7राम राम मंडळी! इंग्रजी उच्चारांची वेटोळी सोडवणारा सखा आज एकदम देशी भाषेत रामराम करतोय म्हणून आपण थोडंसं दचकणं स्वाभाविकच आहे. पणअसं आहे ना.. शब्दांच्या उच्चाराचं व्याकरण शोधणं तसं सोप्प असतं मात्र त्याच शब्दांच्या अर्थच्छटा, त्यामागच्या भावना शोधायला गेलं की जरा गुंतायला होतं. वर्षभराची आपली झक्कास मैत्री. हातात हात घालून उच्चारांच्या शोधात आपण फिरलो. वेगळंच रूप धारण करून वाकुल्या दाखवणारे, दोन-तीन रूपांनी गोंधळात टाकणारे, देशी परदेशी इंग्रजी उच्चार आपण हुडकून काढले. हा आपला एकत्रित प्रयत्न होता. आपण आपल्या मित्राला सहज सांगतो ना.. अरे ते अमुक ठिकाण कुठेय शोधून सांग ना! तितक्याच सहजपणे तुम्ही पाठवलेल्या शब्दांच्या उच्चारांचा ठावठिकाणा ‘सखा’ शोधत आला. हा शोध कधीच संपणारा नाही. तो अखंडच आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात, मागे सरतात.. पुन्हा किनारा गाठतात. या लाटा आपण झेलल्या. या किनाऱ्यावर उच्चारांचे शंखशिंपले शोधत फिरलो. शब्दांचा समुद्र, उच्चारांच्या लाटा तशाच मागेपुढे येणार. आपण मात्र किनाऱ्यापासून थोडं दूर होत हा खेळ अनुभवणार आहोत. वर्षभर उच्चारांचे गोळा केलेले शंखशिंपले आपल्या संग्रहात जपणार आहोत.
मुळात हा शब्दसखा कसा अवतरला? तर अज्ञानापोटी वा भीतीपायी गोंधळात टाकणारे इंग्रजी शब्दांचे अचूक उच्चार शोधावे याच हेतूने हा सखा आपल्या भेटीला आला. तरुण वाचकांसोबतच सर्वच वयोगटातील वाचकांनी या सख्याशी मैत्री केली ही आनंदाची गोष्ट. आता मैत्री म्हटली की, कौतुकाची थाप आली तसे कान पिरगळणारे खडे बोलदेखील आले. आपल्या अनेक वाचकांकडून अशी अपेक्षा व्यक्त झाली की, उच्चारांसोबतच शब्दांचे व्याकरण यावे किंवा काही ज्येष्ठ वाचक मित्रांनी त्यांच्या काळातील देशी डिक्शनरीजचे संदर्भ देत त्या शब्दांचे उच्चार तसे यावे अशीही अपेक्षा व्यक्त केली. पण शब्दाच्या व्याकरणापेक्षा आताच्या काळात ग्लोबल जगात वावरताना सामान्यत: त्या शब्दांचा उच्चार कसा होतो वा कसा केला पाहिजे हा या सदरामागचा मूळ हेतू होता. त्यामुळे व्याकरणाच्या कठीण प्रमेयाकडे न वळता उच्चारांच्या आताच्या सोप्या पायऱ्याच सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र येणारं उत्तर अचूक असेल याची खबरदारी निश्चितच घेतली.
हा संपूर्ण अनुभव इतका छान होता. कित्ती सारे शब्द यानिमित्ताने ओठांवरून गेले. त्यांचा इतिहास, त्यांच्याशी निगडित एखादा छानसा संदर्भ सारंच आपल्याला कळलं. मुख्य म्हणजे आपलं काही चुकत होतं आणि ते आपण दुरुस्त केलं किंबहुना तसा प्रयत्न केला हा आनंदही मोठाच नाही का? सर्वच शब्दांचे उच्चार तोंडात रुळतील असंही नाही. पण फोटस नाही ही फिटस असं अडलेल्याला आपण सांगू शकतो. टोमेटो, आमंड, अनियन खरेदी करताना मूळ उच्चार कुठेतरी रुंजी घालू शकतात. रेस्तराँमध्ये गेल्यावर वा ‘बुफे’मध्ये ‘कुझिन’चा आस्वाद घेणाऱ्या एखाद्याच्या ‘सलाड’ उच्चाराला हसत ‘सॅलेड’ घोळवू शकतो.
‘शब्दसखा’ आज आपला निरोप घेत असला तरी वर्षभरातील ५१ शब्दांच्या अचूक उच्चारांतून हा सखा आपल्या अवतीभवती रेंगाळतच राहील. तुमच्या उदंड प्रतिसादासाठी, प्रोत्साहनासाठी आणि चुकांच्या दुरुस्तीसाठीही हा सखा नेहमी ऋणी राहील. असं म्हणतात saying goodbye to something can lead you to new helloअशा नव्या हॅलोच्या प्रतीक्षेत on very good and warming note ‘शब्दसखा’कडून राम राम मंडळी!

viva.loksatta@gmail.com