11 December 2017

News Flash

ब्रॅण्डनामा : टीव्हीएस स्कूटी

भारतीय स्त्रीला प्रवासाच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात हिचा मोठा वाटा आहे.

रश्मि वारंग | Updated: September 22, 2017 12:36 AM

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

एखादी वस्तू किंवा उत्पादन जेव्हा आपल्या एकूणच समजुती धारणांना बदलून टाकतं तेव्हा ते फक्त उत्पादन उरत नाही तर ते समाजातील बदलाचं प्रतीक बनतं. स्त्रीवर्गाच्या दुचाकी चालवण्याच्या इच्छेला सकारात्मकरीत्या गतिमानता देणारं असंच एक उत्पादन म्हणजे टीव्हीएस स्कूटी. भारतीय स्त्रीला प्रवासाच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात हिचा मोठा वाटा आहे. गर्दीतही एकटीने चालण्याचा विश्वास देण्यात स्कूटीचा वाटा मोठा आहे.

टी. व्ही. सुंदरम अय्यंगार यांच्या चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीने १९८० साली मोपेड हे स्कूटर मॉडेल बाजारात आणलं आणि कंपनी हळू हळू स्थिरावली. स्कूटी हे स्कुटरपेक्षा वजनानं हलकं असलेलं मॉडेल कंपनीने १९९४ साली बाजारात आणलं तेव्हा ते स्त्री-पुरुष दोघांसाठीही होतं. पण दोन वर्षांत कंपनीसमोर आलेल्या आकडेवारीमध्ये कंपनीच्या हे लक्षात आलं की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या खरेदीचे प्रमाण विलक्षण आहे आणि मग कंपनीने १९९६ साली स्कूटीला नव्याने बाजारात आणलं. ही स्कूटी भारतीय स्त्रियांची उंची, शरीरयष्टी लक्षात घेऊन तयार केली गेली होती. वास्तविक स्त्री दुचाकी चालकांचं प्रमाण जास्त नसण्याच्या त्या काळात कंपनीचा हा प्रयोग धाडसी होता, पण त्यांनी तो केला आणि तो यशस्वी ठरला. हे यश फक्त कंपनीचं नव्हतं तर त्याचा फायदा स्त्रियांनाही झाला. जवळपासची अनेक कामं उरकताना तसंच सहज चक्कर मारताना फिरण्यासाठी हक्काची दुचाकी मिळाली. हे करण्यासाठी या ब्रॅण्डने घेतलेले कष्ट नमूद करण्यासारखे आहेत. दुचाकी ही महिलांची गरज तर होती, पण त्यांना त्यासाठी शिकवणारं, प्रोत्साहन देणारं कोणी नव्हतं. हे लक्षात घेऊन टीव्हीएस कंपनीने ८० सेंर्टसमधून स्कूटी चालवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी ४२,००० महिला प्रशिक्षक नेमल्या. हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं.

स्कूटीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता स्कूटी पेप, स्कूटी पेप प्लस, स्कूटी झेस्ट, स्कूटी स्ट्रेक, स्कूटी टिन्झ अशी अनेक मॉडेल्स त्यानंतर आली. लीड अ‍ॅसिड बॅटरीवर चालणारी ‘टिन्झ इलेक्ट्रिक’ पर्यावरणपूरक होती. तर स्कूटी झेस्ट ११० वरून तरुण स्टंटरायडर अनाम हशीम हिने हिमालयातील खारदुंगला खिंडीपर्यंत केलेल्या प्रवासाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली.

स्कूटीची मोहिनी सर्वसामान्य स्त्रियांनाच नाही तर बॉलीवूडमधील मंडळींनाही जाणवली. ‘गजनी’ सिनेमातील नायिका आसिन ही याच स्कूटीवरून फिरते. तर ‘रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ द इयर’मध्ये वडिलांनी प्रेमाने दिलेली गुलाबी स्कूटी रणबीर कपूर पूर्ण पिक्चरभर फिरवतो. स्कूटीच्या जाहिरातींमध्येसुद्धा कायमच मुलींना आणि महिलांना झुकतं माप दिसतं. महिलांविषयी एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. स्कूटीवरून फिरणारी अनुष्का शर्मा, फक्त मुलींनाच ड्रेसकोड का? असा प्रश्न विचारते. तर प्रीती झिंटा स्कूट पेपच्या जाहिरातीला ‘फर्स्ट लव्ह’ म्हणते. टीव्हीएस कंपनीचं ब्रीद आहे, इन्स्पिरेशन इन मोशन. स्त्रीवर्गाला या गाडीने ज्या पद्धतीने प्रेरणा दिली ते पाहता त्यांचं हे ब्रीदवाक्य अगदी योग्य आहे. स्कूटी झेस्टची टॅग लाइन आहे- बी फर्म, बी फन.

महिलांचं गाडी चालवणं, हा अनेकांच्या विनोदाचा किंवा उपहासाचा भाग असतो, पण वाहन चालवणं, बाईला एक वेगळ्या प्रकारचा मोकळेपणा देतं. बंधनातून एक सुटका देतं. दुचाकी चालवणाऱ्या महिलांसाठी गाडी ही फक्त सोय नसते तर त्यांच्या हक्काची जागा असते, मैत्रीण असते. अनेकजणी गाडीसोबत मनापासून रमलेल्या असतात. दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वाहत राहण्यापेक्षा स्वतच स्वतचा रस्ता शोधण्याचा आनंद अनेकींच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो. हा आनंद त्यांना पुरेपूर लुटू देण्यात स्कूटीचा वाटा मोठा आहे. इतका मोठा की, कोणत्याही स्त्रीविशेष दुचाकीला ब्रँड वेगळा असला तरी स्कूटीच म्हटलं जातं. अगदी टूथपेस्टला कोलगेट म्हणण्यासारखंच.

पुराणकाळातील दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या देवी सिंहारूढ, हंसवाहिनी होत्या. आधुनिक स्त्रीने काळानुसार आपलं वाहन निवडलं आहे. त्या दुर्गेचा, सरस्वतीचा अंश असलेली ‘ती’ जेव्हा स्कूटीला किक् मारून निघते तेव्हा..

चार पे भारी लागे,

होके तेज कटारी

आगे चली चली चली

अशी तेजतर्रार दिसली तर नवल नाही.

viva@expressindia.com

First Published on September 22, 2017 12:36 am

Web Title: brand information on tvs scooty tvs scooty models