21 March 2019

News Flash

फॅशनदार : चित्रपटांची फॅशनयात्रा

मी स्वत: एक कॉस्च्युम डिझाइनर असल्यामुळे माझं पहिलं लक्ष कायम त्यातील पात्रांकडे जातं.

मुघल-ए-आझमचित्रपटातील अजरामर झालेल्या प्यार किया तो डरना क्यागाण्यामध्ये मधुबालाने जो घेरदार पोशाख घातला आहे तो या चित्रपटानंतर अनारकली सूटम्हणून ओळखला गेला. आज तब्बल पाच दशकांनंतरही या अनारकली सूटचे नानाविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात जे आपण दररोज सहज परिधान करू शकतो.

आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला क्रिकेटएवढंच एकमेकांशी जोडून ठेवणारं आणि तितकंच प्रिय माध्यम म्हणजे ‘बॉलीवूड चित्रपट’. मग त्यातली गाणी असो, त्यातल्या नट-नटय़ांबद्दल वाटणारं आकर्षण असो किंवा मग त्यातील तांत्रिक, कलात्मक, सर्जनशील पैलूंवर चर्चा असो; प्रत्येकाला एक स्वत:चं मत असतंच. कधी कधी आपण त्या चित्रपटांमध्ये इतके मग्न होऊ न जातो की त्यातील पात्रांमध्ये आपण स्वत:ला बघतो. मी स्वत: एक कॉस्च्युम डिझाइनर असल्यामुळे माझं पहिलं लक्ष कायम त्यातील पात्रांकडे जातं. चित्रपटाच्या कथेप्रमाणे त्यांचा पेहराव त्या विषयाला धरून आहे की नाही, कलर पॅलेट योग्य निवडलं आहे का?, इत्यादी. तर आज आपण मागच्या दशकांमधील काही निवडक चित्रपटातील वेशभूषेवर; त्यातील पात्रांचा पेहराव त्या चित्रपटांसाठी कसा महत्त्वाचा ठरला आणि त्यांचा काळाप्रमाणे प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यावर, राहणीमानावर कसा परिणाम झाला यावर एक विशेष नजर टाकणार आहोत.

भारतात एक नाव कायम पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये येतं ते म्हणजे १९५७ साली प्रदर्शित, गुरु दत्त दिग्दर्शित चित्रपट ‘प्यासा’. या चित्रपटाचे कॉस्च्युम डिझायनिंग आपल्याकडच्या सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भानू अथैया यांनी केले आहेत. त्या काळातील तंत्रज्ञानाप्रमाणे हा चित्रपट कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत आणि इतर बाबतींमध्ये एक उत्तम दर्जेदार अनुभव होताच; पण त्या व्यतिरिक्त एक कॉस्च्युम डिझाइनर म्हणून मला भावणारी गोष्ट म्हणजे याच्या कथेतील एवधी भिन्न प्रकारची पात्रनिर्मिती. कृष्णधवल रंगातील चित्रीकरण असूनही प्रत्येक पात्राची एक स्वतंत्र ओळख घडवण्यासाठी, कपडय़ावरील रंगछटांची अचूक निवड भानू अथैया यांनी कशी केली असेल, हा प्रश्न मला कायम पडतो.

आपल्या चित्रपटांमध्ये कुठल्याही प्रकारच्या चर्चेत कुठेच मागे न राहू शकणारा चित्रपट म्हणजे १९६० साली प्रदर्शित झालेला के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल-ए-आझम’. आजही या चित्रपटातील सुंदर भव्य दृश्य बघून सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. लोकेशन्स, सेट्स, कॅमेरा याचबरोबर ‘मुघल-ए-आझम’च्या कॉस्च्युमचा विचारही तितकाच सखोल होता. माखनलाल आणि कॅम्पनी या चित्रपटाचे कॉस्च्युम डिझाइनर होते. या चित्रपटातील अजरामर झालेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ गाण्यामध्ये मधुबालाने जो घेरदार पोशाख घातला आहे तो या चित्रपटानंतर ‘अनारकली सूट’ म्हणून ओळखला गेला. आज तब्बल पाच दशकांनंतरही या अनारकली सूटचे नानाविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात जे आपण दररोज सहज परिधान करू शकतो. यानंतर जवळजवळ सगळेच चित्रपट रंगीत झाले होते. त्याच विजय आनंद यांचा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित झाला होता ताो म्हणजे ‘गाइड’. याचे कॉस्च्युम पण परत एकदा दी ग्रेट भानू अथैया यांनीच डिझाइन केले होते. या चित्रपटामध्ये वेशभूषेच्या बाबतीत जाणवलेली एक विशेष गोष्ट म्हणजे एका श्रीमंत लग्न झालेल्या बाईचा तिच्या वयाच्या अठराव्या वर्षांपासून ते एक प्रसिद्ध नृत्यांगना होईपर्यंतचा काही वर्षांचा प्रवास दाखवताना भानूजींनी तिच्या पेहरावाला योग्य तो न्याय दिला आहे. याच भानू अथैय्या यांनी १९८२ सालातील रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाइनिंग केलं होतं, ज्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला. या पुरस्काराबद्दल बोलताना एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘ऑस्कर सोहळ्यानंतर अमेरिकेतून मायदेशी परतले तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं की मुळात तुम्हाला हा पुरस्कार कसा मिळाला? कारण तुमच्या बरोबर स्पर्धेत असलेल्या इतर फिल्म्सशी तुलना केली तर ‘गांधी’चे कॉस्च्युम खूपच साधे होते. त्यावर मी उत्तर दिलं हेच तर या चित्रपटाचं वैशिष्टय़ होतं, कधी कधी साधेपणातच सौंदर्य दिसतं’. भानू अथैया यांच्या या उत्तरातून एकूणच वेशभूषेबद्दलची त्यांची मार्मिक टिप्पणी बरंच काही सांगून जाते.

२००० पासून पुन्हा असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांनी चित्रनिर्मितीच्या प्रत्येक घटकाची नवी व्याख्या मांडली. हा बदल ठळकपणे जाणवून देणारा या दशकातील पहिला चित्रपट होता तो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील काल्पनिक कथा होती आणि त्याची जबाबदारी पुन्हा भानू अथैया यांच्यावरच पडली होती. या फिल्मच्या कॉस्च्युम्सचा वेगळा उल्लेख करावासा वाटतो कारण कथानकाप्रमाणे एकाच गावात राहणाऱ्या ११ जणांची क्रिकेट टीम बनते, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वत:चं व्यक्तिमत्त्व दिसलं पाहिजे पण त्याच वेळी ते सगळे एक टीम म्हणूनही एकत्र दिसले पाहिजेत. त्यात ओसाड गाव असल्यामुळे पूर्ण डल वॉर्म कलर पॅलेट देण्यात आलं होतं. त्यामुळे चित्रपटाला एक वेगळाच फ्लेवर आला होता. याच काळात नेमका विरुद्ध म्हणजे अगदी अत्याधुनिक काळाचं चित्रण असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता तो म्हणजे फरहान अख्तरचे दिग्दर्शन असलेला ‘दिल चाहता है’. या चित्रपटाचे कॉस्च्युम अर्जुन भसीनने केले होते. आज जवळजवळ १७ वर्षांनंतरही बघितलं तर ही फिल्म तितकीच फ्रेश वाटते, कारण या चित्रपटातील फक्त पात्रांच्या कपडय़ांचेच नाही तर लोकेशन आणि सेट्सचं पूर्ण कलर पॅलेट सूदिंग कूल आहे. त्याच्या जोडीला कथेच्या गरजेप्रमाणे मुख्य पात्रांचे कॉस्च्युम्स अगदी बेसिक कॅज्युअल्समध्ये ठेवलेले होते. अशी फॅ शन जी आज १७ वर्षांनंतरही कुठल्याही विशीच्या तरुणांना भावते. आणि ते स्वत:ला त्या व्यक्तिरेखांमध्ये शोधतात.

यानंतर भानू अथैयांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट म्हणजे २००४ सालातला पुन्हा आशुतोष गोवारीकरचेच  दिग्दर्शन असलेला ‘स्वदेस’. या चित्रपटाच्या वेशभूषेतील मला विशेष भावलेली गोष्ट म्हणजे या कथेतला नायक मोहन जेव्हा अमेरिकेतून काही दिवसांची सुट्टी घेऊ न स्वत:बरोबर मोजके ८ ते १० दिवसांचेच कपडे सोबत घेऊन येतो. काही कारणांमुळे त्याला आणखी जास्त काळ भारतात राहावं लागतं तरीही इतर नायकांसारखं प्रत्येक वेळेस नवीन कपडे न देता कुठल्याही सामान्य व्यक्तीप्रमाणे तो तेच कपडे परत परत वापरतो. हे रोजच्या आयुष्यातील तपशील फार महत्त्वाचे असतात. आत्ताच्या बदलत्या काळात एक कॉस्च्युम डिझाइनर म्हणून व्यक्तिरेखेचा अभ्यास आणि त्यानुसार त्याच्या पेहरावाबद्दल केलेला विचार महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने पुढच्या काही चित्रपटांकडे पाहायला हवे. त्यातला पहिला चित्रपट म्हणजे २०११ साली प्रदर्शित  झालेला इम्तियाझ अली दिग्दर्शित ‘रॉकस्टार’. या चित्रपटातला नायक जॉर्डन हा एक २० वर्षांचा मध्यमवर्गीय घरातील तरुण. त्याचा साध्या तरुणापासून ते अतरंगी, विक्षिप्त, प्रेमात अयशस्वी पण रॉक संगीतक्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेला कलाकार इथपर्यंतचा प्रवास दाखवताना डिझाइनर अकी नरुला आणि मनीष मल्होत्रा यांनी कमाल केली आहे. त्याचे अब्स्ट्रॅक्ट जॅकेट्स, टोप्या, हेडगीअर्स यातून एका विक्षिप्त कलाकाराचा अतरंगीपणा चांगलाच झळकतो. याच वर्षी असा आणखीन एक चित्रपट होता ज्यात एका १८ वर्षांच्या साध्या-सरळ मुलीचं साठीपर्यंतचं आयुष्य रेखाटण्यात आलं होतं. या एवढय़ा वर्षांमध्ये सात नवऱ्यांची हत्या करणाऱ्या स्त्रीत तिचं रूपांतर झालं आहे आणि ते तिच्या कपडय़ांमधून खूप सुंदररीत्या दाखवण्यात आलं होतं. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘सात खून माफ’ हा चित्रपट रस्कीन बॉण्ड यांच्या पुस्तकावर आधारित होता. यातील नायिकेच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात होणारा बदल, तिच्या पेहरावातून कॉस्च्युम डिझाइनर पायल सलुजाने खूप उत्तम पद्धतीने दाखवला आहे.

आणखी एका चित्रपटाची नोंद घेऊन ही चित्रपटांची फॅ शनयात्रा इथे थांबवते आहे. चित्रपटात कलाकारांनी केलेली वेशभूषा ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण पाहणाऱ्याच्या मनात ठसवतेच पण त्याचबरोबर आजच्या तरुणींसाठी त्यांच्या रोजच्या आयुष्यातील पेहरावासाठी एक नवी कोरी फॅ शन स्टेटमेंट देऊन जाते. २०१५ साली प्रदर्शित झालेली शुजीत सिरकार दिग्दर्शित ‘पिकू’ बघताना जणू आजच्या काळात एखादा हृषीकेश मुखर्जीचा चित्रपट पाहतोय असा भास होतो. यातली वेशभूषा लक्षात घेता एकानिवृत्त, कटकटी ७० वर्षीय गृहस्थ आणि त्याची आजच्या काळातली सिंगल इंडिपेन्डन्ट मुलगी यांना लोकांसमोर आणताना डिझाइनर वीर कपूर यांनी त्यांच्या लुक्समधून, कपडय़ांमधून त्यांना बोलतं के लं आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखाही आपल्याशा वाटल्या आणि त्याचबरोबर हा चित्रपट पाहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला कुर्त्यांबरोबर पलाझो किंवा क्युलॉट्सच्या फॅशनचे वेड देऊन गेला.

चित्रपटांमधील वेशभूषा ही अशा पद्धतीने आम्हाला सतत प्रेरणा देते तसंच प्रेक्षकांसाठी फॅशन स्टेटमेंट म्हणून महत्त्वाची ठरते. आपल्या दैनंदिन पेहरावावरही या फॅशनचा सहज प्रभाव पडतो. त्यामुळे पुढच्या वेळी चित्रपट पाहताना आणखी वेगळ्या दृष्टिकोनातून आपली फॅशनची दुनिया त्यात नक्की शोधता येईल!

viva@expressindia.com

First Published on April 6, 2018 12:45 am

Web Title: fashion tour of movies fashion trend in movies