News Flash

अतरंगी  ‘किश’

मेक-अप, अ‍ॅक्सेसरीज आणि एकूण सादरीकरण यातदेखील अतरंगी किश दिसू शकतं.

कुणी रंगीबेरंगी फुलाफुलांच्या ड्रेसवर विचित्र प्रिंट्सची हॅट घालतं तेव्हा किंवा वेगवेगळ्या स्टाइलची भेळ करून एखादा ड्रेस शिवला जातो. निवडुंगापासून, घुबड, सापापर्यंत काहीही प्रिंट्स म्हणून कपडय़ांवर उमटतं तेव्हा त्या व्यक्तीला आणि तिच्या फॅशन सेन्सला अतरंगी ठरवलं जातं. पण अशी विचित्र फॅशन जाणूनबुजून करणारे आहेत. त्या विचित्रपणामधून ते काही सांगू इच्छितात, अशा फॅशनला किश फॅशन म्हटलं जातं. किश फॅशनला सध्या अमूर्त कलेसारखं महत्त्व येतंय.

फॅशन ही कला आहे. फॅशनचे रंग, डिझाइन, पॅटर्न्स आपल्याला भुरळ घालतात, पण कधी कधी कुठलीशी अतरंगी फॅशन हिट होते, त्यामागचं कारणच उमगत नाही. सामान्यांसाठी ती फॅशन म्हणजे केवळ फॅड असतं, कारण त्यात लौकिकार्थानं काहीच सुंदर नसतं. असतं ते सगळं विचित्रच, बटबटीत किंवा भडक. तरीही ती फॅशन खुणावते हे खरं. ती फॅशन थोडी बंडखोर वाटते हेही खरं. कुणी रंगीबेरंगी फुलाफुलांच्या ड्रेसवर विचित्र प्रिंट्सची हॅट घालतं तेव्हा किंवा वेगवेगळ्या स्टाइलची भेळ करून एखादा ड्रेस शिवला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला फॅशन सेन्स नाही असं आपण म्हणतो. पण अशी विचित्र फॅशन जाणूनबुजून करणारे आहेत. त्या विचित्रपणामधून ते काही सांगू इच्छितात, अशा फॅशनला किश फॅशन म्हटलं जातं. वॉल्ट डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर्सवरचे कपडे आठवून बघा. त्याच्यावरची कपडय़ांची फॅशन खूप गाजली. पोल्का डॉटचा टाय, चट्टेरी पट्टेरी पँट, बटणंही भली मोठी होती. ती ‘किश फॅशन’ म्हणून फॅशन जगतात रुजू झाली. किश हा मूळच्या जर्मन शब्दावरून आलेला शब्द. किश फॅशनची जाणीव झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. वरकरणी विचित्र वाटणारी ही अतरंगी फॅशन सध्याच्या फॅशन जगतात मात्र मान्य झालेली आहे. अमूर्त कलेसारखं महत्त्व त्याला आता येतंय.

किश फॅशन केवळ कपडय़ांवरच नाही तर घराच्या इंटीरिअरमध्ये-उशांच्या आभऱ्यांपासून, पडदे, टेबलक्लॉथपर्यंत किश फॅशन दिसू शकते. किशची फॅशन कृत्रिम मानली जाते तरी ती कलात्मक असू शकते. कोणत्याही प्रस्थापित कला परंपरेला न जुमानणारी ही फॅशन असते. किश डिझाइन कुठलं तर-गावोगावच्या ट्रकवरचं डिझाइनदेखील किशचं उदाहरण असू शकतं. ‘होर्न ओके प्लीज’मधल्या त्या फुला फुलांच्या भरगच्च डिझाइनमधून कुठल्या डिझायनरला कला दिसू शकते. किश फॅशन स्टाइलमध्ये रंगांची अगदी तशीच सरमिसळ झालेली असते. फंकी कलर, भरगच्च प्रिंट्स ‘किश’मध्ये मोडतात. प्रिंट्ससाठी ठरावीक शोभिवंत प्रतिमांचा वापर न करता काही वेगळ्या प्रतिमा मुद्दाम वापरल्या जातात. उदाहरणार्थ एका डिझायनरने ड्रेसच्या बॉर्डरला निवडुंगाची चित्रं लावली होती. नेहमीच्या वेलबुट्टीच्या बॉर्डरपेक्षा ती निश्चितच हटके दिसत होती. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘मॅडनेस’ नावाचं एक कलेक्शन सादर झालं. ते या किश फॅशनचं चांगलं उदाहरण होतं. ‘क्वर्क बॉक्स’च्या वतीने हा किश फॅशनचा फंडा ‘मॅडनेस’च्या रूपाने कपडय़ांवर आणला. ‘क्वर्कबॉक्स’चे डिझायनरद्वयी जयेश सचदेव आणि रिक्सी भाटिया सांगतात, ‘वस्तू, जागा, उत्सवी प्रतीकं, माणसांचे हावभाव यांची व्हिज्युअल्स डिझाइन म्हणून वापरली. मॅडनेस हे कलेक्शनचं नाव मुद्दामच ठेवलं. मॅडनेस आमच्या आत भिनलेला आहे. कलात्मक वेड आहे ते. खरा मॅडनेस हा क्रिएटिव्ह इंटेलिजन्सशिवाय येऊच  शकत नाही. आम्ही कधीच ‘ऑर्डिनरी’वर विश्वास ठेवला नाही तर जादू आणि फॅन्टसीवर ठेवला. रिअ‍ॅलिटी आणि फिक्शन यांच्यामध्ये असणारा सततचा संघर्ष या कलेक्शनमधून दाखवायचा प्रयत्न केला.’

किश फॅशन केवळ कपडय़ांपुरती मर्यादित नाही. मेक-अप, अ‍ॅक्सेसरीज आणि एकूण सादरीकरण यातदेखील अतरंगी किश दिसू शकतं. कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या राय बच्चनने जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यावर बरीच चर्चाही झाली. काही दिवसांपूर्वी मायली सायरसने फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोतला तिचा एक अतरंगी अवतार गाजला. तिची हेअर स्टाइल तीन रंगांची मिळून केलेली होती. किश फॅशनमध्ये वेगळेपणा असतो. तो लक्ष वेधून घेणारा असतो. पण ही फॅशन सगळ्यांना झेपणारी नाही. अशी अतरंगी फॅशन कॅरी करायला खूप आत्मविश्वास लागतो. आता ही फॅशन हॉलीवूडकडून आपल्या सेलेब्रिटीजपर्यंत पोचतेय. आपल्याकडचे सामान्यजन सेलेब्रिटींची फॅशन कॉपी करतात. तशी किश फॅशनही आता कॉमन होतेय. पण कॉमन झालेली फॅशन सगळ्यांनाच शोभेल असं नाही. शेवटी किश हा जाणूनबुजून केलेला वेडेपणा. तो करायला थोडी बंडखोरी आणि बरीच हिंमत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 4:58 am

Web Title: various clothes fashion
Next Stories
1 प्रदर्शनीय खरेदी
2 कॅफे टिप्सेरिया : मिशन साफसफाई
3 हटके होम डेकॉर
Just Now!
X