एका पिढीने निर्मिलेला कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचताना त्या कलेची शैली आणि दर्जा तितकाच असावा ही काळाची गरज आहे. ती ओळखून काही पिढय़ांची सांस्कृतिक आणि कलेची भूक भागवणारी ‘कल्ला’कार आहे आर्ट कॉन्झव्‍‌र्हेटर मधुरा जोशी शेळके.

अनेक कलाकार आपल्या सर्जनासाठी त्या त्या माध्यमांतील कलाविष्कार करतात. त्यापैकी काही कालातीत ठरावेत असे कलाविष्कार पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचण्यासाठी ते तितक्याच निगुतीने त्यांचं संवर्धन करून जतन करण्याचं  शिवधनुष्य मोजकेच लोक उचलतात. त्यापैकीच एक आहे आर्ट कॉन्झव्‍‌र्हेटर (कलासंवर्धक) मधुरा जोशी शेळके. मधुरा नुकतीच लंडनच्या ‘इमॅन्युअल सेंटर’मधल्या ‘जेल्स इन कन्झर्वेशन’ या विषयावरील एका परिषदेसाठी गेली होती. आर्टवर्क क्लीनिंगच्या विविध पद्धती असतात. त्यांपैकी जेल पद्धतीवर चर्चा करण्यासाठी, संशोधन आणि अनुभव विशद करण्यासाठी जगभरातून या पद्धतीवर काम करणारे तज्ज्ञ जमले होते. या पद्धतीची माहिती मिळवून कलासंस्कृतीचं जतन करण्यासाठी मधुरा आणि तिचे पती अनंत या ५५० जणांच्या परिषदेत सहभागी झाले होते. या अनुषंगाने त्याचा आपल्या कलाकृती, आपलं हवामान आदी मुद्दय़ांचा सांगोपांग विचार करून ही पद्धत स्वीकारता येईल का, ते ठरवलं जाणार आहे. परिषदेनंतर लंडनमधील वास्तव्यात त्यांनी काही म्युझिअम्स आवर्जून पाहिली. नंतर पॅरिसमधील लुव्रसह इतर काही संग्रहालयांमध्ये अनेक दिग्गजांच्या कलाकृती पाहायला मिळाल्या. त्यापैकी काहींचा अभ्यास त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये केला होता. ती सगळी चित्रं पाहायला मिळणं, हेही एका परीनं शिक्षणच होतं. याआधीही मधुरा देशविदेशांतील अनेक परिषदांमध्ये सहभागी झाली असून त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतात, असं तिला वाटतं.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

लहानपणापासून मधुराला चित्रकलेची आवड होती. ती मोठी होईपर्यंत त्यांच्या घराच्या भिंती तिचा हात पोहोचेल तिथपर्यंत चित्र रंगवलेल्या असायच्या. आठवीतच तिनं जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचा ठाम निश्चय केला होता. चित्रकलेच्या शालेय परीक्षा दिल्या. पुढे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये बॅचलर फाइन आर्टस् (पेंटिंग) केलं. तिथं अनंतशी भेट झाली. दोघांनी चौकटीतल्या त्याच त्या गोष्टींपलीकडे जाऊन शिकायचं ठरवलं. दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तत्कालीन क्युरेटर दिलीप रानडे यांच्याशी भेट झाली. त्यांनी सुचवल्यानुसार लखनौच्या नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी (एनआरएलसी)मध्ये प्रवेश घेतला. तिथं कॉन्झव्‍‌र्हेशन आणि रिस्टॉरेशनचं शिक्षण मिळालं. पुढे इन्टॅकच्या प्रकल्पाचा एक भाग असणाऱ्या कउक (ओसीसी)ओडिशा आर्ट कॉन्झर्वेशन सेंटरमध्ये हस्तलिखितांच्या कॉन्झव्‍‌र्हेशनसंदर्भातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घेतलं. नंतर इन्टॅकमध्ये रुजू होऊन विशाखापट्टणमच्या संग्रहालयात कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ ऑइल पेंटिंग्जसाठी इन्टर्नशिप केली. ‘कोलकाता क्लब कलेक्शन’साठी काम केलं. मुंबईच्या ‘के. आर. कामा ओरिएंटल इन्स्टिटय़ूट’ आणि लायब्ररीतील हस्तलिखितं आणि दुर्मीळ पुस्तकांचं जतन केलं.

मुंबईच्या इन्टॅक आर्ट कॉन्झर्वेशन सेंटरचे टीम मेंबर म्हणून मधुरा आणि अनंतकडे भायखळ्याच्या डॉ. भाऊ  दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील कलावस्तूंच्या जतन आणि संवर्धनाचं काम सोपवण्यात आलं. मधुरा सांगते की, ‘या कामादरम्यान सगळ्या माध्यमांतील वस्तू हाताळायला मिळाल्या. अत्यंत शिस्तबद्धपणे केलेल्या या कामाचा अनुभव फार छान होता. तिथली प्रत्येक वस्तू युनिक असल्याने त्यासाठीच्या कामातही वैविध्य होतं. त्यासाठी सविस्तर चर्चा आणि सारासार विचार करून सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागत.’ या वस्तुसंग्रहालयाच्या संवर्धनाच्या कामासाठी ‘युनेस्को एशिया-पेसिफिक हेरिटेज अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सेलन्स’ हा पुरस्कार मिळाला. आपला त्या टीममध्ये समावेश असल्याचा या दोघांना सार्थ अभिमान आहे.

हे काम करता करता मधुराचं पेंटिंग पार मागे पडलं आहे. मात्र त्याचं तिला वाईट वाटत नाही. कारण ज्या नामवंतांची चित्रं आपण शिकलेलो असतो आणि ती जतन करण्यासाठी म्हणून समोर आल्यावर त्यावर काम करताना होणारा आनंद काही औरच असतो. पेंटिंग काढायची क्रेझ तिला आता तितकीशी वाटत नाही. उलट या कलाकारांनी झोकून देऊन साकारलेल्या कलाकृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम आपण करतो आहोत, हीच तिला मोठी जबाबदारी वाटते. हे काम केल्यावर वाटणारं समाधान कदाचित पेंटिंग काढून आलं नसतं, असं तिला वाटतं. फावल्या वेळात तिला बागकाम, बेकिंग, चित्रपट बघणं, गाणी ऐकायला आवडतात.

मधुरा आणि अनंतन यांनी सुरुवात केली तेव्हा कॉन्झव्‍‌र्हेशनविषयी खूप कमी जणांना माहिती होती आणि कॉन्झव्‍‌र्हेटर खूप कमी होते. त्यामुळे केवळ संग्रहालय किंवा संस्थांसाठीच काम न करता कलाप्रेमी लोकांसाठीही त्यांनी काम केलं. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘एएमएस फाईन आर्ट कॉन्झर्वेशन’ स्टुडिओ सुरू केला. ही कामं करताना मधुराला माहेर आणि सासरच्यांचा कायमच पाठिंबा मिळतो. ती सांगते की, ‘भुवनेश्वरला आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो, ते अनुपम शहा हे आमचे आदर्श आहेत. ते केव्हाही आमच्या हाकेला ओ देतात. त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळतं. त्यांच्यासह हैदराबादला इजिप्शिअन ममीचं काम करायला मिळालं. त्यांची नवीन गोष्टी शिकायची तयारी, व्यापक दृष्टिकोन, संकुचितपणाचा लवलेशही नसणं हे गुण शिकण्यासारखे आहेत. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा फाईन आर्टची पाश्र्वभूमी लागते. हे क्षेत्र दिसायला ग्लॅमरस वाटलं तरी शिस्त, चिकाटी, एकाग्रता, मेहनतीची तयारी हवी. पूर्वी लोकांना कॉन्झव्‍‌र्हेशनची फारशी माहिती नव्हती. आपल्याकडच्या वस्तूंचं जतन होऊ  शकतं, ही कल्पना नव्हती. त्यामुळे तुटफूट झाल्यावर ती वस्तू देऊन टाकणं किंवा सरळ टाकून देणं हे पर्याय निवडले जायचे. आता इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कलात्मक गोष्टींचं मूल्य आणि महती लोकांना कळायला लागली आहे.’

आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतांशी वेळा कॉन्झव्‍‌र्हेटर स्पेशलाइज्ड काम करतात. आपल्याकडे तेवढं स्पेशलायझेशन होत नाही. त्यामुळे कॉन्झव्‍‌र्हेटर विविध माध्यमांतली कामं करतो. वेगवेगळ्या नावाजलेल्या कलावंतांच्या कलाकृतींवर काम करणं हा एक वेगळा अनुभव असतो. ती सांगते की, ‘एका क्लायंटकडची मातीची फुलदाणी तुटली. ती नीट होऊ  शकत नाही असं वाटल्याने त्यांनी ती पिशवीत बांधून कचऱ्यात नेऊन टाकली. त्याच वेळी आम्ही तिथं गेलो तेव्हा फुलदाणी तुटल्याचं कळलं. ती रिस्टोर होऊ  शकते हे कळल्यावर त्यांनी ती तुकडय़ांची पिशवी आणून दिली. मग जिगसॉ पझलसारखे ते तुकडे मांडून पाहिले आणि जवळपास तीन महिन्यांनी सुंदर फुलदाणी तयार झाली. क्लायंटच्या आयुष्यातली ती पहिलीवहिली विकत घेतलेली फुलदाणी असल्याने त्यांची त्यात भावनिक गुंतवणूक खूप होती. फुलदाणी पुन्हा मिळाल्यावरचा त्यांचा आनंद अवर्णनीय होता. अशा अनेकांच्या आनंदाला आमच्या कलेचं परिमाण लाभल्यानं आम्हालाही खूप समाधान वाटतं. आम्ही सोलापूरजवळच्या नीरा नरसिंगपूरच्या मंदिरातील तीनशे वर्षांपूर्वीच्या गरुडाचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम केलं. या गरुडाची त्रिपुरी पौर्णिमेच्या सुमारास पालखी काढली जायची. खेडय़ातल्या गरुडाच्या कामासाठी मुंबईहूनच सगळं साहित्य नेलं होतं. पंधरा दिवसांच्या या कामाचा मोठा अनुभव गाठीशी जमा झाला.’

कला म्हणजे जीवन आहे. मिशन आहे. रात्रंदिवस कलेच्या जतन आणि संवर्धनाचा विचार मनात सुरू असतो. कला आमच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे.’

– मधुरा जोशी शेळके.

सिनेमा पोस्टर्सचे मुंबईसह अनेक ठिकाणी कलेक्टर्स आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांच्या पोस्टर्सचा संग्रहही केला जातो. या पोस्टर्सना मूळ स्वरूप दिलं जातं. टेक्स्टाईल कॉन्झव्‍‌र्हेशनचं कामही केलं जातं. मात्र धागे खूप नाजूक असल्याने त्याला चिक्कार वेळ द्यायला लागतो. खूपच युनिक आणि महत्त्वाची असतील तरच टेक्स्टाईलचं काम घेतलं जातं. एका राजघराण्यात लग्नप्रसंगी शामियाना बांधण्याची पद्धत आहे. या वेल्वेटच्या शामियान्यावर जरदोसी एम्ब्रॉयडरी होती. शामियाना खूपच वापरला गेला होता, त्यांनी तो पूर्ववत केला. याच क्लायंटकडचा चायनीज टेक्स्टाईलचा सोफा कॉन्झव्‍‌र्ह करून तो संग्रहालयात ठेवला गेला. विविध प्रकारची चित्रं, शिल्पकलेचं काम करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. पूर्वी ते पुस्तकांचं जतन आणि संवर्धनही करीत असत. त्यासाठी खूप मोठा सेटअप लागतो. वेळही प्रचंड लागतो. आता अगदीच दुर्मीळ पुस्तकावर काम केलं जातं. त्यांनी भारतभरातल्या टीसीएसच्या शाखांमधल्या चित्रांचं काम केलं आहे. विविध आर्ट गॅलरीज, ऑक्शन हाऊ ससोबत कामं सुरू आहेत. आपल्या कामाचा आवाका त्यांना वाढवायचा आहे. मोठी कॉन्झव्‍‌र्हेशन लॅब असावी, असा त्यांचा मानस आहे. कलासंस्कृतीसाठी चाललेल्या त्यांच्या अविरत कलात्मक धडपडीला मन:पूर्वक सदिच्छा!