18 March 2019

News Flash

‘कट्टा’उवाच : सगळ्यांआधी तूच !

‘बेब’ किंवा ‘बेबी’ या प्रेमाने उच्चारल्या जाणाऱ्या संबोधनाचा अपभ्रंश म्हणूनही ‘बे’ ओळखला जातो.

आजकालच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट ही थेट टोकाची असते. आवड, प्रेम, मैत्री अशा सगळ्याच गोष्टी थेट एका ‘एक्स्ट्रिमिटी’च्या असतात. मग त्यातून प्रत्येक नात्याला काही तरी विशेष नाव देणं किंवा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या संज्ञेत बसवणं अशा ‘कौतुकाच्या’ गोष्टी केल्या जातात. मग बॉयफ्रेंडला ‘बच्चा’ म्हणण्यापासून ते बाबाला ‘पॉप्स’ म्हणण्यापर्यंत सगळ्या प्रकारे संबोधनं दिली जातात. त्यातच एक संबोधन ‘बे’; अर्थात इंग्लिशमध्ये!

या ‘बे’चं स्पेलिंग केलं जातं ‘बीएई’ आणि त्याला सर्वसाधारणपणे ‘बीफोर एनीवन एल्स’ याचं संक्षिप्त रूप मानलं जातं. एखाद्या व्यक्तीवर आपल्या असलेल्या प्रेमाचं हे संबोधन! सगळ्या सोशल मीडियावर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतच्या फोटोच्या हॅशटॅगमध्ये ‘बे’ हा शब्द एकदम ट्रेण्डिंग झाला. ‘बेब’ किंवा ‘बेबी’ या प्रेमाने उच्चारल्या जाणाऱ्या संबोधनाचा अपभ्रंश म्हणूनही ‘बे’ ओळखला जातो. सुरुवातीला केवळ बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसाठी वापरला जाणारा हा शब्द नंतर आपल्या आवडत्या नातेवाईकांसाठीही वापरला जाऊ  लागला. ‘मदर्स डे’ला आईसोबत गळ्यात गळे घालून फोटो काढायचा आणि ‘माय मॉम इज माय बे’ वगैरे कॅप्शन देऊन ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करायचे अशी लाट आली. इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट वगैरे ठिकाणी सगळीकडे कपल्सचे फोटोज अशा कॅप्शनसहित पाहून बहुतेक सगळ्या ‘सिंगल्स’ना ‘कॉम्प्लेक्स’ आला असावा. त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो पोस्ट करून त्याला ‘बे’ ही कॅप्शन द्यायला सुरुवात केली. मित्रांच्या ग्रुपला उद्देशून ‘बे’चं अनेकवचन ‘बेज’ करून मित्रांनाही ‘बीफोर एनीवन एल्स’ची जागा देऊ  केली.

ही सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीची जागा तरुणांनी हळूहळू आपल्या सगळ्यात आवडत्या कोणत्याही गोष्टीला द्यायला सुरुवात केली. घराचा एखादा आवडता कोपरा ते एखादा आवडता पदार्थ अशा सगळ्यांना हे बिरुद बहाल केलं गेलं. ‘धिस प्लेस इज बे’पासून ते ‘माय फूड, माय बे’ इथपर्यंत अनेक कॅप्शन्स आणि अनेक हॅशटॅग व्हायरल झाले. बेबमधला केवळ एक बी काढून टाकून काय मोठी क्रांती घडवली? अशा प्रकारच्या अनेक नकारात्मक टिप्पण्याही या ट्रेण्डवर तरुणाईच्याच दुसऱ्या वर्गाने केल्या.

कोणी आपल्या कामाला, कोणी आपल्या अभ्यासाच्या विषयाला तर कोणी आपल्या वाहनाला ‘बे’ म्हटलं आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम जगजाहीर केलं. तसंच माझं ‘रायटिंग इज माय बे’ आणि तुमचं ‘रीडिंग इज माय बे’!

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:36 am

Web Title: bae word menaing