News Flash

आऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्टा’ग्राफ

इतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे.

सरत्या वर्षांला निरोप देताना वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. हे गेलं वर्ष कसं होतं, त्यातील उतार-चढाव याची उजळणी केली जाते. अशीच एक उजळणी यंदा सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमांची झाली. या सदराच्या शेवटच्या लेखात आपण त्याचीच दखल घेणार आहोत.

मोबाइल फोन आणि त्यावरील असंख्य अ‍ॅप्स यांबद्दल नव्याने बोलण्यासारखं खरं तर काहीच नाही, त्यामुळे थेट मुद्दय़ावरच येऊ. गेल्या वर्षभरात तुमच्या हातातील मोबाइल आणि त्यावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, ट्विटर या सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये गेल्या वर्षभरात झालेले मूलभूत बदल लक्षात घेतले असतील तर एक बाब प्रामुख्याने आढळेल, की यांच्या लुकमध्ये कमालीचे बदल होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या अ‍ॅप्सनी आपल्याला उपभोक्ता म्हणून कमालीची चटक लावली. आपण कुठे जातो, काय खातो, काय करतोय याची बित्तंबातमी मित्र, नातेवाईक, बहुतेकदा अनोळख्या व्यक्तींना पोहोचविण्याचं मोठं काम या अ‍ॅप्सनी केलं. त्या बदल्यात त्यांनी आपल्याकडून कोणताच मोबदला घेतला नाही. हळूहळू ही अ‍ॅप्स आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनू लागली. याचा फायदा करून घेत, आपल्या उत्पादनाची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कंपनीला अ‍ॅप्सकडे काही रक्कम फी म्हणून द्यावी लागते. त्यानुसार हे अ‍ॅप्स कंपनीच्या योग्य ग्राहकवर्गापर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवतात. अर्थात आज अचानक आपण अ‍ॅप्सचं अर्थकारण या विषयावर बोलायचं कारण म्हणजे नुकतंच इन्स्टाग्राम कंपनीने त्यांचा वर्षभराच्या कामाचा आढावा घेतला. त्यातून लक्षात आलेली बाब म्हणजे, सध्याच्या घडीला तब्बल २५ कोटी कंपन्या यात स्वतंत्र व्यावसायिक, छोटे उद्योजक, ब्लॉगर्स आले. यांनी आपापल्या कंपनीच्या जाहिरातीसाठी इन्स्टाग्राम अ‍ॅपची निवड केली. भविष्यात ही गुंतवणूक नक्कीच वाढणार आहे आणि २०१९ पर्यंत सुमारे १९ कोटी डॉलर्सची गुंतवणूक इन्स्टाग्रामवर करण्यात येईल, अशी आशा या कंपनीने केली आहे. यामध्ये फॅशन क्षेत्राचा भाग नक्कीच महत्त्वाचा आहे. इन्स्टाग्राममुळे अनेक आंतरराष्ट्रीय तसेच लोकल डिझायनर्स, कारागीर, ब्रँड यांना आपली कलेक्शन्स लोकांपर्यंत आकर्षक स्वरूपात पोहोचविण्याचं आयतं साधन मिळालं.

असं काय खास आहे इन्स्टाग्राममध्ये? हे त्याच्या स्वरूपावरून लक्षात येईल. इतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे. तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्याने किंवा नवीन नावाने याचं सभासदत्व मिळतं. गंमत त्यानंतर सुरू होते. मुळात हे अ‍ॅप आहे ते तुमचे फोटो किंवा छोटे व्हिडीयो टाकण्यासाठी. तुमचा फोटो  उठून दिसावा यासाठी वेगवेगळे फिल्टर, एडिटिंग पद्धती यात दिलेल्या आहेत. त्यामुळे उत्पादकाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास, सुंदर पद्धतीत आपल्या उत्पादनाचा फोटो, त्याखाली निवडक शब्दांत त्याचं वर्णन टाकण्याची सोय त्याला उपलब्ध होते. अर्थात एखादी वस्तू दिसायला आकर्षक असली, की त्याची मागणी आपसूकच वाढते, हा बाजाराचा साधा नियम आपल्याला ठाऊक आहेच. तसंच काहीसं याच्या बाबतीत होतं; पण फक्त हाच मुद्दा पुरेसा नाही. कारण ही सोय फेसबुकमध्येही आहे. उलट फेसबुक, पिंटरेस्टमध्ये इन्स्टाग्रामच्या तुलनेत अधिक आकर्षक, मोठे फोटो टाकता येतात. ट्विटर त्याबाबतीत थोडंसं मागे पडतं; पण त्यानंतरची प्रक्रियासुद्धा इन्स्टाग्राम ग्राहक आणि विक्रेत्यासाठी सोपी करतो. इन्स्टाग्राममध्ये नोंदणी झाल्यावर तुमच्या वॉलवर कुठच्या पोस्ट हव्यात यासाठी तुम्हाला फारसे त्रास घ्यावे लागत नाहीत. फे सबुकवर तुमची फ्रेंड लिस्ट मोठी असावी लागते. वेगवेगळ्या कंपन्यांचे पेज लाइक केल्यावर त्यांनी टाकलेल्या पोस्ट आपल्याला दिसतात.तुम्ही #ऋं२ँ्रल्ल हा एक शब्द शोधला, की या शब्दाशी निगडित असंख्य पोस्ट तुमच्या वॉलवर लगेच दिसतात. त्यातील तुम्हाला आवडणारी तुम्ही लाइक करू शकता. यानंतर तुमची निवड तपासून तुमचा देश, वय, जीवनशैली या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाऊन तुम्हाला साजेशा पोस्ट वॉलवर येतात. या दरम्यान तुम्ही काही मित्र जमवता, त्यांच्याही पोस्ट तुमच्या भिंतीवर दिसू लागतात. कंपन्यांना याचा थेट फायदा होतो, कारण इन्स्टाग्रामवर तुमच्या संभाव्य ग्राहकांची यादी वाढते. ग्राहकाने आपले पेज शोधून आपल्याला लाइक केल्यावर त्याला आपल्याबद्दल माहिती देण्याऐवजी इन्स्टाग्राम थेट ग्राहकासमोर उत्पादनाची यादी सादर करतो. ग्राहक त्यातून आपल्या पसंतीची कंपनी निवडतो. त्यामुळे विक्रेता थेट ग्राहकाच्या मोबाइलमध्ये शिरतो. गेल्या काही दिवसांमध्ये इन्स्टाग्राम वापरत असाल, तर एक गोष्ट आवर्जून दिसेल. मोबाइलच्या कोणत्याही अ‍ॅपवरून तुम्ही एखादी गोष्ट शोधली असेल तर तिची इन्स्टाग्रामवर सतत जाहिरात तुमच्यासमोर येते. उदाहरणार्थ, तुम्ही गुगलवर जाऊन एखाद्या मोबाइलची फक्त माहिती घेतली असेल, तरी दुसऱ्या क्षणापासून तो मोबाइल मॉडेल, त्याचं कव्हर, हेडफोन किंवा इतर अ‍ॅक्सेसरी, त्या मोबाइलने इतरांनी काढलेले फोटो अशा वेगवेगळ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर येऊ  लागतात. आपल्याला हा योगायोग वाटतो; पण आपल्या मनात कुठे तरी त्या मोबाइलबद्दल विचार कायम ठेवण्याचं काम या जाहिराती सहज करतात. विशेष म्हणजे थेट विक्रेत्याऐवजी ब्लॉगर, फोटोग्राफरच्या वॉलवर कलात्मक पद्धतीने या जाहिराती रुजविल्याने त्या जाहिराती असल्याची तीव्रता कमी होते. इन्स्टाग्रामवरील फोटो हे लहान स्वरूपाचे असतात, त्यामुळे एखाद्याने कंपनीचं पेज तपासायचं ठरवलं, तरी त्यातील हजारो फोटो काही क्षणात समोर येतात. फेसबुकवर ही प्रक्रिया लांबते.

आता मुद्दा येतो, फॅशन आणि इन्स्टाग्रामचा. तर फॅशन क्षेत्रात कपडे, शूज, दागिने, बॅग ग्राहकाला आकर्षक पद्धतीने सादर करणं, हा उद्योगाचा महत्त्वाचा पाया असतो. त्यासाठी महागडे फोटोशूट ते रॅम्प शोपर्यंत सगळ्या पद्धती वापरल्या जातात. इन्स्टाग्रामवर हे फोटोशूट, फॅशन शो सहज अपलोड करता येतात. त्यात ड्रेसवरील बारीक नक्षीकाम, प्रिंटिंग यांचेही छान फोटो टाकता येतात. अगदी लोकल, छोटय़ा उद्योजकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, घरच्या घरी मोबाइलवर काढलेला एखादा फोटोही थोडय़ाअधिक प्रमाणात दुरुस्त करून इन्स्टाग्रामवर टाकता येतो. इन्स्टाग्रामवर योग्य हॅशटॅग वापरून आपल्या उत्पादनाची सहज जाहिरात करता येते. मेकअप ब्लॉगर्स, स्टायलिश यांच्या प्रसिद्धीचा वापर करून मेकअप कंपन्या, डिझायनर्स, ब्रँड त्यांच्या फोटो, व्हिडीयोमधून स्वत:चं उत्पादन लोकांसमोर आणतात. टीव्ही, सिनेमा कलाकारांइतकेच ब्लॉगर्स, यूटय़ूबर्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये वाढते आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशा वेळी त्याच्या एखाद्या फोटोशूट किंवा व्हिडीयोमध्ये त्यांनी वापरलेला ड्रेस, मेकअप साहित्य साहजिकच त्यांचे चाहतेही वापरू लागतात. तसंच इन्स्टाग्रामवर एकदा एखादा ड्रेस शोधला, की त्या स्वरूपाचे ड्रेस बनविणाऱ्या इतर कंपन्या, त्यांचे फोटो आपसूक आपल्या वॉलवर येतात. यातून एखादा अपरिचित ब्रँडसुद्धा आपल्या नजरेत येतो. नव्या उद्योगांना या पद्धतीचा उपयोग होतो. साहजिकच विक्रेते इन्स्टाग्रामच्या जाहिरातीसाठी पैसे खर्च करायला तयार होतात. त्यामुळे येत्या वर्षांत इन्स्टाग्राम फक्त सहलीचे फोटो टाकण्याचं ठिकाण राहणार नसून त्याचा मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवस्थितपणे वापर करण्यास कंपन्या सुरुवात करणार आहेत. त्यामुळे तुम्ही ग्राहक असाल, तर यानिमित्ताने मोठी बाजारपेठ तुमच्या हातात येईल आणि विक्रेते असाल, तर ही बाजारपेठ तुम्हाला खुणावू लागेल.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 12:36 am

Web Title: social media uses instagram social media
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : टायटन
2 Watchलेले काही : लेखक जाणून घेताना!
3 व्हायरलची साथ : जागतिक ‘बुद्धिबळ’ स्पर्धा
Just Now!
X