25 March 2019

News Flash

फॅशनदार : नववधूची तयारी

साडय़ांपेक्षा काही तरी वेगळा पेहराव करण्याची संधी जास्त मिळते.

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग असतो. फक्तं लग्न नाही तर त्या सोहळ्य़ाशी निगडित प्रत्येक समारंभही तितकाच महत्त्वाचा असतो. या सोहळ्य़ातील प्रत्येक समारंभात आपण सर्वात सुंदर दिसणे हे जणू त्या भावी नवऱ्या मुलीच्या अजेंडय़ावरच असते. अशा वेळेस तिला वेगवेगळ्या पारंपरिक अथवा फ्यूजन किंवा फॅशनच्या भाषेत म्हणायचं झालं तर इंडो-वेस्टर्नपद्धतीचे कपडे घालायला आणि नटायला भरपूर वाव असतो. मागच्या लेखात आपण आपल्या एका महत्त्वाच्या पेहरावाबद्दल म्हणजेच साडय़ांबद्दला विस्ताराने बोललो. त्याचप्रमाणे आजही आपण या लग्नकार्यातील इतर पेहरावावर विशेष नजर टाकूयात; त्याचबरोबर अशा वेळेस उपयोगी पडणाऱ्या इतर छोटय़ा छोटय़ा पण महत्वाच्या टिप्सबद्दलही जाणून घेऊयात..

सध्या आपल्या लग्नकार्यात मेंदी, संगीत, कॉकटेल्स यांसारख्या समारंभांची भर पडल्यामुळे पूर्ण लग्नसोहळ्यात एक वेगळाच उत्साह असतो. या समारंभांमध्ये नाच, गाणे, काही छोटे गमतीदार गेम्स अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे साडय़ांपेक्षा काही तरी वेगळा पेहराव करण्याची संधी जास्त मिळते; म्हणूनच भावी वधू इंडोवेस्टर्न गाऊन्स, अनारकली, घागरे अशा कपडय़ांना जास्त प्राधान्य देतात.

आपण या वर्षांच्या सुरुवातीला ‘फॅशनची बाराखडी’ या लेखात वाचल्याप्रमाणे लेमन यल्लो, लवेंडर, आयव्हरी स्काय ब्लू, पिस्ता ग्रीन इत्यादी पेस्टल रंगाचे ‘ए’ लाइन सिल्हाऊट्समधील जास्तीत जास्त घेराचे गाउन्स या वर्षी ट्रेंडमध्ये असतील. ‘ए’ लाइन सिल्हाऊटमधील अम्ब्रेला घेर असलेल्या घागऱ्याचा फायदा म्हणजे ते दिसायला अतिशय बहारदार आणि लक्षवेधक असतात. जास्त घेर असल्यामुळे नवरीमुलगी अधिकच ‘ग्रेसफुल’ दिसते. शिवाय सुटसुटीत असल्यामुळे ऊठबस करताना किंवा चालताना अजिबात पायात अडकत नाहीत आणि संगीत कार्यक्रमात नाचताना गिरकी घेतल्यावर तिचा घागरा आणखीनच उठून दिसतो. याव्यतिरिक्त या वर्षीच्या ‘सरफेस ऑर्नमेंटेशन टेक्निक’च्या ट्रेंड्सप्रमाणे लेअर्ड किंवा रफल्ड घागरा, गाउन्स, फुल लेन्थ अनारकली विशेष लक्षवेधी ठरतील. सध्या घागऱ्याच्या रंगाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज/ चोली आणि दुपट्टा खूप प्रसिद्ध झालं आहे. तसेच कॉन्ट्रास्ट पेस्टल्समध्ये शेडेड घागराही तेवढय़ाच ट्रेण्डमध्ये आहे. अजून वेगळी फॅशन बघायची झाली तर त्यांच्या जोडीला केप स्टाइल ब्लाऊज, स्टिच्ड दुपाट्टा, अँकल लेन्थ रोबसच पण जरा हटके दिसतील. ब्लाऊज किंवा चोलीसाठी रुंद आणि मागून खोल गळ्याची फॅशन नेहमीच छान दिसते. याच्या व्यतिरिक्त एक इंडोवेस्टर्न स्टाईल म्हणून लाँग स्कर्ट्स, घागऱ्याबरोबर शर्ट स्टील ब्लाईज, बंद गला, क्रॅप टॉप्स या प्रकारच्या पेहरावांठी हलक्या वजनाचे टय़ुल नेट, फ्लोरल प्रिंटेड शिफॉन, लेसी नेट्स, शिमर इत्यादी कपडे उत्तम असतात. सध्या कमरेला, दुपट्टय़ाला किंवा मागच्या गळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, लटकन वापरले जातात. यांचा वापर भावी वधूंनी नक्की करावा. या पेहरावांसाठी कॉपर पॉलिश्ड, व्हाइट स्टोनचे इमिटेशनचे दागिने खूप सुंदर दिसतात. हे दागिने इंडो वेस्टर्न कपडय़ांवरही तितकेच शोभून दिसतात.

लग्नातील कार्यक्रमांसाठीच्या पेहरावाव्यतिरिक्त अजून काही जास्तीचे २ ते ३ थोडे कॉटन सिल्कचे, इतर सेमी फेस्टिव्ह कापडाचे पटियाला कुर्ता, चुडीदार कुर्ता, पलाझो कुर्ता, छानशी एखादी शिफॉनची साडी इत्यादी कपडे बनवून ठेवावे. हे कपडे लग्नाआधी किंवा लग्नानंतर अचानक कुठे नातेवाईकांकडे जाताना, देवदर्शनाला अथवा घरातीलच एखाद्या छोटय़ाशा कार्यक्रमात घालायला उपयुक्त ठरतात. लग्नसोहळ्यात लागणाऱ्या या सर्व कपडय़ांच्या अथवा पेहरावांच्या या संचाला आपण ‘ब्रायडल ट्रसो’ असं म्हणू शकतो. हे सर्व कपडे पूर्ण सोहळ्यात मिरवण्यासाठी ते आधी वेळेत तुमच्या टेलरकडे शिवायला टाकणे, त्याच्या फिटिंगची ट्रायल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लग्न सोहळ्यातील सर्व दिवस धरले तर किमान सात दिवस आधी तुमचा ‘ब्रायडल ट्रसो’ ट्रायलसकट तयार पाहिजे. कारण जर अगदी आदल्या दिवसापर्यंत हे कपडय़ांचं काम लांबलं आणि फिटिंग कमी जास्त झालं तर विनाकारण ताण वाढतो. पॅकिंग व इतर महत्त्वाच्या तयारीसाठी हवा तेवढा वेळही मिळत नाही.

नववधूला लग्नात सुंदर दिसण्यासाठी तिच्या कपडय़ा-दागिन्यांबरोबर तितक्याच महत्त्वाचा असतो तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल. या दोन घटकांशिवाय आपल्याला नवरी नटली असं म्हणता येत नाही. आपल्या सर्व ब्लाऊज, इतर कपडय़ांच्या ट्रायलप्रमाणेच मेकअप आणि हेअरस्टाइलची ट्रायलपण तितकीच गरजेची असते. ती शक्यतो लग्न समारंभांच्या किमान २० ते २५ दिवस आधी झाली तर बरं असतं. त्या वेळेस आपण जे काही कपडे व दागिने घालणार असू ते सोबत नेले तर पुढचं सगळं काम सोपं होऊ न जातं. खरे सोन्याचे दागिने तिथे घेऊ न जाणं शक्य नसेल तर किमान त्याचे फोटो सोबत ठेवावेत. आपला मेकअप आणि हेअरस्टाईल ही आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि आपल्या कपडय़ांना शोभेल अशी ठेवावी. उदाहरणार्थ पारंपरिक नऊवारी साडीचा पेहराव असेल तर मेकअप जितका नैसर्गिक, कमी ग्लॉसी असेल तितका छान दिसतो; तसेच जोडीला वेगवेगळ्या प्रकारचा अंबाडा घालून आणि गजरा माळता येईल अशी हेअरस्टाईल असावी. मुख्य म्हणजे मेकअपचे थर न दिसता चेहरा स्मूथ दिसेल असा मेकअप असला पाहिजे. संगीत किंवा कॉकटेल्सला वेस्टर्न हेअरस्टाईल आणि थोडा ग्लॅमरस मेकअपचा विचार नक्की करावा. हल्ली निरनिराळे हेअर अ‍ॅक्सेसरीज बाजारात बघायला मिळतात. ते निवडताना त्याच्यासोबत तुम्ही जे कपडे व दागिने घालणार आहात त्या डिझईनला साजेसे दिसतील असे हेअर अ‍ॅक्सेसरीज निवडावे. प्रत्येक पेहरावासाठी ट्रायलमध्ये जो मेकअप आणि हेअरस्टाईल पक्की होईल त्याचे संदर्भ तुमच्याकडे घेऊन ठेवा.

आता या वर्षी होऊ  घातलेली प्रत्येक भावी नववधू  तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या सोहळ्यात सर्वात देखणं दिसण्यासाठी आणि तिच्या मित्रपरिवारात व नातेवाईकांमध्ये आपला ‘ब्रायडल लुक’ एक ‘स्टाईल स्टेटमेंट’ म्हणून कायम आठवणीत कसा लक्षात राहील यासाठी सज्ज आहे. आता वधू पूर्ण नटल्यावर आमचे नवरदेव कसे मागे राहू शकतात. त्यांनीपण नववधूच्या तोडीस तोड दिसलं पाहिजे. पुढच्या लेखात आपण आपल्या नवरदेवांनी लग्नसोहळ्यात कसा पेहराव केला पाहिजे, कसे दिसले पाहिजे याबद्दल माहिती घेऊ.

viva@expressindia.com

First Published on March 9, 2018 12:39 am

Web Title: wedding preparation bride preparation bridal beauty