गौरी अजिंक्य, नेपिअर, न्यूझीलंड

आम्ही गेली आठ वर्ष न्यूझीलंडच्या नेपिअर टाऊ नमध्ये असून येथेच रहिवासी म्हणून स्थायिक आहोत. सध्या न्यूझीलंड-भारत अशी दोन्हीकडे आमची काही प्रोजेक्ट्स सुरू आहेत. न्यूझीलंडविषयी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्याने तिथंच जायचं ठरवलं. पुढे त्या गोष्टी अनुभवासही आल्या. भारतात मी योग प्रशिक्षण घेतलं होतं आणि न्यूझीलंडमध्ये ‘स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रिक्रिएशन’विषयी शिक्षण घेतलं. क्वीन्सटाऊन हे खेळांचं माहेरघर मानलं जातं. विंटर आणि समरमध्ये नाव घ्यावं ते ते सगळे खेळ इथे खेळले जातात. आम्ही नेपिअरमध्ये राहण्याआधी क्वीन्सटाऊ न, न्यूप्लेमॉथ, ऑकलंड, वेलिंग्टन आदी ठिकाणी राहिलो. तेव्हा आम्हाला कुठेही सेटल व्हायचं नसल्याने सामान अगदी कमीत कमी असायचं. या भटकंतीदरम्यान इतर देशांतील काही बॅगपॅकर्स चांगले मित्रमैत्रिणी झाले. त्यांना भेटल्यावर त्यांची संस्कृती, मतं, त्यांच्या देशाविषयी कळायचं.

भारतीयांचं इंग्लिश चांगलं असतं, पण काही देशांमधील लोकांचं इंग्लिश तितकं चांगलं नसतं. मात्र ते प्रयत्नपूर्वक शिकतात. आपण त्यांच्यासोबत राहतो, काम करतो; पण काही वेळा काही मजेशीर गमती घडतात. कधी स्पेलिंगचे घोळ होतात तर कधी उच्चारांचे. नुकतेच क्वीन्सटाऊनला आलो होतो, तेव्हाची एक गोष्ट आठवतेय.. आम्ही बॅगपॅकिंग करत होतो. घरच्यांकडून पैसे घ्यायचे नाहीत, आपण आपल्या पायावर उभं राहायचं असा ठाम निश्चय केला होता. तेव्हा जेमतेम १० डॉलर शिल्लक होते. राहायला जागा नव्हती. शहर नवीन होतं. केवळ क्राइस्टचर्चहून येताना केलेल्या ईमेलला उत्तर मिळाल्याने एके ठिकाणी गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगून विचारलं की, वर्क आणि मिल अशा स्वरूपाचं काम मिळेल का? त्यांनी होकार दिला. तिथल्या कॉटेजला पेंटिंग केलं. आमच्यासारखे १० बॅगपॅकर्स तिथे राहात होते. पुढे ते आमचे अत्यंत जिवाभावाचे मित्र झाले. हे सगळे जण सुशिक्षित असून फिरण्याच्या आवडीमुळे चांगल्या नोकऱ्या सोडून बॅगपॅकिंग करतात. त्यासाठी त्या ठिकाणी मिळेल ते काम करून तो देश फिरतात. त्यांच्या देशांतून हॉलिडे-वर्क व्हिसा दिला जातो. त्यांच्यापैकी पॅट्रिक हा अर्जेन्टिनियन मित्र अगदी भावासारखा धावून आला. त्याच्या ओळखीने अजिंक्यला जॉब मिळाला. शिफ्टिंगसाठीही पॅट्रिकने आर्थिक मदत केली. पाठोपाठ मलाही जॉब लागला. अजूनही आम्हा साऱ्यांचे ऋणानुबंध कायम आहेत. सध्या ते दुसऱ्या देशात फिरत आहेत. भारतात यायचा त्यांचा बेत ठरत असून तेव्हा आम्ही भारतात असलो, तर नक्की भेटूच.

क्वीन्सटाऊनमध्ये आम्ही अडीच वर्ष होतो. न्यूझीलंडच्या या स्पोर्ट्स कॅपिटलमध्ये काम करणाऱ्यांत हॉलिडे-वर्क व्हिसावाले आणि बाहेरच्या देशांतले लोक असतात. तिथून वेलिंग्टनमध्ये सव्वा वर्ष होतो. मग नेपिअरमध्ये स्थायिक झालो. ते आमचं सेकंड होम झालंय. तिथे मी शिकायला होते. बऱ्याच ओळखी झाल्यात. तिथला माझा स्टुडिओ सध्या बंद आहे, पण अधूनमधून आमच्या तिथे फे ऱ्या होतात. भारतात व्यवसायानिमित्ताने माझी भ्रमंती सुरू असते. योगाचा प्रसार सध्या सर्वदूर होतो आहे. न्यूझीलंडमध्ये लोक मुख्यत्वे इंग्लिश आहेत. हा इमिग्रेशनने (स्थलांतरण) तयार झालेला देश आहे. तिथले मूळचे लोक माओरी आहेत. इंग्लिश फूडसह बीफ, मीट वगैरे मोठय़ा प्रमाणात खातात. थाय आणि कोरियन फूडही बऱ्यापैकी खातात. त्याचे लोकल व्हर्जन्सही तयार झाले आहेत. बटर चिकन इथे खूपच प्रसिद्ध आहे. अंड आणि फळांपासून तयार केलेलं ‘पावलोवा’ हे डेझर्ट तिथली खास डिश मानली जाते. शेतीप्रधान देश असल्याने प्रत्येक घरासमोरच्या गार्डनमध्ये भाज्या, फळांचा रोजच्या जेवणात वापर केला जातो. आपले जवळपास सगळे पदार्थ गेल्या पाच वर्षांत मिळायला लागले आहेत. शिवाय सणावारांच्या निमित्ताने लागणाऱ्या चीजवस्तूही मिळतात. भारतीय दागिने आणि ड्रेसची दुकानंही सुरू झाली आहेत. तिथल्या लोकांचा ओढा भारतीय आयुर्वेदिक पद्धतीने केलेल्या पदार्थाकडे जास्ती आहे. योगाचा प्रसार खूप झाल्याने आनुषंगिक आहार घेण्याकडे कल वाढतो आहे. ऑरगॅनिक शॉपमध्ये सगळ्या डाळी, ज्वारी-बाजरीचं पीठ, मसालेही मिळतात. ऋतुमानांनुसार केल्या जाणाऱ्या पेहरावाच्या रंगसंगतीत इंग्लिश रंगांसह काळा-पांढरा, करडा हे रंग अधिकांशी असतात, मात्र आशियाई लोकांची संख्या वाढत असल्याने अन्य रंगही दृष्टीस पडतात. इथली निसर्गसंपदा खूपच सुंदर आहे. झाडंझुडुपं तोडण्यापेक्षा त्याभोवती बांधकाम करायला प्राधान्य दिलं जातं. तिथले जैवविविधतेबद्दलचे कायदे खूपच कडक आहेत. आपल्याला फळं वगैरे नेता येत नाहीत कारण त्यातून कदाचित काही कृमी-कीटक वगैरे आल्यास तिथल्या वनस्पती सृष्टीला धोकादायक ठरू शकतं.

ब्रिटिशांच्या काळात तिथे गेलेल्या पंजाबी लोकांच्या आता तीन-चार पिढय़ा आहेत. दाक्षिणात्य आणि मराठी लोकही आहेत. बऱ्याच ठिकाणी मराठी मंडळं आहेत. मुंबईसह सांगली, कोल्हापूर, पुण्याहून मराठी लोक येत आहेत. ही मंडळी सगळे सणवार एकत्र साजरे करतात. फिरस्ती करताना अनेक देशांतील विविध क्षेत्रांतल्या लोकांशी संवाद साधला. तेव्हा आलेले अनुभव युनिक आहेत. केवळ भारतीय नव्हे तर दुसऱ्या देशांतील लोकांची विचारसरणी, दृष्टिकोन, निर्णयक्षमता, शिक्षण, समाज-संस्कृती, पालक-मुलांमधलं नातं असे अनेक कंगोरे न्याहाळायला मिळाले. या भटकंती दरम्यान भेटलेले बॅगपॅकर्स आणि आमच्यात मोठ्ठाच समान धागा होता तो फिरणं या गोष्टीचा. न्यूझीलंडमधल्या काही लोकांनी आम्हाला भारताविषयी बऱ्याच गोष्टी विचारल्या. त्यात काही गैरसमजही होते. त्यांच्या प्रश्नांमध्ये मुलींचं शिक्षण आणि करिअर, लग्न, धारावीची झोपडपट्टी वगैरे प्रश्न असायचे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटामुळे त्यांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले असावेत. त्यांचे गैरसमज दूर करत आपल्याकडच्या अनेक चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न आम्ही केला. तुलनेने साऊथ अमेरिकन कंट्रीजना भारताविषयी खूप माहिती आहे. आपण जे काही करतो त्याविषयी त्यांना कुतूहल आणि कौतुकही आहे.

नेपिअर टाऊ न असून त्यापासून थोडं अंतर गेल्यावर मोठी शेती आढळते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा इथे मोठा व्यवसाय आहे. शैक्षणिक संस्था पॉलिटेक्निकपुरत्या मर्यादित असतात. त्यामुळे मुलांना शहराच्या बाहेर जावं लागतं. एरवी कमवा आणि शिका, ही पाश्चात्त्य देशांत प्रवृत्ती आढळते. न्यूझीलंडमध्ये तर विद्यार्थ्यांना मोफत कर्जही दिलं जातं. काही स्थानिक वृद्ध लोक वगळता बाकीचे फारसे कुठलाही धर्म अनुसरत नाहीत. चांगल्या गोष्टी चटकन स्वीकारल्या आणि आचरल्या जातात. फिटनेसविषयी खूपच जागरूकता आहे. नेपिअरमध्ये घरातला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जिममध्ये जातो. शिवाय योगा, धावणं वगैरेही असतं. प्रत्येकालाच स्वत:ची कामं स्वत:ला करावी लागतात. ते करतानाही एक प्रकारचा उत्साह जाणवतो. आम्हालाही स्वावलंबनाची सवय होतीच. लहानपणापासून मुलांना विविध विषयांची माहिती दिली जाते. ही मुलं दिलखुलास बोलतात, भरपूर फिरतात. त्यामुळे त्यांच्या गाठीशी अनेक अनुभव जमा होतात. व्यावहारिक ज्ञान खूप असतं. तिथली बहुतांशी मुलं हॉस्पिटॅलिटी, शेफ, आयटी, शेती, बांधकाम आदींमधील करिअर प्रामुख्याने निवडतात. स्पोर्ट्स इंडस्ट्री खूप मोठी असून प्रत्येक खेळाला इथे महत्त्व दिलं जातं.

ट्रेकिंग, हायकिंग, ट्रेल्स या अ‍ॅक्टिव्हिटीज त्यांच्या मनोरंजनाचा भाग आहे. तिथला साऊ थ आयलंड अगदी स्वर्गासमान भासतो. तिथली वनस्पती सृष्टी फार आगळीवेगळी आहे. ‘द हॉबिट’ वगैरे हॉलीवूड चित्रपटांतली युनिक सिनरी खरीखुरी अस्तित्वात असून ती न्यूझीलंडमधली आहे. तिथल्या जंगलांमधला काही भाग अद्यापही अनाघ्रात असून तिथे ट्रेल्स नेले जातात आणि फारसं न रमता लगेच बाहेर यावं लागतं. काही काही ट्रेल्स आपले आपणही करू शकतो. त्यामुळे आपण एकदम अनोख्या विश्वात आल्याचा भास काही काळ होतो. तिथे पब कल्चर आहे. नेपिअरमध्ये बऱ्याच वाइनरीज आहेत. हॉकल्स बे या ठिकाणी वाइन टेस्टिंग ट्रेल्स नेले जातात. माऊं टन बाईकिंग, बाईकिंग होतं. दर महिन्याला काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटी केली जाते. मॅरेथॉन, ट्रायथॉन आहेत. मीही काही मॅरेथॉन धावले आहे. वेलिंग्टनमध्ये होणारा ‘वर्ल्ड ऑफ वेअरेबल आर्ट’ (वॉव) हा फॅशन शो युनिक आणि प्रसिद्ध आहे. नेपिअरमध्ये फेब्रुवारीत ऑर्टडेको फेस्टिव्हल साजरा केला जातो. तेव्हा १९३० मधलं वातावरण निर्माण केलं जातं. ते पाहायला बाहेरच्या देशांतून लोक येतात. त्या काळातले पेहराव, गाडय़ा यांची परेड होते आणि नृत्य केलं जातं. वेलिंग्टनमध्ये तरुणांची संख्या अधिक असून ती हॅपनिंग प्लेस आहे. तर नेपिअरमध्ये कुटुंबवत्सल मंडळींचं प्रमाण अधिक आहे. माझं शिक्षण तिथं झालं आणि माझा योग स्टुडिओ तिथंच सुरू झाला होता. सध्या मी स्काइपवरून तिथल्या लोकांना योगा शिकवते आहे. न्यूझीलंडमधलं निसर्गसौंदर्य आणि तिथल्या वास्तव्यात जिवाभावाची मिळालेली मित्रमंडळी या ऋणानुबंधांच्या गाठी असाव्यात, असं वाटतं.