परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं

युवा मित्र-मैत्रिणींनो,

गेले वर्षभर आपण तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसविषयी गप्पा मारल्या. कॉलमचा विषयच होता ताणतणाव! आणि ताणतणाव म्हटलं की त्यात बरंच काही येतं. कारण ताणाची कारणं आणि परिणाम दोन्हीही असंख्य आहेत. आपल्या रोजच्या जीवनातली जवळजवळ प्रत्येक गोष्ट आपल्याला ताण देऊ शकते. अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री शांत झोप लागेपर्यंत. त्यामुळे मैत्री, प्रेम, व्यसनं, नोकरी, भावना, नाती इथपासून ते ट्रॅफिक, लैंगिकता, सोशल मीडिया, लग्न असे अनेक विषय यात आपोआपच आले.

तुमची सगळी पिढी एका मोठय़ा बदलाच्या लाटेतून जातेय. हा बदल महाकाय आहे आणि फार वेगवानही आहे. इतका वेगवान की तो आपल्याला विचार करण्याएवढाही अवधी देत नाही. त्यावर काही स्ट्रॅटेजी प्लॅन करायला उसंत देत नाही. किंबहुना ही सगळी विचार वगैरे करण्याची गरजच मुळी तुम्हाला वाटत नाही. जे काही पुढय़ात येईल त्याला तोंड द्यायची तुमची तयारी आहे. त्या वेगाची झिंग चढल्यासारखी झालीये. अर्थातच, त्यामुळे त्याच्या परिणामांकडे लक्ष द्यायला सवड नाहीये. पण म्हणून ते परिणाम व्हायचे राहतात थोडेच! या आपल्या लाइफस्टाइलचा आणि तणावांचा थेट संबंध मात्र जोडता येत नाही. सतत अस्वस्थ व्हायला होतं. कसलीतरी हुरहुर जाणवत राहाते. कितीही मिळालं, कितीही मजा केली तरी आणखी काहीतरी हवं असं वाटत राहातं. भरपूर मित्रमैत्रिणी असूनही एकटं वाटतं. एकाकीपणातून येतं नैराश्य आणि त्यातून घडतात आत्महत्या.

तुमच्यात असलेली ती सळसळती ऊर्जा, ते कुतूहल, ती ताकद, तो उत्साह यांचा तुम्हाला तरी अंदाज असतो की नाही कोण जाणे. खरंतर त्यातून खूप काही घडू शकतं. नुसत्या तुमच्या स्वत:च्या आयुष्यातच नव्हे तर सगळ्या समाजात, देशात, जगात! आपल्याला खूप काही करता येईल, आपल्या कोशातून बाहेर येऊन आपल्या ऊर्जेचा इतरांसाठी वापर करता येईल. पण ठेवतो का आपण हा काहीसा विशाल दृष्टिकोन?

रामदास स्वामींची ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे की नाही माहिती नाही. सांगू?

ते लहान असताना एकदा आईला सापडेचनात. ती त्यांना घरभर शोधून थकली, शेजारीपाजारी पाहिलं. शेवटी छोटा रामदास कुठे सापडला माहितेय? एका भिंतीतल्या कपाटात, फडताळात! आईने विचारलं, ‘अरे, इथे काय करतोयस?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘चिंता करतो विश्वाची!’ इतक्या लहानपणी ही विश्वाची, साऱ्या जगाची चिंता त्यांना सतावत होती. जगाच्या कल्याणासाठी काय करता येईल यासाठी ते विचार करत होते. फक्त मी, माझं या चक्रात अडकलेले नव्हते.

हा असा इतरांचा विचार करणं हीच असेल का तणावांवर मात करणारी जादूची छडी? आपण करतो का असा विचार? तुम्हाला काय वाटतं, बघता येईल स्वत: पलीकडे जाऊन? आपल्या चिंता सतत भिंगातून बघून आपल्याला इतक्या मोठय़ा वाटायला लागतात की त्याशिवाय दुसरं काही दिसेनासं होतं. ते भिंग बाजूला करून पहायचं का? तसं करता आलं तर आपले कितीतरी ताण या जादूसारखे नष्ट होतील. विरघळून जातील. ते किती किरकोळ आहेत हे लक्षात येईल. मग कदाचित आपण त्यांना अवास्तव महत्त्व न देता त्यांची योग्य जागा त्यांना देऊ शकू.

आपल्या आयुष्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर दिसतं की कितीतरी न पटणाऱ्या गोष्टी आपण उगीचच करत असतो. पण काय करावं हे सुचत तरी नसतं किंवा तसा विचारच केलेला नसतो. म्हणून नाइलाजानं आपण मळलेल्या वाटा चोखाळत राहतो. सगळे करतायेत म्हणून या अशा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचा असफल प्रयत्न करत राहायचं की आनंदाचे आपापले मार्ग शोधायचे? इतरांबरोबर फरफटत जायचं की आपल्या विचारांशी जुळणारे दोस्त निवडायचे? सतत अस्वस्थ राहायचं की समाधानाचं गुपित शोधायचं? कोणीतरी कधीतरी काहीतरी वेगळा विचार केला म्हणूनच नवनवीन गोष्टींचा शोध लागला. मग आपणच का होऊ  नये तो वेगळा विचार करणारे? शिकायचं का जगाकडे, स्वत:च्या आयुष्याकडे जरा वेगळ्या नजरेनं पाहायला?

आपला पुढचा लेख या मालिकेतला शेवटचा लेख असणारेय. आणि खरंतर तो तुम्ही लिहावा असं मला वाटतंय. कारण आपल्या ताणासाठी आपण काय करू शकतो, हे तुम्हीच शोधून काढू शकाल. त्यासाठी मदत नक्की मिळेल चारी दिशांनी. तुमचे दोस्त, आई-बाबा, भावंडं, शिक्षक, माझ्यासारखे डॉक्टर्स, पुस्तकं आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, ‘गूगल’! पण या सगळ्या सल्ल्याचा फारतर दिशादर्शक म्हणून उपयोग होईल. उत्तरं स्व:हून शोधून काढली तरच ती वापरतो आपण.

मग सांगाल का या ताणतणावांवरचे तुमचे खास उपाय?

viva@expressindia.com