News Flash

आऊट ऑफ फॅशन : सहजतेतील फॅशन

‘कॉर्सेट’ प्रकार भारतासाठी नवा; पण अख्ख्या युरोपात हा हाय फॅशनचा अविभाज्य भाग.

अभिनेत्री एमा वॉटसनने आगामी ब्युटी अ‍ॅण्ड द बीस्टया डिस्नेच्या म्युझिकल सिनेमाची नायिका साकारताना कुठल्याही दृश्यात आपण कॉर्सेटघालणार नाही, असं जाहीर केलंय. कॉर्सेट, हाय हिल्ससारख्या त्रासदायक फॅशनला समांतर कम्फर्ट फॅशन सध्या रुजतेय.

‘बेला’ – तशी ती डिस्नेच्या इतर प्रिन्सेसमधली एक; पण नव्या गोष्टीतली मुलगी स्वतंत्र विचारांची, लग्न, राजकुमार यांच्या पलीकडे वेगळा विचार करणारी हवी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी असावी, हे ‘बेला’च्या निर्मितीच्या वेळेस निर्मात्यांनी नक्की केलेलं. त्यामुळेच तिच्या गोष्टीत ती स्वत:च्या शिक्षणाला महत्त्व देत गावातील प्रतिष्ठित मुलाचं स्थळ नाकारते. वडील हरविल्यावर त्यांना शोधायला एकटीच धाडसाने बाहेर पडते, राक्षसाच्या तावडीत असूनही न घाबरता मुक्तपणे वावरते. सगळ्यात महत्त्वाचं इतर प्रिन्सेसप्रमाणे ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’च्या संकल्पनेतून बाहेर पडून समोरच्या नीट जाणून घेऊन, त्याचं रंगरूप आणि इतर दोष बाजूला ठेवून त्याच्यावर प्रेम करते. आगामी ‘ब्युटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ या डिस्नेच्या म्युझिकल सिनेमाची ही नायिका साकारताना कुठल्याही दृश्यात आपण ‘कॉर्सेट’ घालणार नाही, हे जाहीर केलंय या करारी प्रिन्सेसच्या भूमिकेसाठी निवड झालेल्या अभिनेत्री एमा वॉटसनने. आपली निवड किती सार्थ आहे, हेच तिनं या निर्णयातून दाखवून दिलं.

तसा ‘कॉर्सेट’ प्रकार भारतासाठी नवा; पण अख्ख्या युरोपात हा हाय फॅशनचा अविभाज्य भाग. खरं तर युरोपीयन फॅशनचा इतिहास याने बदलला. युरोपात स्त्रियांच्या कमनीय कमरेला खूप महत्त्व दिलं जातं. कॉर्सेटचा वापर हा त्यासाठीच केला जायचा. शेप वेअरसारखंच होतं हे. स्त्रीची कंबर जितकी बारीक आणि नाजूक तितकी ती सुंदर. त्यामुळे सतराव्या शतकापासून स्त्रिया आपली कंबर बारीक करण्यासाठी ड्रेसच्या आत लाकडी कॉर्सेट घालत. हा कॉर्सेट इतका घट्ट आवळला जायचा, की स्त्रियांची हाडं मोडली जायची. ‘‘असा कॉर्सेट घालून मी पडद्यावर आले, तर बेलाच्या विचारांशी फसवणूक करेन,’’ असं एमाचं म्हणणं होतं. सौंदर्याच्या या अतिरंजक कल्पनांमध्ये अगदी पूर्वीपासून समाज इतका अडकत गेलाय, की त्यात स्वत:च्या शरीराला दुखावणंही विशेष मानलं जात नाही. युरोपातील कॉर्सेटप्रमाणेच चीनमध्ये बारीक लाकडी बूट घालून मुलींचे तळवे अतिछोटे केले जायचे. जपानमध्ये काळ्या दातांना आकर्षक मानलं जातं. इंडोनेशियामध्ये लांब मानेच्या- सडपातळ गळ्याच्या मुली आकर्षक मानल्या जायच्या, त्यामुळे मुलींच्या गळ्यात लांब रिंग घातल्या जायच्या. आफ्रिकी देशांमध्ये गोंदवणं अर्थात पिअर्सिग अशा किती तरी चालीरीती जगभरात होत्या. आपल्याकडेही जड कानातले घातल्याने लोंबकळणाऱ्या कानाच्या पाळ्या पाहिल्या असतीलच.

आजही फॅशनच्या या अतिरेकी कल्पनांचे पडसाद आजूबाजूला दिसतील. पाय बारीक दिसावे म्हणून स्किन फिट जीन्स घालतात. अशा जीन्समुळे पायांचा रक्तपुरवठा नीट होत नाही, पण हे सहज दुर्लक्षित केलं जातं. हिल्सच्या शूजमध्ये पायांच्या तळव्यांना इजा पोहोचते, हाडांनाही त्रास होतो, हे ठाऊक असूनही दिवसभर ऑफिस, कॉलेजमध्ये हील्स वापरल्या जातात. एकटय़ा अमेरिकेमध्ये २००२-२०१२ च्या काळात तब्बल १ लाख २३ हजार ३५५ जणींवर हील्समुळे उद्भवलेल्या आजारांवर उपचार करण्यात आले आहेत. भल्या मोठय़ा ‘टोट बॅग’ खांद्याला ऐटीत मिरविणाऱ्यांचे खांदे एका बाजूला झुकलेले असतात. या बॅग्समध्ये इतकं सामान भरलेलं असतं, की खांद्यांचं दुखणं सुरू होतं. सिनेमातील हिरोप्रमाणे बायसेप्स दाखवायच्या नादात हल्ली मुलं आवर्जून एक साइज लहान टी-शर्ट घालतात. हेअर कलर, हायलाइट्स करणं हे सगळ्यात ‘कुल’ समजलं जातं, पण त्याने होणारा हेअर फॉल, केसांची हानी याकडे दुर्लक्ष केलं जातं. पिअर्सिग, नेलआर्टची कथा वेगळीच; पण तरीही हे सगळं फॅशनच्या प्रेमापोटी केलं जातं. बरं फक्त तरुणाईच असे प्रकार करते असंही नाही. मुंबईच्या उन्हाळ्यात दाटीवाटीने भरलेल्या लग्नमंडपात नेट, शिफॉनच्या साडय़ा नेसलेल्या मध्यमवयीन स्त्रिया पाहिल्यात? कमरेला, गळ्याभोवती खाजेने आलेले लाल चट्टे एकमेकींना दाखवतील, पण अशा साडय़ा नेसणं सोडणार नाहीत.

मुळात फॅशनची संकल्पना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव आणण्यासाठी जन्माला आली. त्यात जनमत, ट्रेण्ड या प्रवाहात वाहवत जाण्याआधी तुमची पसंती, कम्फर्ट जाणून घेणं महत्त्वाचं असतं. पन्नास वर्षांच्या महिलेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केवळ हील्स घातल्या नाहीत म्हणून प्रवेश नाकारला तेव्हा अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स अनवाणी रेड कार्पेटवर जाते, तेव्हा फॅशनपेक्षा तुमचा कम्फर्ट गरजेचा असतो, हे अधोरेखित होतं. ज्युलिया याआधीही ब्युटीनॉर्म बाजूला सारत काखेतील केस न काढता स्लीव्हलेस ड्रेस घालून रेड कार्पेटवर आली होती.

आपल्याकडे पेहरावाबद्दल अजून एक गंमत आहे. घरात कोणी ‘परंपरा’ किंवा ‘पद्धत’ (त्यांचा ट्रेण्ड म्हणू हवं तर) म्हणून सलवार सूट, साडी नेसायली सांगितली, तर पटकन आपल्यातला ‘आधुनिकपणा’ जागा होतो. ‘नव्या पिढीची, नवी मुलगी, मला हवं तेच घालणार,’ हा विचार चटकन मनात येतो; पण त्याच वेळी बाजारातली घट्ट लायक्रा लेगिंग घालायला सोयीची नसूनही अख्खा दिवस घालयचा हट्ट केला जातो, तेव्हा मात्र ‘या ट्रेण्ड्सच्या मागे न पळता, मला सोयीचं असेल, तेच घालेन,’ असा विचार मात्र कोणाच्याच मनात येत नाही. अर्थात हल्ली ऑफिसपासून पार्टीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ड्रेसिंगचे काही नियम असतात. ते सगळेच मोडीस आणता येत नाहीत; पण त्यात बदल नक्कीच करता येतात. उदाहरणच घ्यायचं झालं, तर फॉर्मल्समधील पेन्सिल स्कर्टमध्ये चालताना अडखळत असाल, तर ए-लाइन, स्ट्रेट स्कर्ट वापरू शकता. अनारकली ड्रेस सगळ्यांनाच शोभून दिसेल असं नाही, मग अशा वेळी एलाइन किंवा फ्लेअर ड्रेस वापरायला काय हरकत आहे.

अर्थात कपडय़ांमधील आरामदायीपणा हल्ली महत्त्वाची बाब ठरू लागली आहे. मुली आवर्जून पुरुषांच्या सेक्शनमधील टी-शर्ट, पँट, जॅकेट वापरून पाहत आहेत. पलॅझो, कॉटन पँट, धोती पँटचा ट्रेंड त्यातूनच आलेला. मागच्या वर्षी जगभरात जीन्सपेक्षा स्कर्ट्सची मागणी अधिक होती. यंदाचं चित्र थोडय़ाअधिक फरकाने तसंच आहे. या मधल्या काही महिन्यांमध्ये ब्रँडेड कपडय़ांच्या दुकांनामध्ये खरेदीला गेला आहात? सध्याच्या कलेक्शन्समध्ये काही बाबी तुम्हाला प्रकर्षांने जाणवतील. एक म्हणजे ड्रेसेसचा आकार बॉक्स कटमध्ये झालाय किंवा त्याचं फिटिंग ढगळ असतं. दुसरा बदल कुर्ता शिवून घेणाऱ्यांना पटकन जाणवेल. हल्ली कुर्त्यांच्या पाठी दोन टक्स शिवलेले नसतात. त्यामुळे कुर्ता मागच्या बाजूने ढगळ जाणवतो. जीन्सचं कापड वजनाला हलकं आणि स्ट्रेचेबल झालं आहे. बदल छोटे असतील, पण महत्त्वाचे नक्कीच आहेत. कपडय़ांना आरामदायीपणा देण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. हल्लीच्या ट्रेण्डच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘कम्फर्ट गारमेंट’ सध्या इन आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस खरेदीला जाताना ‘ट्रेण्ड आहे,’ म्हणून खरेदी करण्यापेक्षा ‘मला वापरायला सोयीचं ठरेल का?’ हा प्रश्न विचारून खरेदी करा. न जाणो तुम्ही त्यातून तुमची एक स्टाइल तयार कराल.

तुमच्या रोजच्या लुकमध्ये थोडे बदल केलेत तर कम्फर्ट फॅशन कॅरी करणं अवघड नाही.

  • जीन्सला पर्याय म्हणून सध्या बाजारात वेगवेगळ्या पँट आल्या आहेत. रोजच घेरेदार पलॅझो वापरता येत नाहीत; पण या स्ट्रेट पँट्सचा लुक जीन्ससारखाच असतो. फक्त कापड आरामदायी असतं.
  • शक्यतो हिल्सचा वापर कमीत कमी करा. ऑफिसमध्ये कीटन हील्स, वेजेस वापरू शकता किंवा प्रवासात वेगळ्या चपला वापरा आणि हील्सचा एक जोड ऑफिसमध्ये असू द्या, जेणेकरून गरजेच्या वेळी तो वापरता येईल.
  • कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट करायच्या आधी डॉक्टर किंवा तज्ज्ञाशी बोलून घ्या. मान्यताप्राप्त सलूनमधूनच या ट्रीटमेंट करून घ्या.
  • कपडे खरेदी करताना योग्य मापाचे कपडे घ्या. घट्ट कपडे ट्रायल रूममध्ये मस्त दिसतील, पण एरवी वापरताना त्रास होईल.
  • ड्रेसच्या डिझाइनसोबत त्याच्या आतली बाजू तपासून घ्या. ड्रेस आतल्या बाजूने खरखरीत असेल तर खाज येऊन त्वचेला त्रास होऊ शकतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:39 am

Web Title: emma watson in beauty and the beast
Next Stories
1 जीन्स है सदा के लिए..
2 ब्रॅण्डनामा : कॅडबरी डेरी मिल्क
3 Watchलेले काही : अधिकची सकारात्मकता!
Just Now!
X