13 December 2017

News Flash

कलाभान जागवणारे ‘कागदी घोडे’

ऑस्ट्रेलियाच्या कलाविश्वात स्थान निर्माण करणारी जानकी आणि तिचं कलाभान याविषयी..

सौरभ नाईक | Updated: October 7, 2016 1:12 AM

पेपर आर्टसारख्या वेगळ्या कलाप्रांतात स्वत:ची शैली निर्माण करणारी, ‘सस्टेनेबल आर्ट’मधून पर्यावरणाचा विचार जागवणारी आणि ऑस्ट्रेलियाच्या कलाविश्वात स्थान निर्माण करणारी जानकी आणि तिचं कलाभान याविषयी..

पेपर आर्टसारख्या वेगळ्या कलाप्रांतात स्वत:ची शैली निर्माण करणारी आणि ऑस्ट्रेलियाच्या कलाविश्वात स्थान निर्माण करणारी जानकी लेले मूळची पुण्याची आर्किटेक्ट. सस्टेनेबल आर्टच्या प्रेमाखातर तिने याच क्षेत्रात काम करायचं ठरवलं. तिने केलेल्या कागदाच्या कलाकृती (पेपर इन्स्टॉलेशन्स) सिडनीच्या अनेक प्रदर्शनांमधून नावाजल्या गेल्या. ‘स्कल्पचर बाय द सी’ या जगातील प्रतिष्ठेच्या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये जानकीचे पेपर इन्स्टॉलेशन दोन वर्षांपूर्वी लागले आणि गाजले होते.

भारतातून परदेशी करिअर करण्यासाठी जायचं म्हटलं की, दोनच पर्याय समोर असतात – उच्चशिक्षणासाठीच तिथे जायचं किंवा मग नोकरीनिमित्ताने शिरकाव करायचा. मुलींसाठी तिसरा पर्याय लग्नाचा. मग यथावकाश परदेशातील एखाद्या नोकरीत सेटल झालात की, मग इथे मागे सोडलेले छंद, आवडी इथेच राहून जातात. संस्कृती, छंद यांचा संबंध उरतो तो केवळ तिथल्या देशी मंडळींच्या गटातील कार्यक्रमांपुरता. छंदाचे रूपांतर कलेत आणि तेही एखाद्या चिरंतन कलेत करण्याचं आणि त्याचा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून विचार करण्याचं धाडस फार थोडे जण करू शकतात.  जानकी लेले या अगदी थोडय़ांपैकी एक. मनस्वी आणि सच्ची कलाकार. जानकी मूळची पुण्याची. तिथल्या भानूबेन नानावटी आर्किटेक्चर कॉलेजमधून आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर तिने आर्किटेक्ट म्हणून कामही सुरू केलं. नंतर सिडीनमधील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्समधून सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. परत पुण्याला येऊन काही दिवस नोकरीही केली. लग्नानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियालाच राहण्याचा योग आला आणि ठरावीक नोकरीत तिच्यातील कलाकार रमणार नाही, हे लवकरच तिचं तिला उमगलं. शिक्षण- नोकरी या रुळलेल्या वाटेवरून जाण्याऐवजी काहीतरी वेगळं, मनाला भावेल असं करण्याचा निर्णय तिने घेतला आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आणि डिझायनर म्हणून कामाला सुरुवात केली.

लवकरच ती या कलेत रमली आणि नुसती रमलीच नाही तर व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून तिने परदेशात स्वत:ची ओळखही निर्माण केली. सुरुवातीला तिने कम्युनिटी हॉलमधील ‘ग्रुप एक्झिबिशन’मध्ये कला सादर केली. त्यानंतर संधीचा ओघ वाढतच गेला. छंद म्हणून सुरू केलेलं तिचं काम लोकांना आवडू लागलं. कागदापासून केलेल्या कलाकृती लोकांना भावल्या तशी तिची आणि तिच्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हायला लागली. तिने केलेली पेपर आर्ट इन्स्टॉलेशन्स नावाजली गेली. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठय़ा आउटडोअर स्कल्पचर एक्झिबिशनमध्ये जानकीला तिचं पेपर इन्स्टॉलेशन सादर करायची संधी मिळाली. बाण्डी बीचवर दरवर्षी भरणारं ‘स्कल्पचर बाय द सी’ हे प्रतिष्ठेचं प्रदर्शन. त्यासाठी तिने विशेष मेहनत घेतली. एका विशिष्ट प्रकारच्या कीटकांची कागदी शिल्प करण्याची जबाबदारी तिने पेलली, ही कागदी कलाकृती हवामानाचे बदल सांभाळून तग धरून राहील हे यात आव्हान होतं. असे अनेक धाडसी व यशस्वी प्रयत्न तिने केले. ‘आपल्या आसपासच्या दुर्लक्षित कीटक विश्वाकडे थोडं लक्ष वेधण्याचा तिचा प्रयत्न होता. मुंग्या, छोटे कीटक हा आपल्या पर्यावरणाचा भाग आहे. त्या त्यांच्या निसर्गधर्माला जागून त्यांचं काम अविरत करत असतात. थोडं त्यांच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मला करायचा होता’, असं जानकी सांगते.

lead-2-main

पेपर मॅश या पारंपरिक पद्धतीने ती कलाकृती बनवतेच शिवाय स्वत:च्या खास शैलीतील पेपर कटिंग आर्टही करते. ‘सस्टनेबल डेव्हलपमेंट’ हा तिच्या आवडीचा विषय असल्याने कुठल्याही गोष्टीचा पुनर्वापर करण्याकडे तिचा कल असतो. ‘हे माझ्या मूळ स्वभावातच होतं. त्याचा प्रचंड उपयोग या कलेत झाला.’ जानकीच्या काही कलाकृती सिडनीच्या म्यूझियममध्ये दिमाखात स्थानापन्न झाल्या आहेत. अनेक प्रदर्शनांमधून तिच्या या आगळ्या कलेचं कौतुक झालं. वर्तमानपत्र, रद्दीतली पुस्तकं यांचा कागद वापरून जानकी सुंदर कलाकृती निर्माण करते. सध्या ती अ‍ॅडलेडला राहते आणि पेपर आर्टिस्ट म्हणून शो करते. प्रदर्शनांमध्ये सहभागी होते. तिच्या कलाकृती ऑस्ट्रेलिया आणि भारतातील अनेक ठिकाणी दिमाखात उभ्या असतात. तिच्या कलेची दखल ऑस्ट्रेलियातील काही आर्ट मॅगझिन्सनीदेखील घेतली आहे.

ऑस्ट्रेलियासारख्या अनोळखी शहरात जाऊन, कुठलीही ओळखपाळख नसताना, विशेष संपर्क नसताना केवळ कलेच्या आधारावर आणि आंतरिक ओढीच्या विश्वासावर स्वार होत तिने ‘पेपर आर्ट’चा व्यवसाय सुरू केला आणि तो प्रसिद्ध करूनही दाखवला. या सगळ्यात ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’सारख्या सामाजिक माध्यमांचा आधारही होताच. पण मुख्य आधार होता हातातील कलेचा, पर्यावरणप्रेमाचा आणि कागदावरील निष्ठेचा! आज त्याच बळावर जानकी लेले एका वेगळ्या, पर्यावरणप्रेमी कलेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवू पाहते आहे.

सौरभ नाईक

First Published on October 7, 2016 1:12 am

Web Title: inspirational story of girl who made her career in paper art work 2