कठीण होऊन जातं. कपल्सनी निर्णय घेताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे’, असं गिरिजा पटवर्धन म्हणाल्या.

इमोशनली स्वतंत्र झाल्यावर बरेचदा आपल्या निर्णयांचा आपल्या जोडीदारावर काय परिणाम होईल याचादेखील विचार केला जात नाही. मुळात सध्या जोडीदारापुढे व्यक्त होणं ही संकल्पनाच संपत चालली आहे. या बाबत मानसोपचारतज्ज्ञ प्राजक्ता चांदोरकर सांगतात, ‘इमोशनली इंडिपेंडंट होणं आणि इमोशनली डिटॅच होणं यामध्ये खूप फरक आहे. माणूस भावनिकदृष्टय़ा स्वतंत्र असला तरी त्याची आपल्या जोडीदाराशी अटॅचमेंट नक्कीच असते. तीच नात्याचा आधार असते. त्या अटॅचमेंटमुळेच एकमेकांसमोर व्यक्त होता येतं. जेव्हा ती अटॅचमेंट संपते तेव्हा ब्रेकअप हा प्रकार वाढतो. जोडीदाराच्या भावनांना महत्त्व देणं नात्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या इंडिपेंडंटली घेतलेल्या निर्णयांचा जोडीदारावर काय परिणाम होईल याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी संवाद खूप आवश्यक आहे. आजच्या काळात ब्रेकअप होण्याचं मुख्य कारण – एक तर अतिसंवाद, नाही तर अजिबातच संवाद नाही – अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भावनिक स्वतंत्रता आणि भावनिक गुंतवणूक याचा बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे.’

जोडीदाराच्या भावनिक गरजा ओळखणं नात्यात आवश्यक असतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य वेळी प्रशंसेचे चार शब्द ऐकवणं, व्यक्त होणं आवश्यक आहे. जोडीदाराआधी स्वत:च्यादेखील भावनिक गरजा ओळखणं आवश्यक आहे. ‘सध्या मुलींमध्ये आर्थिक स्वातंत्र्य आलंय. करिअर, घर, फॅमिली, फ्रेण्ड्स याच्या बरोबरीने नातं संभाळत असल्यामुळे आपल्याला कुणाची गरज नाही. आपण सर्व मॅनेज करू शकतो, अशी भावना तरुण मुलींच्या वागण्यात दिसून येते, असं निरीक्षण योग थेरपिस्ट प्रांजली फडणवीस नोंदवतात. ‘माझ्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत, ज्यामध्ये योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे मुलींना फ्रस्ट्रेशन आलंय; परंतु त्या हे मान्य करायला तयार नसतात. त्याला फरक नाही पडत, तर मला का पडावा – असा इगोदेखील मध्ये येतो आणि संवाद तिथेच संपतो. अशा परिस्थितीचे मानसिकदृष्टय़ा परिणाम होत असतात. त्याच्या शरीरावरही खुणा दिसतात. मानेचं दुखणं, डोकं दुखणं असे शारीरिक प्रॉब्लेम्स घेऊन येणाऱ्या मुलींमध्ये मानसिक ताण हेदेखील महत्त्वाचे कारण असते,’ प्रांजली फडणवीस सांगतात. यासाठी स्वत:ला आणि जोडीदाराला वेळ देणं गरजेचं आहे.

बदलत्या काळासोबत नात्यांमध्येदेखील बदल झाला आहे. आजच्या तरुणाईला नातं टिकवणं महत्त्वाचं वाटत नाही, असं दिसत असलं तरी नात्याची गरज प्रत्येकाला असतेच. इमोशनली स्वतंत्र असण्यात काहीच वाईट नाही, पण वेळप्रसंगी जोडीदारावर भावनिकदृष्टय़ा अवलंबून असणंही वाईट नाही. एकमेकांची गरज, भावना आणि अस्तित्व याची दखल घेऊन वागल्यास रिलेशनशिप सांभाळण्यात त्रास होणार नाही आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावरच्या संवादाऐवजी प्रत्यक्ष संवाद रिलेशनशिप टिकवण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरेल, असंच या तज्ज्ञांशी बोलताना लक्षात आलं.

– निहारिका पोळ