25 September 2020

News Flash

एक्स्प्लोअर करा, एक्स्पोज नको!

पोशाख करण्याचे काही अलिखित नियम असतात

आपल्या कम्फर्ट लेव्हलला कारणीभूत असणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कपडे. ड्रेसिंग सेन्स आणि फॅशन सेन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना साधारण कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबद्दल खबरदारी घ्यायला हवी.

माणसाची पहिली ओळख ही त्याने तोंडदेखील उघडण्याच्या आधी त्याच्या कपडय़ांवरून होते. पोशाख करण्याचे काही अलिखित नियम असतात आणि ते सगळ्यांच्याच सोयीसाठी केले गेलेले असतात. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपण काय कपडे घालतो यावरून आपली स्वत:ची आणि सोबतच्या इतरांची ‘कम्फर्ट लेव्हल’ ठरत असते. एखाद्या कॉपरेरेट समारंभाला आपण डिझायनर साडी, मोठी चमचमती टिकली, हातभर बांगडय़ा, चकचकीत दागिने असं घालून गेलं तर ते जितकं विचित्र दिसेल तितकंच एखाद्याच्या घरी सत्यनारायणाला जाताना हॉटशॉर्ट्स घालून गेलं तरी ते विचित्रच दिसेल. आपला फॅशन सेन्स कितीही चांगला असला तरीही तो योग्य ठिकाणीच प्रदर्शित करायला हवा.
फॅशन सेन्स आणि ड्रेसिंग सेन्स या दोन प्रामुख्याने वेगळ्या गोष्टी आहेत. साध्या-सोप्या भाषेत कपडय़ांच्या एकमेकांशी जोडय़ा जुळवणं म्हणजे फॅशन सेन्स आणि परिस्थिती, स्थळ-काळ-वेळ यांची पोशाखाशी सांगड घालणं म्हणजे ड्रेसिंग सेन्स. यानुसारच ट्रेकिंग किंवा भटकंतीचे बेत आखताना आपण कुठे जाणार आहोत, कशासाठी जाणार आहोत, तिथे काय काय करणार आहोत याचं भान ठेवून कपडय़ांचीसुद्धा तयारी केली पाहिजे. कदाचित हॉटशॉर्ट्स, क्रॉप टॉप, स्किनी जीन्स हे आपल्या जीवनशैलीचा भाग असतीलही, पण ट्रेकिंगला जाताना अशा कपडय़ांमुळे नक्कीच अडचणी निर्माण होऊ शकतात. कधी ट्रेकिंगला जाण्याचा मार्ग एखाद्या स्थानिक वस्तीतून जाणारा असतो, जिथे आपण राहणार आहोत, तिथले लोक आपल्या शहरी आणि कमी कपडय़ांना सरावलेले नसतात, अशा वेळी आपण तिथे त्यांना वेगळे वाटतील, असे कपडे घातले तर त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी साहजिकच नॉर्मल असणार नाही. मग त्यांच्या नजरेचा जर आपल्याला त्रास झाला तर ती जबाबदारी आपली की बघणाऱ्यांची?
स्वत:ची काळजी म्हणून आपण थोडं सेन्सिबली वागण्याची गरज असते. केवळ इतर लोक बघतील, स्थानिकांना विचित्र वाटेल म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या शरीराच्या सुरक्षेसाठीसुद्धा अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे. ट्रेकिंग करताना, जंगल ट्रेल करताना, अ‍ॅडव्हेन्चर वॉल क्लाइम्बिंग, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर राफ्टिंग अशा अ‍ॅक्टिव्हिटीज करताना कपडे अंगभर असले की आपोआप खरचटणं, किडा-मुंगी चावणं, झाडांचे काटे टोचणं यापासून संरक्षण होतं. अशा वेळी कॉलर नेकचे, क्वचित थोडे मोठेच असलेले टी-शर्ट्स आणि पूर्ण ट्रॅक पॅण्ट (कमीत कमी थ्री -फोर्थ) आवश्यक आहे. पॅण्ट मजबूत आणि थोडय़ा जाड कापडाच्या असाव्यात. कधी ट्रॅक पँट्सपेक्षाही जाड कापडाच्या डेनिम्स, जीन्स किंवा सरळ युनिसेक्स थ्री-फोर्थ घालणं श्रेयस्कर असतं. तुम्ही कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या वातावरणात जात आहात, यानुसार कपडय़ांची निवड करणं आवश्यक आहे.
आपल्या दिसण्याची, वागण्या-बोलण्याची काळजी घेणं आपल्या हातात असतं. आपण जबाबदारीने वागलो-बोललो नाही तर आपोआप ट्रेकिंग ग्रुप्समध्ये ‘मुली नकोत, जाम कटकट होते नंतर’ असा विचार पसरायला वेळ लागत नाही. आपल्या अ‍ॅडव्हेंचर आणि एक्स्प्लोअर करण्याच्या संधी आपण स्वत: गमावून बसतो. त्यामुळे ‘देश तसा वेष’ हेच श्रेयस्कर..नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:30 am

Web Title: explore yourself with fashion
Next Stories
1 ‘डेट’भेट अर्थात प्रेमाची अॅप्लिकेशन्स
2 माझं पहिलं डेटिंग.
3 ‘यूटय़ूबवर’चा टिंडर मसाला
Just Now!
X