सगळीकडेच अशाच पद्धतीने केस ठेवणारे तरुण दिसायला लागल्यानंतर हे प्रकरण नक्की काय हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हाती लागली पॉम्पडोर’. या हेअरस्टाइलचं नाव पॉम्पडोरआहे आणि अनेकदा जगभरातील फॅशनची मूळं ही फ्रेंचांपर्यंत जाऊन पोहोचतात. तसंच ही हेअरस्टाइलही तिथूनच आली आहे. आणि सध्या ती मुलांमध्ये प्रसिद्ध असली तरी या स्टाइलची जन्मदात्री फ्रेंच ललना आहे हे विशेष!

लाइक्समध्ये मिलेनियर असलेल्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या फोटोंनी इन्स्टाग्रामवर सध्या धुमाकूळ घातलाय. या फोटोजमधली शाहिदची स्टाइलबाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. त्याच्या कपडय़ांसोबतच चर्चा असते ती त्याच्या ट्रेण्डी हेअरस्टाइलची. शाहिदच्या प्रत्येक फोटोत त्याची हेअरस्टाइल उठावदार दिसते. एका बाजूला भरगच्च आणि दुसऱ्या बाजूला सफाचट अशी त्याची हेअरस्टाइल आहे. आणि का कोण जाणे पण त्याच्या सगळ्याच स्टाइलप्रमाणे केसांची ही स्टाइलसुद्धा फॉलो झाली असून अशा प्रकारे हेअरस्टाइल करण्याचं वेडच गल्लीबोळातील तरुणांना लागलं आहे. सगळीकडेच अशाच पद्धतीने केस ठेवणारे तरुण दिसायला लागल्यानंतर हे प्रकरण नक्की काय हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हाती लागली ‘पॉम्पडोर’. या हेअरस्टाइलचं नाव ‘पॉम्पडोर’ आहे आणि अनेकदा जगभरातील फॅशनची मूळं ही फ्रेंचांपर्यंत जाऊन पोहोचतात. तसंच ही हेअरस्टाइलही तिथूनच आली आहे. आणि सध्या ती मुलांमध्ये प्रसिद्ध असली तरी या स्टाइलची जन्मदात्री फ्रेंच ललना आहे हे विशेष!

सध्या गल्लीबोळातल्या सलूनमध्ये तुम्हाला बाहेर ‘पॉम्पडोर’ हेअरस्टाइल करून मिळेल, असा फलक लावलेला दिसतो. अनेक मुलं त्यातलं कितपत कळतंय याची शंका यावी इतके त्या स्टाइलच्या प्रेमात पडलेले दिसतात. काही वेळा ‘यहाँ से कम करो और यहाँ से लंबा रखो..’, असं फक्त त्या कारागिराला सांगितलं जातं. एका बाजूचे केस वाट्टेल तसे वाढवले जातात. ते खरंच ओंगळवाणं दिसत असतं. मात्र, पॉम्पडोर करण्याच्या हौसेला मोल नसतं. या पॉम्पडोरला वेगवेगळी नावं आहेत. त्याचे अगणित प्रकार आहेत. मात्र एका बाजूला भरगच्च आणि दुसऱ्या बाजूला बारीक असणारी ही हेअरस्टाइल पॉम्पडोर याच नावाने प्रसिद्ध आहे. त्यामागील कथाही तितकीच रोचक आहे. पण सध्या आपण या हेअरस्टाइलचा या आणि पुढच्या वर्षांतला ट्रेण्ड काय आहे ते समजून घेऊ.

२०१७-२०१८ या कालावधीत ट्रेण्डमध्ये असलेल्या हेअरस्टाइलमध्ये पॉम्पडोरच्या विविध प्रकारांचा समावेश आहे. शॉर्ट पॉम्पडोर, टेक्स्चर्ड पॉम्पडोर, स्वीप बॅक, पॉम्प फेड, पॉम्प हॉक या पाच हेअरस्टाईल्सचा त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

स्त्रियांपासून पुरुष केशरचनेपर्यंतचा प्रवास

१८व्या शतकात ही केशरचना मुळात स्त्रियांची केशरचना म्हणून प्रसिद्ध होती. बेट्टी डेविस, बेटी ग्रेबेल या अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटांसाठी ‘पॉम्पडोर’ हेअरस्टाइल केली होती. यात त्या अत्यंत आकर्षक दिसत होत्या. चार्ल्स दाना जिब्सन या चित्रकाराच्या ‘जिब्सन गर्ल्स’ यांचं सौंदर्य ‘पॉम्पडोर’ केशरचनेत सामावलेलं होतं. त्यानंतर १९५० आणि १९६०च्या दशकात ती पुरुषांची केशरचना म्हणून प्रसिद्ध होऊ लागली. २१व्या शतकात मात्र या केशरचनेला स्त्री, पुरुष दोघांनीही आपलंस केलंय.

सेलिब्रिटी पॉम्पडोर

गायक, संगीतकार, अभिनेता, द किंग ऑफ ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’ एल्विस प्रिस्ले याने पॉम्पडोरला केशरचनेच्या दुनियेत मानाचं स्थान मिळवून दिलं. अभिनेता-दिग्दर्शक जॉनी डेप याची तरुणपणीची केशरचना तर गायक ब्रुनो मार्स, फुटबॉलपटू डेविड बेकहॅम यांची सध्याची केशरचना पॉम्पडोर आहे. पॉप गायिका रिहाना, केशा, अभिनेत्री अ‍ॅनी हॅथवे यांनाही पॉम्पडोर केशरचनेचा मोह आवरता आलेला नाही. बॉलीवूडमध्ये अभिनेता शाहिद कपूर, अर्जुन कपूर, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन तसेच गायक सोनू निगम यांनी पॉम्पडोर हेअरकट केलेले आहेत किंवा सातत्याने करतायेत.

तुमचं व्यक्तिमत्त्व आणि केशरचना

केशरचना तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पॉम्पडोर हेअरकट करणाऱ्यांना ट्रेण्डी आणि कुल राहायला आवडतं. तुम्हाला नवीन प्रयोग करण्याची आवड आहे हे त्यातून समजतं. हा हेअरकट क्लासी असला तरी तो करताना तुम्ही तुमची चेहरेपट्टी लक्षात घेतली पाहिजे. तुमचे गाल वरती असतील किंवा चेहरा गोलाकार असेल तर हा हेअरकट तुम्हाला चांगला दिसणार नाही. याउलट तुमचा चेहरा आयताकृती असेल, चेहऱ्याची रचना सडपातळ प्रकारात मोडणारी असेल तर हा हेअरकट तुम्हाला नक्कीच छान दिसेल.

मुख्य म्हणजे हा हेअरकट तुमच्या खिशासाठी एकाच वेळी परवडणारा आणि जडही आहे. मागणी तसा पुरवठा या न्यायाने प्रत्येक शहरात शाखा असणाऱ्या सलोनमध्ये प्रत्येक हेअरकटसाठी स्टाईलिस्ट, मास्टर स्टाईलिस्ट, आर्ट डिरेक्टर असे हेअरस्टाईलिस्ट उपलब्ध असतात आणि त्यानुसार पैसेही आकारले जातात. ही किंमत अनुक्रमे २०० ते ३०० रुपये, ३०० ते ५००, ७०० आणि त्या वरती अशी असते. पॉम्पडोरसाठीही हीच किंमत सर्वसाधारणपणे सर्वत्र आकारली जाते. अर्थात यात तुमच्या केसांच्या लांबीमुळेही फरक पडतो. पण पॉम्पडोर फक्त केस कापण्यापुरता मर्यादित नाही. हा हेअरकट केल्यावर त्याची काळजी घेणं, निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. ज्यात विशिष्ट प्रकारचा कंगवा (टुथ कॉम्ब), श्ॉम्पू, ब्लो ड्रायर, हेअर जेल, हेअरस्प्रे, हेअरक्रीम यांचा समावेश आहे. यातील टुथ कॉम्ब वगळता प्रत्येक वस्तूची किंमत एक हजाराच्या आसपास किंबहुना जास्तच आहे. म्हणजे पॉम्पडोरची निगा राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा खर्च ५ ते १० हजारांपर्यंत जातो. त्यामुळे या हेअरकटचा एकंदर नफा पाहता हेअर सलून आणि उत्पादन कंपन्यांकडून या हेअरकटचं मार्केटिंग मोठय़ा प्रमाणावर केलं जातंय हे लक्षात येतं.

मादाम द पॉम्पिदोर

अठराव्या शतकाच्या मध्यावर फ्रान्समध्ये एका ललनेचे प्रस्थ वाढले. याच त्या मादाम पॉम्पिदोर किंवा पॉम्पिदू. तेव्हाचे राजे पंधरावे लुई यांची खास मर्जी मादामनी संपादन केली होती. राजाचा सारा दिनक्रम त्याच ठरवीत. म्हणजेच त्यांच्याशिवाय राजाचे पान हलत नसे. जीन आंत्वानेत पॉइसाँ हे मादाम पॉम्पिदूचे खरे नाव. पण पॉम्पिदू नावाने त्या प्रसिद्ध होत्या. डोक्याच्या मध्यभागी केसांचा फुगा काढून बाजूने केस रोल करून पाठीवर सोडणे ही त्यांची केशभूषा तर आणखीच प्रख्यात होती. हीच ती ‘पॉम्पडोर’ केशभूषा. त्या वेळी भपका, बडेजाव यांचे जणू प्रतीक बनलेली ही केशभूषा आज तरुणांमध्ये सोपी, बिनत्रासाची आणि तरीही स्मार्ट म्हणून प्रिय आहे.

शॉर्ट पॉम्पडोर : यामध्ये केसांची लांबी मध्यम आखूड असते. केस डोक्याच्या मधल्या भागात भरगच्च असतात व बाजूने बारीक कापलेले असतात.

टेक्स्चर्ड पॉम्पडोर : या हेअरस्टाइलच्या नावातच सगळं आहे. केसांना एक प्रकारचं टेक्स्चर दिलेलं असतं. चेहऱ्यावर एक छोटीशी बट आल्याने ही हेअरस्टाइल पॉम्पला एक वेगळा लुक देते.

स्वीप बॅक : पॉम्पडोरमधील तुमच्या पॉम्पची उंची या हेअरस्टाइलमध्ये महत्त्वाची ठरते.

पॉम्प फेड : पॉम्पडोर हेअरस्टाइलला अधिक आधुनिक करण्याचा प्रयत्न या हेअरकटच्या निमित्ताने केला गेला आहे. यामध्ये तुमच्या कपाळाच्या बाजूचे केस फेड म्हणजेच विरळ होत जातात. यामध्ये पॉम्पला स्पाईकस्टाइल देण्याचीही सोय आहे.

पॉम्प हॉक : मोहहॉक हेअरकटची छबी सध्या बऱ्याच हेअर ट्रेण्ड्समध्ये पाहायला मिळते आहे. पॉम्पडोर आणि मोहहॉकचा मेळ साधत पॉम्पहॉक या हेअरकटचा शोध लागलाय.

viva@expressindia.com