हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या स्टाइलनं बोलायचं झाल्यास तिकीटबारीवर सर्वाधिक गल्ला जमा करणाऱ्या सिनेमाचा फॉम्र्युला कोणता? तर अर्थातच ‘रोमँटिक’ सिनेमा. अगदी गुरुदत्तचा ‘प्यासा’, शम्मी कपूर- शर्मिला टागोरचा ‘कश्मीर की कली’, ते थेट शाहरुख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, हृतिक आणि अमिषाचा ‘कहो ना प्यार है’, रणबीर- दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’पर्यंत प्रत्येक पिढी बॉलीवूडच्या ‘रोमँटिक’ सिनेमाच्या प्रेमात आहे. प्रत्येकाला आपलं प्रेम, प्रेमाचा प्रवास हा या चित्रपटांतील लव्हस्टोरीप्रमाणे असावा असं वाटत असतं. अगदी प्रेमाचं दिवास्वप्न पडण्याच्या काळापासून सिनेमांमधील वेगवेगळी रोमँटिक गाणी मोबाइलच्या प्लेलिस्टपासून थेट डोक्यात गुणगुणायला लागतात. बागेत झाडाभोवती फिरत नाचणारे हिरो-हिरॉईन कितीही मूर्ख वाटले, तरी कल्पनेत त्यांच्या जागी स्वत:ला ठेवून प्रत्येक जण एक तरी गाणं स्वप्नात जगतोच.

बरं प्रत्येक काळातील प्रेमकथा वेगवेगळी असते. पिढी बदलते तशी त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, प्रेमाचं यश-अपयश स्वीकारण्याची मनोवृत्ती, नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. हिंदी चित्रपटांनी या बदलांचं चित्रण प्रत्येक वेळी उतरविण्याचा प्रयत्न केला. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं, तर नव्वदीच्या दशकातील ‘पहली नजर का प्यार’च्या जागी आता ‘डिअर जिंदगी’मधील आलिया ‘खुर्ची विकत घेताना दहा खुच्र्या पाहून एक निवडतो, तर आयुष्यभराचा साथीदार निवडण्यापूर्वी एकपेक्षा अधिक वेळा प्रेमात पडलं, तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न विचारते, तेव्हा त्याचं आश्चर्य वाटत नाही.

‘ए दिल है मुश्किल’नंतर अनुष्काने रणबीरला ‘फ्रेंडझोन’ केल्याचं आश्चर्य व्यक्त करणारे बरेच मेसेजेस सोशल मीडियावर फिरत होते. मुळात अलिझेच्या (म्हणजे अनुष्काच्या) प्रेमात आकंठ बुडालेल्या अयानने सिनेमाभर तिचा पाठलाग करणं आणि तिला त्या प्रेमापेक्षा त्याची मत्री महत्त्वाचं वाटणं, हे बॉलीवूडपटाच्या दृष्टीने धाडसाचं पाऊल म्हणावं लागेल. ‘एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते,’ ही इमेज नव्वदीच्या दशकात सिनेमांनीच तरुणांच्या मनात िबबवली होती. अगदी ‘कुछ कुछ होता है’चा राहुल टीनाला प्रपोज करतो, तेव्हा तिचा पहिला प्रश्न अंजलीबद्दल असतो. राहुल आणि अंजली फक्त चांगले मित्र आहेत, त्यांच्यामध्ये कदाचित प्रेम नसेलही, हा विचार तेव्हा गळून पडतो. मुलगा-मुलगी चांगले मित्र आहेत, तर ते प्रेमात पडलेच पाहिजेत, हा समज त्यामागचं कारण आहे. यशराजच्याच ‘मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमाच्या नावात असलेली ‘दोस्ती’ हीसुद्धा प्रेमाच्या स्वरूपातलीच होती. याचा परिणाम म्हणूनच कदाचित कित्येकदा कॉलेज, ऑफिसेसमध्ये मुलगा-मुलगी जरा छान बोलत असतील, तर बाकीच्या ग्रुपमध्ये खाणाखुणा चालू होतात. आजही कित्येक ऑफिसेसमध्ये याच कारणांमुळे पुरुष-स्त्री एकमेकांशी बोलणं टाळतात. सहज एखाद् दिवशी एखादीने मेसेज केला की, मुलाच्या मनात ‘कुछ तो है’ अशी शंकेची पाल चुकचुकायला लागते.

‘एक म एक तू’मधूनही मुलगा आणि मुलगी यांच्यातील मत्री या विषयाला अशा प्रकारे हात लावला होता. बिनधास्त रिआनासोबत फिरताना एकलकोंडय़ा राहुलला तिच्याविषयी आपलेपणा वाटू लागतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण तिला मात्र नातं मत्रीच्यापुढे न्यायचं नसतं. अर्थात तिच्या आयुष्यात इतर कोणी आहे, म्हणून नाही.

आगामी ‘बेफिक्रे’मध्ये तर केवळ एकमेकांना आवडतोय म्हणून शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंतची तरुणांची मानसिकता दाखवली आहे. अर्थात या संबंधांना ‘प्रेमा’च्या व्याख्येत अडकविण्याचा प्रयत्नही टाळला आहे. पण मुलगा आणि मुलगी यांच्यातली मत्री खुलविण्याचा प्रयत्न फार कमी सिनेमांमधून करण्यात आला.

ब्रेकअप के बाद

इतकं होऊनही प्रेम यशस्वी झालं नाही, की दारूला जवळ करणारे ‘देवदास’ बॉलीवूडला नवे नाहीत. यातला दुसरा गट म्हणजे ‘धडकन’मध्ये सूडबुद्धीने नायिकेच्या नवऱ्याला उद्ध्वस्त करायला धडपडणारा देव. प्रेमात अपयशी झालं, म्हणजे सगळं संपलं ही बॉलीवूड मानसिकता मध्यंतरी आलेल्या सिनेमांमधून बदललेली दिसून येते. ‘मेरे सयाजी के साथ मने ब्रेकअप कर लिया,’ ‘जस्ट गो टू हेल,’सारखी ब्रेकअप गाणी केवळ त्यांच्या म्युझिकमुळे नाही तर त्यामागे बदललेल्या मानसिकतेमुळेसुद्धा गाजली. ‘लव्ह आज कल’मध्ये कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागल्याने एकमेकांच्या सहमतीने ब्रेकअप करणारे जय-मीरा त्यामुळेच प्रेक्षकांना पसंत पडले. ‘डिअर जिंदगी’मध्ये कायराचं अनेकदा ब्रेकअप करणं तिच्या मित्रांनी अगदी सहज स्वीकारलं. अगदी ब्रेकअपच्या दुसऱ्या दिवशी तिला दुसऱ्या मुलासोबत िलक-अप करायला सुरुवात करणं प्रेक्षकांसाठीही विशेष वेगळं नव्हतं.

‘ए दिल है मुश्किल’मध्ये अयान घटस्फोटित सबाच्या नवऱ्याला भेटल्यावर एकमेकांना कमी लेखण्याऐवजी त्यांच्यात सहज संभाषण होतं. नात्यातला हा अवघडलेपणा काढण्याचा प्रयत्न हल्ली सिनेमांमध्ये करण्यात येतोय. काळ बदलतो, पिढय़ा बदलतात, तसे नात्यांचे संदर्भसुद्धा बदलतात आणि आजचा िहदी सिनेमा हे बदल स्वीकारतोय हे आता जाणवू लागलंय.

‘प्यार दोस्ती है’ या ‘कुछ कुछ होता है’च्या थिअरीपासून ते ‘इश्क में जुनून है, दोस्ती म सुकून है’ या ‘ए दिल है मुश्किल’मधील फंडय़ापर्यंत हिंदी सिनेमाने प्रेम आणि मत्रीचा एक टप्पा पार केलाय. मुलगा आणि मुलगी एकत्र आले, म्हणजे ‘प्यार की कहानी’ सुरू झाली या निष्कर्षांवर पोहोचण्यापेक्षा नात्याचे पदर उलगडणाऱ्या हिंदी सिनेमांना हल्ली पसंती दिली जात आहे. ‘गो टू हेल’ आणि ‘ब्रेकअप साँग’ने ‘जब दिल ही टूट गया, हम जीं के क्या करें’ला कधीच मागे टाकलंय.

प्रेम, पाठलाग आणि नकार

या वर्षीचा ‘िपक’ सिनेमा मुलींच्या ‘नकारा’ची जाणीव करून देणारा होता. पण खरं पाहायला गेल्यास बॉलीवूडने अगदी प्रेमाच्याबाबतीतसुद्धा ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार मुलींसाठी बहुतेकदा नाकारलाच. नायकाचं नायिकेवर प्रेम असेल, तर तिचंही प्रेम असलंच पाहिजे ही मानसिकता अजूनही सिनेमांमध्ये पाहायला मिळते. अगदी ‘छे दिन लडकी इन’ असे ‘कल हो ना हो’ स्टाइल फॉम्र्युलेसुद्धा सिनेमांमध्ये सहज वापरले जातात.

तसं नाही झालं, तर तिनं ‘हो’ म्हणेपर्यंत तिचा पाठलाग करायचा, रस्त्यात अडवायचं, त्रास द्यायचा हे सगळे प्रकार हिंदी सिनेमांमध्ये कित्येकदा दाखविण्यात आले होते. गोिवदाला तरुणाईने कितीही डोक्यावर घेतलं असलं, तरी त्याच्या प्रत्येक सिनेमांमध्ये नायक प्रेम मिळविण्यासाठी असलेच प्रकार करताना दाखवला गेला आहे. ‘कबतक रुठेगी, चिखेगी, चिल्लाएगी, दिल केहता है एक दिन हसिना मान जायेगी,’ हे त्याच्या तोंडीचं गाणं या प्रकाराचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष आयुष्यात किती वेळा हा नकार पचवणं तरुणांना कठीण जातं. या नकारातून अगदी अ‍ॅसिड-हल्ला करायची मजलही ते गाठतात.

बरं एकदा प्रेम मंजूर झालं, की पुढचा टप्पा म्हणजे थेट लग्नच. त्यामध्ये करिअर, व्यवसाय, सेटल होणं हे सगळं सिनेमांमधून सहज वजा केलं जातं. ‘दिलवाले दुल्हनिया..’मधला राज शिक्षण सोडलेला, बडय़ा घरातला, उद्धट मुलगा, पण प्रेमाच्या परीक्षेत पास झाला म्हणून तो नायक, पण लग्नानंतर त्याच्या पोटापाण्याचं काय, याकडे मात्र सिनेमा दुर्लक्ष करतो. ‘हर इश्क का एक वक्त होता है. वो वक्त हमारा नहीं था. इसका ये मतलब नहीं की इश्क नहीं था’, ‘जब तक है जान’सारख्या निवडक सिनेमांमध्येच अशा प्रकारे वाट पाहणं मान्य केलं गेलं. ‘ये जवानी.’मध्येही एकमेकांचं प्रेम मान्य केल्यावर नना आणि कबीर केवळ करिअरची निवड करत वेगळं व्हायचा निर्णय घेतात. पण हा समजूतदारपणा सिनेमांमध्ये अभावानेच पाहायला मिळाला.

मैत्री, प्रेम आणि त्यापलीकडचं काही..

आजची पिढी ‘आम्ही खूप सॉर्टेड आहोत’, असं म्हणत हा बॉयफ्रेण्ड, हा नुसताच मित्र, हा ‘बडी’, हा त्याहून वेगळा असे व्यवस्थित कप्पे करायचा प्रयत्न करते. पण ‘ती’ वेळ येते, तेव्हा मात्र हे ‘सॉर्टेटपण’ कुठल्या कुठे वाहत जातं कळतंही नाही. आजच्या तरुणाईला नाती म्हणजे खेळ वाटतात, अपडेट करण्याची ‘स्टेटस’ वाटतात वगैरे आरोप अख्ख्या पिढीवर होत असताना मैत्री आणि प्रेमाच्या पलीकडच्या त्या ‘अनकन्व्हेन्शनल’ नात्यांच्या गुंत्यात ही पिढी अडकत जातेय खरी. का? स्वतशी प्रामाणिक असल्याचा हा परिणाम की आणखी काही?

हिंदी सिनेमा हा नेहमीच काळाप्रमाणे बदलत गेला आहे आणि हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ आहे. अगदी यशराजचंच उदाहरण घ्यायचं, तर त्यांनी काही वर्षांपूर्वी दिग्दíशत केलेला ‘लम्हें’ हा तेव्हा काळाच्या पुढेच होता. करण जोहर हाही प्रगल्भ दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याच्या सिनेमातून नेहमीच त्याने वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केलेला दिसतो. आजच्या पिढीने तात्पुरतेपणाचा स्वीकार केलाय. अगदी त्यांच्या खरेदीपासून प्रेमाच्या संकल्पनेपर्यंत तात्पुरतेपणाची जाणीव होते. त्याच्यासमोर निवडीचे प्रचंड पर्याय आहेत. त्यामुळे काळानुसार त्यांची निवड बदलत जाते. हिंदी सिनेमांमधून हा तात्पुरतेपणा सुंदररीत्या रेखाटला आहे.

सचिन कुंडलकरदिग्दर्शक