परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. त्या वेदनेत अधूनमधून राग, अपमान, हताशपणा, भीती अशा इतरही अनेक भावना चमकून जात होत्या. तो बोलायला लागला, ‘आमचं चौकोनी कुटुंब, आई-बाबा, मी आणि माझी छोटी बहीण. बाबांची चांगल्या कंपनीत नोकरी, आई हाउसवाइफ. खूप मजा करायचो आम्ही. रोज रात्री कितीही उशीर झाला तरी आमच्याशी मस्ती केल्याशिवाय बाबा झोपायचे नाहीत. रविवारी टेकडीवर किंवा किल्ल्यावर ट्रेकिंगला जायचो. माझे बाबा नेहमी सगळ्यांच्या पुढे असायचे, केवढा अभिमान वाटायचा मला त्यांचा!’

‘ते गोष्टी खूप छान सांगायचे. अजूनही त्यांनी सांगितलेली रामायणाची गोष्ट आठवतेय. चांगली महिनाभर चालली होती. मी स्टेट लेव्हलला टेनिस खेळतो. ती आवड त्यांनीच जागवली माझ्यात. कुठल्याही मॅचला घेऊन जायला त्यांची ना नसायची. आईच्या जेवणाचं नेहमी कौतुक. आईलाही त्यांना नवनवीन पदार्थ खाऊ घालायची जाम हौस,’ तो बोलतच होता. ‘कधी हे सगळं बदलत गेलं कळलंच नाही. बहुधा त्यांची दुसऱ्या गावी एक वर्षांकरता बदली झाली तेव्हापासूनच. परत आलेले बाबा वेगळेच होते. हळूहळू ते ऑफिसमधून उशिरा घरी यायला लागले. पूर्वी पार्टीत कुणीतरी आग्रह केला म्हणून एखादा पेग घ्यायचे ते कधी कधी. पण आता काही वेळा घरी आल्याआल्या त्यांच्या तोंडाला दारूचा वास यायला लागला. जेव्हा पहिल्यांदा कळलं बाबा अल्कोहोलिक आहेत म्हणून, तेव्हा धक्काच बसला. मग भीती वाटली आणि शेवटी राग यायला लागला. आईची थट्टा करणारे, तिला फिरायला घेऊन जाणारे बाबा तिच्यावर सारखे डाफरायला लागले, एकदा तर तिच्यावर हातही उचलला त्यांनी. पूर्वी मी आणि माझी बहीण त्यांच्या घरी येण्याची किती वाट बघायचो! आता मात्र ते आले की आम्ही घाबरून चूपचाप बसायला लागलो’.

‘अचानक कधीतरी आमचे ते जुने बाबा दिसायचे. एखाद्या दिवशी आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन यायचे, आईला सॉरी म्हणायचे, ‘माझं चुकलं’ म्हणून नाक घासायचे. आम्हाला सुरुवातीला असं काही झालं की खूप आशा वाटायची. परत पूर्वीसारखं सगळं होईल असं वाटायचं. पण आता कळून चुकलंय, असं काही होणार नाहीये. माझ्या बाबांना व्यसन लागलंय. मी आईला कितीदा तरी म्हटलं, ‘आपण का राहतो इथे? निघून जाऊ यात कुठेतरी.’ पण आई नोकरी करत नाही. त्यामुळे घराबाहेर पडायची तिची तयारी नाही. आता मलाच काहीतरी करायला लागणार. पण हे सगळं किती अवघड आहे. नोकरी मिळण्याची मारामार झालीय. अभ्यासातही लक्ष लागत नाहीये. आजकाल तर मला आईचाही राग यायला लागलाय.’

लहानपणी आपले आईबाबा म्हणजे आपलं सर्वस्व असतं. त्यांचं नेहमी बरोबर असतं, त्यांना सगळं कळतं याविषयी आपली खात्री असते. त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. पण जेव्हा या विश्वासालाच तडा जातो, तेव्हा पायाखालची जमीन सरकते. अशा वेळी चिडचिड होते, आरोप प्रत्यारोप केले जातात. पण हे सगळं निरुपयोगी ठरतं, कारण व्यसन हा एक आजार आहे. त्यात अडकणं जितकं  सोपं तितकं  त्यातून बाहेर पडणं महामुश्कील. होणारा त्रास फक्त व्यसनी माणसालाच होतो असं नाही, तर त्याचं कु टुंब, नाती, दोस्ती, नोकरी-व्यवसाय असे सगळेच यात बळी पडतात. पैशाची घडी विस्कटते ती वेगळीच. पण सगळ्यात जास्त दुष्परिणाम होतो तो मुलांवर. ती गोंधळून जातात. घरातल्या सततच्या भांडणांनी, टेन्शननी चिडचिडी होतात. भीती, धाकधूक, अनिश्चितता यांच्या छायेखाली त्यांची उमेदीची र्वष कोमेजतात. आपल्या आई-बाबांचं सुखी, आनंदी नातं डोळ्यांसमोर विस्कटताना बघणं फार त्रासदायक असतं त्यांच्यासाठी. तुमच्यासारख्या अडनिडय़ा वयातल्या मुलांवर तर या घटना फार खोलवर परिणाम करतात.

‘एक गोष्ट आठवली.’ मी म्हटलं. ‘सांगू तुला? दोन भाऊ  होते. त्यांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं. मोठेपणी एक बनला चांगला यशस्वी वकील. त्याने मोठं घर, गाडी घेतली. बायकामुलांसह तो सुखाने राहायला लागला, पण धाकटा भाऊ  मात्र कंगाल राहिला. सतत दारू पिऊन कुठेतरी पडलेला असायचा. दोन भावांमधला इतका फरक पाहून कुतूहलानं एका पत्रकाराने एकदा त्यांची मुलाखत घेतली. दोघांनाही एकच प्रश्न विचारला, ‘तुमच्या आजच्या परिस्थितीचं कारण काय? याला जबाबदार कोण?’ दोघांचंही उत्तर होतं, ‘माझे वडील!’ धाकटा भाऊ  म्हणाला, ‘माझ्या वडिलांमुळे माझं वाटोळं झालं. त्यांनी घरादाराची वाट लावली, म्हणून मला ना शिकता आलं, ना काही मिळवता आलं.’ मोठा भाऊ म्हणाला, ‘माझे वडील खूप दारू प्यायचे, आम्हाला मारायचे. खूप हाल व्हायचे आमचे. मी तेव्हाच ठरवलं, आपण खूप शिकून मोठं व्हायचं, यातून बाहेर पडायचं. म्हणून मी आज इथे आहे.’

‘तुझी वेदना जितकी खरी आहे तितकाच तुझा रागही खरा आहे, पटतंय मला. मला वाटतं तुला बाबांना व्यसनमुक्ती केंद्रात नेता येईल. तिथे त्यांच्यावर उपचार होतील, काउन्सेलिंग होईल. व्यसनी व्यक्तींच्या पत्नी आणि मुलांसाठी आधारगट असतात. तिथल्या चर्चेतून, इतरांच्या अनुभवातून तुला काही दिशा मिळेल. फक्त, आपण गोष्टीतल्या त्या थोरल्या भावाच्या सकारात्मक वाटेनं जायचं की धाकटय़ाच्या विध्वंसक वाटेनं, याविषयी तू विचार कर. तुझा पुढचा रस्ता सोपा नाही, गुंतागुंतीचा आणि लांबलचक आहे. पण अशक्य नाहीये. त्यासाठी शुभेच्छा!’

viva@expressindia.com