आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

‘कोणा कशी कळावी वेडात काय गोडी’ या ओळी भारतीयांच्या काही सवयींना चपखल लागू व्हाव्यात. आपल्याला गार करणारी शंभर सरबतं असली तरी भर उन्हात घामाच्या धारा वाहत असताना वाफाळता चहा अमृत समजून ओठी लावण्यासाठी वेडंच असावं लागतं. शरीराची काहिली काहिली होत असताना वडापावसोबत झणझणीत चटणी व मिरची हायहुय करत हाणण्यासाठी भारतातच जन्म घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे कडाक्याच्या थंडीत गारेगार कुल्फी खायचं लॉजिक समजण्यासाठी वेडातली गोडी कळावी लागते.

पर्शियन भाषेत ‘कुल्फी’ या शब्दाचा अर्थ होतो झाकलेला कप किंवा भांडे. १६व्या शतकापासून मुघलांमार्फत कुल्फी भारतात रुजली. त्याआधीही आटवलेल्या दुधाच्या अनेक पाककृती भारतीयांच्या खाण्यात होत्या. मुघलांनी या आटीव दुधाला पिस्ता, केशराने सजवलं. हे दूध कोनासारख्या धातूच्या भांडय़ात भरून थंड केलं जात असे. दूध गोठवण्याची कृती ‘ऐन- ए-अकबरी’ या ग्रंथात विस्ताराने दिलेली आहे. खडय़ा मिठाचा याकरिता वापर होत असे, शिवाय हिमालयीन बर्फही वापरला जाई. या काळात कुल्फीचा प्रचार झाला तरीही कुल्फी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असण्याची शक्यता कमीच दिसते, कारण बर्फाची उपलब्धता राजेरजवाडय़ांपुरती मर्यादित होती. मीठ आणि बर्फ यांचा वापर करून घरच्या घरी कुल्फी करण्याची गंमत कळल्यावर मात्र कुल्फीवाल्यांकडून कुल्फी अक्षरश: गल्लोगल्ली पोहोचली. मात्र ही मुघलांनी शोधलेली पाककृती म्हणता येईल का? तर त्या काळातील भारतीयांकडील मुबलक दूधदुभतं पाहाता आटीव दूध हे फार सहज होतं. कडाक्याच्या थंडीत हे दूध याआधीही गोठलं असेल, पण त्याला पदार्थ म्हणून अधिक सजवून एखाद्या मुघल खानसाम्याने पेश केलं असण्याची शक्यताच अधिक आहे. राजदरबारातून प्रचार होऊनही कुल्फी घराघरांत खऱ्या अर्थाने पोहोचली ती मात्र रस्त्यावरून. घरच्या घरी कुल्फी जमवण्यापेक्षा आवडीच्या वा विश्वासाच्या कुल्फीवाल्याकडून बदामाच्या किंवा केळीच्या पानात कुल्फी घेऊन खाण्याची गंमत काही औरच. जगाने कुल्फीला ‘भारतीय आइस्क्रीम’ म्हटलं असलं तरी आइस्क्रीम व कुल्फी यांच्यात भेद आहे. आइस्क्रीमपेक्षा कुल्फीत हवा कमी खेळती असते. घट्ट आटीव दुधाच्या कुल्फीच्या तुलनेत आइस्क्रीम पातळ वाटते. कुल्फीच्या दाटपणामुळे आइस्क्रीमप्रमाणे ही कुल्फी झर्कन वितळून जात नाही.

कुल्फी म्हटली की, त्या नाजूक काडीवर आपला डोलारा सांभाळणारा तो शंकूच डोळ्यासमोर येतो. अलीकडे गोलाकार चकतीच्या रूपातही ती दिसतेय. मात्र काडीच्या आधाराने कुल्फी चाखण्याचा आनंद वेगळाच. भर उन्हाळ्याचे दिवस असोत वा कडाक्याच्या थंडीचे, जेवण आटोपल्यावर गप्पांचा अड्डा जमलेला असताना कानावर ‘कुल्फीये’ किंवा ‘कुल्फीयों’ अशी चिरपरिचित हाक कानावर पडायची. लाल फडक्याने गुंडाळलेल्या भल्या मोठय़ा हाऱ्याचा भार डोक्यावर सांभाळत एखादा कुल्फीवाला प्रवेश करायचा आणि क्षणाचाही विचार न करता कुल्फीची ऑर्डर सुटायची. कुल्फीचा कोन हातावर चोळून अत्यंत अदबीने आपल्या समोर पेश करणारा हा कुल्फीवाला बाकीच्या मंडळींप्रमाणेच आयुष्यातून कधी गायब झाला कळलंच नाही. दुधाच्या गोड दाटपणासोबत जाणवणारा किंचित खारटपणा, दोन परस्परविरोधी गोष्टींतून मिळणारी एक अजब चव चाखताना दुनिया एक तरफ और हम  एक तरफ.. आज हॉटेलमध्ये, लग्नात कुल्फी शाही थाटात समोर आली तरी तिच्यात मन रमत नाही. कानांवरची ‘कुल्फीये’ची जादू आजही कायम आहे. कुल्फी म्हणजे फक्त भारतीय आइस्क्रीम नाही. कुल्फी एक जिव्हाळा आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत जमलेल्या गप्पांचा जिव्हाळा. कडाक्याची थंडी पडली की, अनेकांची ‘कुल्फी जम जाती है’. दुधाच्या आटीवपणातून ही कुल्फी जमते. तिला चाखताना हा आटीवपणा आपल्या शरीरभर पसरत जातो. तिच्यातला गारवा बाहेरच्या गरमीला किंवा थंडीला विसरायला लावतो. त्यामुळे ती  ‘कुल्फी’ नाही तर खरंच COOLफी वाटते.