ग्रॅमी पुरस्कार आपल्याला मराठी पटलावर माहिती असतो तो दृक्श्राव्य आणि मुद्रित माध्यमांना आपली रिक्तवृत्तांची जागा भरण्याच्या अडचणींमुळे. वृत्ताची जागा जितकी रिक्त तेवढी ग्रॅमी आणि इतर आंतरराष्ट्रीय सोहळ्यांची माहिती अचाट पद्धतीने सादर होते. म्हणजे गेल्या रविवारी झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये ब्रुनो मार्स आणि केंड्रीक लमार या दोन गायकांनी महत्त्वाचे सर्वाधिक पुरस्कार पटकावले. त्यामुळे ब्रुनो मार्स आणि लमार यांच्यावर केंद्रित झालेला सारा वृत्तऐवज त्यापलीकडे जगातल्या आणखी पन्नास ते सत्तर संगीत गटांवर अन्याय करणारा होता. पण सालाबादप्रमाणे हा प्रमाद न चुकता केला जातो. गंमत म्हणजे सध्या फुटबॉल वर्ल्ड कप नसल्यामुळे शकिराचा अल्बम नामांकनासाठी होता आणि त्याला पारितोषिक मिळाले याची चर्चा झाली नाही. यंदा टेलर स्वीफ्ट पडद्यामागची कलाकार म्हणून समोर आली. ‘बेटर मॅन’ या लिटिल बिग टाऊन या बॅण्डसाठी तिने लिहिलेल्या गाण्याला चक्क ‘बेस्ट कण्ट्री साँग’ गटातील पुरस्कार मिळाला. गेल्या दहाएक वर्षांत तिने आपल्या प्रेमभंगांतून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या गाण्यांना सवरेत्कृष्ट सन्मान मिळाले. इतकेच नाही तर तिला जगातील सर्वात श्रीमंत संगीत कलाकाराच्या पदावर तिशीच्या आतच नेऊन ठेवले. यंदा तिच्या रेप्युटेशन या अल्बममधील यथातथा गाण्यांमुळे तिचे पारंपरिक चाहते दूर गेले होते. पण टेलर स्वीफ्टचा जनप्रिय प्रेमभग्न अवतार ‘बेटर मॅन’ तिने दुसऱ्या बॅण्डसाठी लिहिलेल्या गाण्यामध्ये बऱ्यापैकी प्रगट झाला आहे. स्वीफ्टच्या आधीच्या कण्ट्री मुळांची सुरावट गाण्याला लाभली आहे. कण्ट्री गाणी ऐकायला सुरुवात करायची असेल शुगरलॅण्डचे ‘स्टक लाइक ग्लू’, टेलर स्वीफ्टचे ‘स्टे’, ‘अवर साँग’, ‘लव्ह स्टोरी’, डिक्सी चिक्सचे ‘नॉट रेडी टू मेक नाइस’ ही गाणी घ्यावीत. कण्ट्री गाणी आपल्यासाठी बऱ्यापैकी कर्णमधुर आहेत (विजेत्या केंड्रीक लमार आणि ब्रुनो मार्सची गाणी अर्थातच तशी नाहीत).

‘पोर्तुगाल द मॅन’ नावाचा अलास्काचा एक बॅण्ड आहे. यंदा बेस्ट पॉप गाण्याच्या समूह गटातील पारितोषिकासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. समोर प्रतिस्पर्धी नामांकने होती त्यात कोल्ड प्लेसारखा प्रस्थापित बॅण्ड होता, इमॅजनरी ड्रॅगनचे प्रसिद्ध गाणे थंडरही विजेते होण्यास सज्ज झाले होते आणि जस्टिन बिबरवर चित्रित झालेले डेस्पासिटो हे गाणे बाजी मारेल अशी शक्यता होती. पण पोर्तुगाल द मॅन या बॅण्डच्या ‘फिल इट स्टील’ या गाण्याला पारितोषिक मिळाले. या बॅण्डच्या अल्बममधील इतर एकही गाणे मुद्दाम जाऊन ऐकावे असे नाही. पण ‘फिल इट स्टील’ या गाण्यात त्यांनी सगळा जीव ओतला आहे. हे गाणे जेम्स बॉण्डच्या किंवा हेरपटांतील पाश्र्वसंगीतासारखी जाणीव देते. जुन्या वळणाच्या बिट्स आणि सुरावटीवर तयार केल्या गेलेल्या या गाण्याची  तुलना ‘कम सप्टेंबर’ची प्रसिद्ध धून आणि जेम्स बॉण्डच्या सिग्नेचर टय़ूनशी करता येऊ शकेल. दिग्गजांवर मात करीत हे गाणे विजेते का झाले, याचा दाखला गाणे ऐकताना पहिल्या काही सेकंदांतच मिळू शकेल. क्राफ्टवर्क नावाच्या जर्मन इलेक्ट्रॉनिक बॅण्डला थ्रीडी कॅटलॉग या अल्बमसाठी पारितोषिक मिळाले आहे. या बॅण्डची बरीचशी गाणी आपल्या कानांवरून गेली आहेत. कुठल्या तरी जाहिरातींमधून किंवा दृश्यांसाठी वापरण्यात आलेल्या संगीत तुकडय़ांमध्ये ती वापरली गेलीत. सत्तरीच्या दशकापासून हा बॅण्ड कार्यरत आहे. थ्रीडी कॅटलॉग या त्यांच्या यंदाच्या अल्बममधील ‘होम कम्प्युटर’, ‘पॉकेट कॅल्क्युलेटर’ आणि इतर गाणी ऐकावीत. इलेक्ट्रानिक म्युझिक आवडत नसेल तर आवर्जूनच हा वेगळा प्रकार अनुभवावा. यंदा बेस्ट अल्टरनेटिव्ह म्युझिक अल्बम या गटामध्ये ‘द नॅशनल’ या दोन शतके कार्यरत असलेल्या बॅण्डला पारितोषिक मिळाले आहे. इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि उत्तम बीट्सच्या आधारे या बॅण्डनी फार सुंदर गाणी तयार केली आहेत. ‘द डे आय डाय’ आणि ‘वॉकिंग बॅक’ ही गाणी खासच पडताळून पाहावीत.

अल्टरनेटिव्ह संगीत ही रॉक संगीताचीच वेगळी शाखा एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये तयार झाली. मुख्य प्रवाहातील रॉक आणि पॉप म्युझिकची संकरित आवृत्ती म्हणून याकडे पाहता येईल. क्रेनबेरीजची कानांसमोर अगदीच अपरिचित चव म्हणून स्पष्ट होणारी गाणी आणि ब्लाइंड मेलनचे प्रसिद्ध गाणे ‘नो रेन’ याच गटामधील आहे. ग्रॅमीमधला फोक साँग हा गट आपल्याकडच्या लोकसंगीताशी जराही तुलना करता येणार नाही असा असतो. एमी मान या प्रसिद्ध सॉफ्टरॉक गायिकेच्या ‘मेण्टल इलनेस’ या अल्बमला यंदा या गटात विजेत्याचे स्थान मिळाले आहे. ‘गुज स्नो कोन’ हे गाणे तर ऐकाच, पण १९९९ साली आलेल्या ‘मॅग्नोलिया’ या चित्रपटामध्ये वापरली गेलेली तिची गाणी आवर्जून अनुभवा. या चित्रपटाच्या एकूण तत्त्वज्ञानात मुरलेले ‘सेव्ह मी’ गाणे त्यासाठी वापरलेल्या दृश्यांचे वजन कितीतरी वाढविणारे आहे.

ग्रॅमी सोहळ्याच्या वृत्तांकनात वर्षभर परिचित असलेल्याच गाण्यांचे पुनर्आकलन होत असते. अज्ञाताचा सुंदर स्वरप्रदेश शोधायला गेल्यानंतरच सापडतो. त्यासाठी वेळ नसणाऱ्यांसाठी प्रस्थापित संगीत विश्व सज्ज असतेच.

Little Big Town – Better Man

Portugal. The Man – Feel It Still

The National –  Day I Die

Aimee Mann – Goose Snow Cone

Kraftwerk – The Model (The 3D-Catalogue)

TajMo – Taj Mahal & Keb’ Mo’ –  Don’t Leave Me Here

Jeff Lorber Fusion – Hyperdrive

viva@expressindia.com