सर्जनशीलता, नावीन्य असे एकामागोमाग एक महत्त्वपूर्ण टप्पे पार करत सुरू असलेल्या अनोख्या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘पर्ल अकॅडेमी’ या भारतातील डिझाइन, फॅशन, व्यवसाय व मीडिया क्षेत्रातील अग्रणी संस्थेने नुकतंच ‘पर्ल पोर्टफोलिओ २०१८’चे आयोजन केले होते. ज्यांचे पदवी शिक्षण आता पूर्ण होणार आहे अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात पाऊल ठेवण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध असावा हा यामागचा उद्देश होता. प्रदर्शन, डान्स शो, चर्चासत्र आणि  फॅशन शो अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.

वेगवेगळ्या कल्पना आणि हटके डिझाइन यांची सांगड घालणारा हा फॅशन शो इतक्या तरुण डिझाइनर्सनी केला आहे यावर विश्वासही बसणार नाही इतके वैविध्य त्यात होते. यामध्ये मेहर साहनी हिने ‘एजिझम इन फॅशन’ या नावाचं कलेक्शन सादर केलं. ज्यामध्ये फॅशन उद्योगातील वयोगटातील भेदभाव सहज हायलाईट होत होता. ‘ब्रेली’ हे ख्याती सराफ या विद्यार्थिनीचं कलेक्शन म्हणजे अंध विश्वातील व्यक्तींसाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन केलेलं उत्तम कलेक्शन होतं. या विषयी ख्याती सांगते, ‘‘मी बनवलेलं कलेक्शन म्हणजे ‘ठिपक्यांची कला’. जी अंध व्यक्तींच्या जीवनाने प्रभावित होऊन मी डिझाइन केली आहे. सुरुवातीपासूनच मला नवीन काही तरी विषय घेऊ न माझं यंदाचं फायनल इयरचं कलेक्शन बनवायचं होतं. म्हणून मी अंध लोकांविषयी सगळी माहिती काढायला सुरुवात केली. ते कसे वागतात, कसे काम करतात, बाकी समाजातील लोकांशी कसे स्वत:ला जोडायचा प्रयत्न करतात, त्यांचे डोळे काम करत नाहीत तरीही ते बाकीची कामं कशी करतात, सरकारच्या कोणत्या योजना आहेत त्यांच्यासाठी, ते चालताना काठीचा वापर का करतात, काळाच चश्मा का घालतात, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी केला. त्यासाठी मी एका एनजीओच्या मदतीने जास्तीत जास्त वेळ अंध लोकांसोबत घालवला. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्यावरच मी हे कलेक्शन बनवायला सुरुवात केली.’’ ख्यातीने यात ब्रेल लिपीचा वापर केला आहे. ‘‘‘ग्रे कलरचा जास्त वापर मी माझ्या कलेक्शनमध्ये केला  आहे, कारण ते ग्रे रंगाच्या दुनियेतच वावरत असतात. मी माझ्या कलेक्शनमधील प्रत्येक ड्रेस हा त्यांच्या मागणीनुसार बनवला आहे. अंध लोकांसाठी गोष्टी सरळ नसतात म्हणून मी गारमेंटमध्येही खाली-वर गोष्टी केल्या आहेत, प्रिंट्स मोठय़ा छोटय़ा आहेत,’’ असं ती सांगते. तिच्या संपूर्ण कलेक्शनवर ब्रेल लिपीमध्ये लिहिलेला मजकूर आहे आणि तो मजकूर कोणत्याही साचेबद्ध आकारात नाही हेच या ठिपक्यांचं वैशिष्टय़ आहे.

अशाच प्रकारे आणखी एका विद्यार्थिनीने ‘तशरीफ रखिये – प्लीज हॅव सीट’ या नावाचं कलेक्शन सादर केलं. कृतिका चंद्रमौळी हिने तिच्या या कलेक्शनमध्ये व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी कपडय़ांचे अनेक पर्याय डिझाइन केले आहेत. याबद्दल कृत्तिका सांगते, ‘‘या कलेक्शनच्या माध्यमातून फॅशनेबल व फंक्शनल कपडय़ांमधील भेद दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. फॅशन म्हटलं की, सुटसुटीत कपडे हे समीकरण आता दिसत नाही. हे सुटसुटीत कपडे फॅशनच्या मुख्य प्रवाहात यावेत अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध असावेत हा यामागचा उद्देश आहे.’’

आपल्या रोजच्या जीवनात आपण कुठे राहतो, काय खातो, आपलं कुटुंब कसं आहे, आपला समाज कोणता आहे, या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव पडतो. आणि हेच हेरून प्रशांक डॅडीबुरजोर या विद्यार्थ्यांने त्याचा प्रोजेक्ट बनवला. याबद्दल तो म्हणतो, ‘‘माझ्या प्रशांक नावाचा अर्थ वॉरिअर असा होतो. मी टिपिकल पारसी कुटुंबातील मुलगा आहे. माझी आई मला नेहमी म्हणते की, तुला लग्न करायचं आहे आणि तेही पारसी मुलीशीच. मला असं वाटायचं की, मी लग्न करण्यासाठीच मोठा झालोय. पण आई असं का बोलते? याचं कारण आता मला लक्षात आलं आहे. सध्या पारसींची संख्या खूप कमी होत आहे, म्हणून आपणच आपलं कल्चर पुढे नेण्यासाठी हे करायचं. मी यावरती काही तरी करायचं ठरवलं. आणि त्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. मला आधीपासून स्केचेस काढायची आवड होती. मला चित्रकथा फार आवडतात पण त्यात मी कधीही पारसी चित्रकथा किंवा त्यांचा इतिहास बघितला नाही. नंतर मी खूप अभ्यास करून एक स्केच केलं, ज्यात पारसी कल्चर कसं आहे ते दिसून येतं. ते स्केच मी  डिझाइनरूपी बनवून माझ्या आजोबांच्या खुर्चीसाठी कव्हर, माझ्या आईसाठी स्टोल, घरातल्या सोफ्यासाठी, पिलो साठी कव्हर आणि मेन्स शर्टवरतीही ती डिझाइन वापरली.’’ प्रशांकच्या कलेक्शनमध्ये खरोखरच त्याची कुटुंबाशी, त्याच्या संस्कृतीशी जोडलेली नाळ दिसून येते.

या अनोख्या प्रदर्शनाबरोबरच ‘मुंबई बाय डिझाइन’ नावाचं एक उत्तम चर्चासत्रही या वेळी घेण्यात आलं. ज्याचा विषय होता ‘द क्रिएटिव्ह सर्ज’. या चर्चासत्रात मुंबई शहरातील क्रिएटिव्ह क्षेत्रातील नामवंत, जाणकार, डिझाइन व प्रसिद्धीमाध्यमांच्या विविध विभागांतील व्यक्तींनी भाग घेतला होता. पदवी शिक्षण घेत असलेले डिझाइनचे विद्यार्थी हे त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून मुंबईला अधिक सर्वसमावेशक व समानतेवर आधारित शहर कसे बनवू शकतील यावर या वेळी चर्चा करण्यात आली.  डिझाइन प्रोजेक्ट्स, त्यांचा शहरी जीवनावर पडत असलेला प्रभाव याबाबत अनेक प्रश्न या वेळी विचारले गेले. ‘स्कूल ऑफ डिझाइन’मधून सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये काही खास प्रोजेक्ट्सचा समावेश होता. नवनवीन संकल्पना आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण या दोन्हीची सांगड घालून नव्या विचारांचे तरुण डिझाइनर काय चमत्कार घडवू शकतात याची अनुभूती उपस्थितांनी घेतली.

viva@expressindia.com