काही ब्रॅण्ड त्यांच्या नावाचा असा करिश्मा दाखवतात की त्यांच्या मूळ नावाचा अर्थ काही असो, आपण ते नाव ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर ते उत्पादनच उभं राहातं. अ‍ॅम्बेसेडर म्हणजे सदिच्छादूत हा अर्थ पूसट करून अ‍ॅम्बेसेडर म्हणजे कार हे समीकरण जुळवणारा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर भारतीय मनाच्या खूपच जवळचा आहे. या अ‍ॅम्बेसेडरची कहाणी जितकी जिव्हाळ्याची तितकीच हुरहुर लावणारी. कारण हा ब्रॅण्ड आता आपल्या आठवणींतच उरलाय. या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरची कहाणी एखाद्या संस्थानिकाच्या कहाणी सारखीच..खूप वैभवानंतर गतस्मृतीत गेलेली.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सी. के. बिर्ला ग्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली. ऑक्सफर्डमधल्या मॉरिस मोटर लिमिटेडने बनवलेल्या मॉरिस ऑक्सफर्ड सिरिज थ्री या मॉडेलने त्याकाळात सर्वाचीच मनं जिंकली होती. या मॉडेलवर आधारित कार भारतात हिदुस्थान मोटर्सने निर्माण करायचे ठरवले आणि अवतरली ही अ‍ॅम्बेसेडर कार. हिची नाळ इंग्लंडच्या कार मॉडेलशी जुळली असली तरी भारतात हिचे उत्पादन करताना अस्सल भारतीय मानसिकतेचा विचार निश्चितच झाला होता. भारतात यशस्वीपणे निर्माण झालेला हा पहिला कार ब्रॅण्ड.

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
first general election of india 1952 information
देशातील पहिली निवडणूक कशी पार पडली होती? काय होती आव्हाने?
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?

कार म्हणजे चैन किंबहुना श्रीमंती समजली जाण्याच्या काळात ही भलीमोठी कार रस्त्यावर उतरली असेल तेव्हा तिच्याकडे किती कौतुकाने पाहिलं गेलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या ताफ्यातल्या शुभ्र पांढऱ्या किंवा काळ्याभोर अ‍ॅम्बेसेडरने जी राजमान्यता, जे यश मिळवले ते क्वचितच कुठल्याही दुसऱ्या कार ब्रॅण्डला मिळालं असेल. अ‍ॅम्बेसेडर बाळगणं हा स्टेटस सिम्बॉल बनला. लाल दिव्यासह ऐसपैस धावणाऱ्या अ‍ॅम्बेसेडरची शान इतकी वाढली की, १९८४ मध्ये वर्षांला २४००० कार्सचं उत्पादन कंपनी करत होती. हा आकडा त्या काळाच्या तुलनेत विलक्षण होता.

ब्रिटिश मूळ असलं तरी अ‍ॅम्बेसेडर ही निश्चितच पूर्णपणे भारतीय वळणाची होती. भारतीय रस्त्यांची नस व मानसिकता तिला उत्तम कळली होती. दणकट शरीर, जबरदस्त इंजिन, विश्वासार्ह सुरक्षा यामुळे ही भारतीयांची शान बनली. King of the Indian road हे या कारचं केलेलं वर्णन अचूक आहे. अ‍ॅम्बेसेडर हे भलंमोठं नाव प्रेमाने ‘अ‍ॅम्बी’ झालं. एक काळ होता, चित्रपट असो वा वास्तवातील राजकारणी नेत्याचं आगमन अ‍ॅम्बेसेडरशिवाय अशक्य होतं. आपल्याकडे ‘गजान्तलक्ष्मी’ ही संकल्पना दारात हत्ती झुलावा इतकी संपत्ती असणाऱ्या धनिकासाठी वापरली जाते. त्याप्रमाणेच दारात अ‍ॅम्बेसेडर उभी असणं सन्मानचिन्ह ठरलं.

हिंद मोटर्सने गुजराथमधला त्यांचा कारखाना या कारसाठी खास पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथे हलवला. आजही उत्तरपाराजवळच्या एका रेल्वे स्टेशनचं नाव ‘हिंद मोटर्स’ असं आहे. अ‍ॅम्बेसेडर कारचं भारतीय मनातलं स्थानच यातून अधोरेखित होतं. आपण ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असा शब्दप्रयोग करतो; पण अ‍ॅम्बेसेडर हे नावच एक ब्रॅण्ड असल्याने कदाचित त्यांना विशिष्ट लोगोची गरज पडली नाही. मात्र सर्वाधिक काळासाठी सातत्याने वापरली गेलेली नेमप्लेट याकरता अ‍ॅम्बेसेडरचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्या काळात रॅली व रेसिंग, दोन्हीकरता ही कार वापरली जायची हे कळल्यावर गंमत वाटते.

एकीकडे अ‍ॅम्बेसेडरचा हा श्रीमंती थाट तर दुसरीकडे काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या रूपातून सर्वसामान्यांच्या मनामनात केलेलं घर ही या ब्रॅण्डची दुसरी ओळख. टॅक्सी पकडताना केवळ मागून अ‍ॅम्बेसेडर टॅक्सी येतेय याकरता समोरची रिकामी टॅक्सी तुम्हीही सोडून दिली असेल तर ही We all are in love with Amby till eternity.

काळ बदलला. लोकांच्या गरजा बदलल्या. छोटय़ा सुटसुटीत कार्ससाठी मागणी वाढली व मग मागणी अभावी २०१४ पासून अ‍ॅम्बेसेडर कारचं उत्पादन बंद झालं. एका दिमाखदार पर्वाचा शेवट झाला. आजही नेटवर कुठेकुठे अ‍ॅम्बेसेडरचं उत्पादन सुरू होण्याची शक्यता किंवा अमुक यांनी अ‍ॅम्बेसेडरचे हक्क विकत घेतले. अशा बातम्या वाचताना मनाला दिलासा मिळतो. हे प्रत्यक्षात येईल वा नाही कल्पना नाही, पण आजही अ‍ॅम्बेसेडर कार नुसतं म्हटलं तरी तो फुगीर, भक्कम, शाही थाट कारच्या रूपात डोळ्यासमोर तरळतो.. तिचे चाहते मग तिच्यासोबतच्या प्रवासाच्या आठवणी गुणगुणत राहतात..

एक दूरसे आती है, पास आके पलटती है

एक राह अकेलीसी, रूकती है ना चलती है

ये सोचके बैठी हूं, एक राह तो वो होगी

तुमतक जो पहूंचती है, इस मोडसे जाती है

viva@expressindia.com