हंगेरी या मध्य युरोपातील देशात १९३३ साली ‘ग्लुमी सण्डे’ नावाच्या एका गाण्याने जन्म घेतला. आपल्या प्रेयसीच्या मृत्यूचे दु:ख कातर स्वरांत मांडणाऱ्या या गाण्याने एक वेगळा इतिहास रचला आणि ते पुरते बदनामही झाले. हे गाणे ऐकणाऱ्या अनेकांनी त्या काळात आत्महत्या केल्या आणि संपूर्ण युरोपभरात ते गाणे आणि त्याची धून तब्बल ६६ वर्षे बंदिवासात राहिली. १९३० च्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर युरोपातील कित्येकांचे जगणे अवघड बनूून गेले होते. नकोसे झालेले आयुष्य संपविण्याकडे कल असलेल्या लोकांनी ग्लुमी सण्डे नामक धून ऐकून आपले आयुष्य संपविले, या वार्ता तेव्हा इतक्या वेगाने ‘व्हायरल’ झाल्या होत्या, की ‘हंगेरियन सुसाइड साँग’ अशी त्याची कुख्याती झाली होती. २००२ साली त्या गाण्यावरील बंधने झुगारून दिली आणि आज ते यूटय़ुबवर शेकडो व्हर्शन्ससह सहज उपलब्ध आहे. गाणे किंवा गाण्याची धून मन हलकेफुलके करू शकते, तितकेच ते आत्महत्येस प्रवृत्त करू शकते का, यावर संशोधकांनी अभ्यास केला. अमेरिकेपर्यंत ग्लुमी सण्डे गाण्याच्या धूनने आत्महत्या झाल्याची आवई उठली होती. या गाण्याच्या बदनामीचा परिणाम इतका झाला, की ते लिहिणाऱ्या गीतकारालाही शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारावा लागला. अर्थात विज्ञानाधिष्ठित बीबीसी रेडिओनेही अंधश्रद्धेतून या गाण्याच्या प्रसारणाच्या साऱ्या यंत्रणा थांबविण्याचा गमतीशीर प्रकार केला होता. बहुतांश आत्महत्या या नाझींचा अत्याचार, दुष्काळ-रोगराई आणि अमेरिकेतील मंदी उत्तर काळातील दारिद्रय़ाने झाल्याची उपरती नंतर अनेकांना झाली. दरम्यान या गाण्याची कहाणी मांडणारा एक चित्रपटही येऊन गेला आणि सध्या गाण्याची धून बऱ्यापैकी (आत्महत्या न घडविता) ऐकलीही जात आहे.

ग्लुमी सण्डेसारख्याच कित्येक धून केवळ आज कित्येक दशके आपला ठसा काळावर उमटून आहेत. मॉण्टी नार्मन यांनी जेम्स बॉण्ड चित्रपटासाठी रचलेली १९६२ सालातील टय़ून आजही सर्वाच्या परिचयाची आहे, कारण सिनेमे कितीही आले, कलाकार कितीही बदलले तरी जेम्स बॉण्डच्या अवतरण्याला, त्याच्या चपखल कृत्याला दर्शविणारी धून ही मॉण्टी नॉर्मन यांच्या ऑर्केस्ट्राचीच वाजू लागते. जेम्स बॉण्ड याची ओळख जशी ही टय़ून आहे, तशीच मॉण्टी नार्मन या कलाकाराच्या आयुष्याची कारकीर्द या एकाच टय़ूनसाठीच सांगितली जाते. या टय़ूनचीही अडीच मिनिटांची कित्येक व्हर्शन आज उपलब्ध आहेत. गुड, बॅड अ‍ॅण्ड अग्ली तसेच कम सप्टेंबरच्या टय़ूनचाही बराच मोठा इतिहास आहे, आणि त्याची भारतीय व्हर्शन बरीच गमतीशीर आहेत. (त्यातले एक मराठीत ढवळ्या.. पवळ्या अशा बैलजोडीवर केले गेलेले गाणे आज अनुपलब्ध आहे.) वाद्य शिकणाऱ्या व्यक्तींपैकी आपल्याकडे बऱ्याच जणांना गिटार शिकताना ‘कर्ज’ चित्रपटातील तर बासरी शिकणाऱ्यांना ‘हिरो’ या चित्रपटातील धून वाजवणे अनिवार्य असते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत जगभरात अनेक नव्या लोकप्रिय धून तयार झाल्या आहेत. पहिल्यांदा घेता येतील यान तिअरसेन या फ्रेन्च संगीतकाराने ‘अ‍ॅमेली’ या २००२ सालच्या चित्रपटासाठी तयार केलेल्या दोन डझनांहून अधिक स्वरतुकडे. पियानो, ऑर्केडियन आणि काही वाद्यांना घेऊन तयार झालेल्या या सिनेमातील प्रत्येक धून स्वतंत्र अभ्यासावी इतकी सुंदर बनली आहे. गेल्या दोन दशकांत या संगीत तुकडय़ांची जादू कमी झाली नाही. आजही यान तिअरसेनच्या प्रभावातून अनेक सिनेमांमध्ये संगीत दिले जाते. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे ‘बर्फी’ नामक चित्रपटातील साऱ्या धून या अ‍ॅमेलीतील संगीत तुकडय़ांशी साधम्र्य सांगणाऱ्या होत्या. आजच्या यादीत त्यातल्या फक्त दोन आहेत. काऊबॉय सिनेमांची आवड असणाऱ्यांना गुड, बॅड अ‍ॅण्ड अग्ली या सिनेमातील धून माहिती असते. आपल्याकडे या धूनवर प्रसिद्ध गायक मुकेश यांचे ‘तारो मे सजके’ असे एक भन्नाट गाणे जुन्या काळात तयार झाले आहे. पण ज्यांना या धूनवरचा अलीकडचा प्रयोग ऐकायचा असेल, त्यांनी डॅनिश नॅशनल सिम्फनी ऑर्केस्ट्राने तयार केलेले व्हर्शन अनुभवावे. मूळ धूनहून उत्तम ते वठले आहे.

बॉण्ड नावाचा ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन मुलींचा बॅण्ड आहे. या चारही जणी पट्टीच्या व्हायोलिनवादक. चारही देखण्या तरुणी. गेल्या दोनेक दशकांत त्यांच्या व्हायोलिन धूून फार लोकप्रिय झाल्यात. भारतीय संगीतकारांनी त्यांची धून ढापण्याइतकी त्यांची बाहेरील जगात ख्याती होती. यादीत दिलेल्या ‘व्हिक्टरी’ या धूनवरचे हिंदूी गाणे शोधायला आपल्याला फार वेळ लागणार नाही. कोअर्स भगिनी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ यांनी मुख्य प्रवाहातील पॉप संगीतात प्रचंड नाव कमावले आहे. त्यांनी काही स्थानिक धून नव्याने रेकॉर्ड करून जगासमोर आणल्या आहेत. त्यातील ‘ओल्ड हॅग’ कमी परिचित तर ‘जॉय ऑफ लाइफ’ सर्वाधिक माहिती असलेल्या टय़ून्स आहेत. व्हायोलिन आणि आपल्याकडच्या उभ्या बासरी म्हणजेच अलगुजासारखेच टीन व्हिसल या वाद्यावर वाजणाऱ्या या टय़ून्स कुठल्याही दिवसाचा आरंभ आनंददायी करू शकेल. या धून शोधताना आणखीही अनेक सापडत जातील, हे नक्की.

म्युझिक बॉक्स

Yann Tiersen – La Valse D’Amélie

Yann Tiersen – Les deux pianos / Amélie

Gloomy sunday – Electric violinist Jo A Ram

The Good, the Bad and the Ugly – The Danish National Symphony Orchestra

Bond – Victory

The Corrs – Old Hag

viva@expressindia.com