१८,३८० फूट उंचीवर असलेल्या लडाखमधील खारदुंगला टॉपवर जाण्याचा विक्रम याआधी दिल्लीतील एका कन्येने केला होता. आणि ती यंगेस्ट राईडर टु रीच खारदुंगलाठरली होती. हा विक्रम आपल्या मुलीने मोडावा, असं स्वप्न एक बाप आपल्या लेकीमध्ये पहात होता. तिनेही ते स्वप्न खतरनाक चढउतार, ओबडधोबड वळण पार करत पूर्ण केलं. ती आहे पुण्याची अन्विता सबनीस. अन्विताने वयाच्या केवळ अठराव्या वर्षी तोच तिच्या वडिलांची इच्छा असलेला खारदुंगला इथे पोहोचण्याचा यंगेस्ट राइडरचा मान मिळवला आहे. तिच्या या खडतर आणि वळणावळणांच्या प्रवासाची तिच्याचकडून जाणून घेतलेली कहाणी..

पुण्यातील कोथरूड भागातील कावेरी कॉलेजमध्ये बी. एच. शिक्षण घेत असलेल्या अन्विताला खेळाची आणि सायकलिंगची आवड लहानपणापासूनच होती. ती आवड तिच्या मनात तिच्या बाईक रायडर बाबांमुळे रुजली होती. अन्विताचे बाबा हे जातिवंत रायडर. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक राईड दिल्ली ते मुंबई ‘राजधानी एक्स्प्रेस’च्या वेगाने केली होती. एवढंच नाही तर त्यावेळी ते राजधानी एक्स्प्रेसच्या २५ मिनिटं आधीच मुंबापुरीत पोहोचले होते. त्यांनी चार वेळा वेगवेगळ्या यशात ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील रचला आहे. बाबांची ही यशस्वी कामगिरी अन्विता लहानपणापासूनच बघत होती आणि तीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकायला सज्ज तयार होत होती.

Arushi Sharma Married to Casting Director vaibhav vishant
कार्तिक आर्यनच्या हिरोइनने गुपचूप उरकलं लग्न, सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे पती, फोटो आले समोर
Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
thipkyanchi rangoli fame pranjal ambavane
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकली! नवऱ्याने दिलं सरप्राइज, व्हिडीओ व्हायरल
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

लडाखमधील खारदुंगला डोंगर खरं म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच तुम्ही सर करू शकता. अनेक हौशी तरुण रायडर्स आणि गिर्यारोहकांनी हा डोंगर थंड वाऱ्यांचा सामना करत, खडकाळ वाट तुडवत, ऑक्सिजनची कमतरता असताना सर केला आहे. अन्विताचं नावही आता त्या धाडसी बाईक रायडर्समध्ये समाविष्ट झालं आहे. मात्र तिच्या या विक्रमाची सुरुवात तिच्या बाबांपासून झाली होती. १९ वर्ष ७ महिन्यांची दिल्लीतली तरुणी नुकतीच खारदुंगला जाऊन आल्याची माहिती अन्विताच्या बाबांना त्यांच्या भावाने दिली. त्यावेळी अन्विताला अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी काही दिवस शिल्लक होते. मात्र आपली मुलगी हा विक्रम नक्कीच मोडू शकेल, अशी खात्री तिच्या बाबांना वाटली आणि त्या दिशने त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

हा विक्रम करायचा तर मुळात अन्विताची बाइकवर हुकूमत असणं आवश्यक होतं. तिने पहिल्यांदा बाइकचं हँडल हातात घेतलं तेव्हा ती पाच वर्षांची होती. लहानपणी बाइकच्या टाकीवर बसू शकत होते तोपर्यंत लक्षपूर्वक मी ड्रायव्हिंग न्याहाळायचे, असं ती सांगते. सायकलिंगमध्ये तरबेज असलेल्या अन्विताला बाइक शिकायला तसा फारसा वेळ नाही लागला. परंतु बाइक सुरू करायला मात्र लागला. दहावीच्या सुट्टीत बाइक शिकण्याच्या पहिल्याच दिवशी तिला बाइक सुरू करायला साधारण एक तास लागला. कारण बाइक शिकवायला कोणीच गुरू म्हणून लाभलं नव्हतं. तिच्या बाबांनी बाइक रायडिंगसाठी तिला अनेक टिप्स दिल्या होत्या मात्र ती सुरू कशी करायची हेच त्यांनी तिला सांगितलं नव्हतं. त्यामुळे हळूहळू तोल सांभाळत तिने स्वत:च बाइक चालवली. शाळेत असतानाच तिने वडिलांबरोबर रायडिंग सुरू केलं होतं मात्र त्यावेळी बाबा बाइकवर आणि ती सायकलवर असायची. अन्विता बाईक शिकली आणि तिची पहिलीच रायडिंग थेट खारदुंगला झाली. तिच्या या मोहिमेची पूर्वतयारी वडिलांनी आधीपासूनच सुरू केली होती. ‘लायसन्ससाठी चाचण्यांच्या तारखा घेणे, लायसन्सच्या परीक्षेसाठी मला हजर करणे, रायडिंग गियर्स आणि इतर सामुग्री विकत घेणे, मला सरावासाठी भलभलत्या कठीण रस्त्यांवर नेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कॉलेजमधून परवानगी मिळवणं ही सर्व कामं बाबा खूप मेहनत घेऊन करत होते’, असं ती सांगते. ११ जुलैला अन्विता १८ वर्षांंची झाली आणि लगेच १७ सप्टेंबरला तिच्या वडिलांसोबत ती खारदुंगलाच्या मोहिमेला निघाली.

पुणे ते चंदिगढ अंतर रेल्वेने कापत २० सप्टेंबरला ही बापमुलीडी जोडी खारदुंगल्याच्या दिशेने कूच करती झाली. पल्सर २२० चं १६० किलो वजन, त्यात पल्सरच्या दोन्ही बाजूला बॅग्ज, त्या बॅग्जचं २५ किलो वजन अशा परिस्थितीत मोहिमेचा पहिला टप्पा चंदिगढ ते मंडी असा प्रवासाचा होता. काही किलोमीटर सलग हायवे व नंतर गोल गोल वळण कापत प्रवास सुरू होता. रात्री साडेआठला २२० किमी. अंतर कापलं गेलं. रायडिंग शूजची सवय नसल्यामुळे अन्विताच्या पायाला पहिल्या दिवशी खूप सूज आली. इतकी की उद्या पुढचा टप्पा पार करू शकेन का? असा प्रश्न तिच्यासमोर होता. मात्र बाबांच्या पाठबळामुळे ती दुसऱ्या दिवशीही त्याच उत्साहाने निघाली. मंडी ते के-लॉंग हा २२० किमीचा दुसरा टप्पाही तिने पार केला. दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेत रस्ता कसा असू नये, याचा जवळून अनुभव आपण घेतला, असं ती सांगते. रोहतांग पासचा तो उतारावरचा रस्ता पार करताना वजनदार पल्सर, सामान आणि तो उतार! जीव मुठीत घेऊन, हॅन्डलवरची पकड घट्ट करत, नजर इकडे तिकडे होऊ न देता, मी बाबांच्या मागे धिम्या गतीने बाइक चालवत होते. बाबांच्या डोमिनारच्या टेल लाइट्सच्या प्रकाशात, ती ओबडधोबड वळणं अधिकच भयंकर दिसत होती’, अशी आठवण अन्विता सांगते. खरंतर या मोहिमेत तिच्या पुढे तिचे वडील आणि मागे सुरेंदर नावाचे आणखी एक बाईक रायडर तिच्याबरोबर या मोहिमेत होते. ‘त्या काळोखात माझ्या मागे अजून कुणीतरी त्या वाटेवर आहे, ही जाणीव दिलासा देणारी असली तरी मी मात्र रडवेली झाले होते. इथूनच परत फिरावं, असा विचार मनात येत होता. पण, बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं या एका ध्येयाने मी तो जीवघेणा उतार सर केला’, असं तिने सांगितलं. जाणतेपणी ही मोहीम तिने सुरू केली होती. मात्र मोहिमेचा प्रत्येक दिवस आणखीनच अवघड होत चालला होता. ‘रस्त्यावर चिखल नव्हता; पण पाण्याचे थोडे ओढे लागायचे. त्याही वेळी मुंबईकरांना पुण्यात गाडी चालवणं एकवेळ या रस्त्यांपुढे खूप सोपं, असे मजेशीर विचार मनात यायचे. एके ठिकाणी मात्र कसोटी होती. उजव्या हाताला खोल दरी, नजर पोहोचेस्तोवर डोंगर रांगा आणि डोंगरकडय़ातूनच वाहतं पाणी. बाबा ओढा ओलांडून पलीकडे जाऊ न थांबले. मी मात्र ‘जैसे थे’. खूप वेळाने, धीर करत कसंबसं तो ओढा ओलांडला, पण त्या क्षणी त्या बर्फाच्या पाण्यात माझे बूट भिजले. तसे ते घोटय़ाच्या वपर्यंत असणारे रायडिंग शूज होते, परंतु थंडगार पाण्यामुळे थंड शिरशिरी माझ्या तळव्यापासून मस्तकापर्यंत गेली’, हा अनुभवच यशासाठी अडचणींचा खडतर रस्ता काय असतो ते सांगून गेला असं अन्विता म्हणते.

अडचणी कितीही असल्या तरी बारालाचला, नामिकला, लाचुंगला, तांगलांगला सारखे १७,००० फूट उंचीपर्यंतचे पासेस आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर बाइक चालवण्यातला थरार काही वेगळाच, असं ती सांगते. त्या डोंगर-दऱ्यांच्या प्रदेशात, एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला अक्राळविक्राळ खडक आणि भुसभुशीत वाळूच्या टेकडय़ा. त्यात कोणती दरड कधी खाली घसरत येईल हे सांगता येणं अशक्य. अशा निमुळत्या वाटेत, समोरून जर वाहन आपल्या दिशेने आलं तर शांतपणे एका जागी थांबणं अनिवार्य असायचं. परंतु तसं थांबणंदेखील काही वेळा नकोसं वाटायचं. कारण, वळणाच्या इतक्या कडेला, टोकावर उभं राहावं लागायचं की पायाखाली लगेच दरी सुरू व्हायची. बाइकचा स्टॅन्ड लावण्याइतकी भक्कम जमीन बघताना, नजरेला ती खोल दरी भेडसावायची, पण सांगणार कुणाला?, अन्विताच्या तोंडून हा प्रसंग ऐकताना तो थरार जाणवल्याशिवाय राहत नाही. रोज रात्री सुखरूपपणे मुक्कामाला पोहोचल्यावर प्रचंड आनंद व्हायचा; ‘आजच्यापेक्षा कालचा दिवस बरा’, असं म्हणायची वेळ यायची. काही रस्ते अतिशय छान आणि चालवायला मजा देणारे होते. पण चढण आली की पंचाईत सुरू. खऱ्या आयुष्यातसुद्धा यशाच्या शिखरावर चढणं तसं कठीण असतं हा विचार नकळत मनात घर करून गेला, असं ती हसत सांगते.

अखेर चौथ्या दिवशी अन्विता लडाखला पोहोचली. एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा बाइक खारदुंगल्याच्या दिशेने सरसावली. सुरुवातीचा रस्ता उत्तम होता. पण शेवटचा १४ किमीचा रस्ता अतिशय खडतर होता. त्यात तो मातीचा रस्ता, त्यात बरीच खडी, दगड, वाळू, मोठय़ा चढणी, हेअर पिन लूप्स आणि निमुळता होत गेलेला रस्ता. एकीकडे वर शिखरावर पोहोचण्याची घाई लागलेली आणि दुसरीकडे वेगही वाढवता येत नव्हता. अंगावर कपडय़ांचे चार थर होतेच. तरी, कडाक्याच्या थंडीत, ० ते ५ सें. तापमानात, सुसाट वाऱ्यात, हाताची बोटं सुन्न पडलेली. ऑक्सिजनची पातळी कमी होत होती. सोबत कापूर नेला होता, पण बाइकवरून हात काढणार कसा? या पेचातच अन्विता त्या सगळ्या भयानक वाटा तुडवत खारदुंगला टॉपवर येऊन पोहोचली. त्याक्षणी टॉपवर खूप माणसं होती. त्यांच्या गाडय़ा व बाइक्स मला दिसत होत्या. जणू एक जत्राच भरली आहे, असं वाटत होतं. त्याच गर्दीत माझे बाबा माझी आतुरतेने वाट बघत होते, असं ती सांगते. तो आनंदाचा क्षण काही निराळाच होता. माझी बाइक आपसूक बाबांजवळ थांबली. आतापर्यंतचा सगळा धीर सुटला आणि माझ्या भावना ओसंडून वाहू लागल्या. बाबांची शाबासकी मला खूप काही देऊन गेली. ‘तू जिंकलीस, तू करून दाखवलंस’ ही जाणीव त्यात होती. ‘आय वॉज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड’, ही एकच भावना मनात होती, असं ती सांगते.

परतीचा प्रवास काही तासांतच सुरू झाला; पण जिंकल्याची भावना मनात असल्याने बाइक नुसतीच पुढे जात होती. मी ती कशी चालवत होते, याचं भानच उरलं नव्हतं, असं सांगणारी अन्विता अगदी लहान वयात का होईना बाबांच्या पाठिंब्यामुळेच ही मोहीम सुफळ संपूर्ण झाल्याचं सांगते. मात्र आता तिला कुठेही थांबायचं नाही. सध्या तेरावीत शिक्षण घेत असलेल्या अन्विताला स्पोर्ट्स सायकॉलॉजीत करिअर करायची आहे आणि संपूर्ण देश बाइकवरून पिंजून काढायचा आहे. तिला तिच्या पुढील प्रवासासाठी ‘व्हिवा’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा !

viva@expressindia.com