सोशल मीडियावर वर्षभरात काय मोठं घमासान घडलं, काय बिघडलं याची डिजिटल गोळाबेरीज..

सोशल मीडियावर पटकन केलेलं शेअरिंग.. पुढच्याच सेकंदाला आपली पोस्ट म्हटलं तर जुनी होते आणि मागे पडते किंवा मग त्यावर जोरदार चर्चा घडते. या सोशल मीडियाचा महिमा काय वर्णावा! सोशल मीडिया सेकंद-सेकंदभराच्या अंतरानं अपडेट होत असतो. तुम्ही शेअरिंग करत असतानाच इतर अनेक मीडियावर अशाच असंख्य पोस्ट येत असतात, त्याची नवलाई आता बिलकूल उरलेली नाहीये. तो आपल्या सवयीचा एक भाग होऊन गेलाय. क्षणन्क्षण महत्त्वाचा ठरू पाहणाऱ्या आपल्या सध्याच्या एक प्रकारे डिजिटल लाइफस्टाइलमध्ये या सोशल मीडियातलं एक वर्षही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं वर्षअखेरीस त्यातील असंख्य घटनांची गोळाबेरीज करणं हेही ओघानं आलंच. म्हणून घेऊ या हा एक डिजिटल मागोवा..
आपलं सोशल मीडियाचं जग समोरच्या स्क्रीनवर – मग तो मोबाइलचा असेल, टॅब-लॅपटॉपचा असेल त्यावर एका टचसरशी एकवटलेलं आहे. ‘ग्लोबल ते लोकल’ असा सारा फील हा मीडिया देतोय. बघा, आठवतंय का, वर्षांच्या सुरुवातीची बराक ओबामांची भारतभेट फार गाजली होती. त्यावरचे जोक्स, बोचरे व्हिडीओज, व्हाइट हाऊसनं केलेलं ‘जयहिंद’चं ट्विट आणि भेटीदरम्यानच्या राजकीय-सांस्कृतिक घटना गाजल्या होत्या. पाठोपाठ पेशावरमधील शाळेवरचा दहशतवादी हल्ल्याचा नेटकर निषेध करताहेत तोच चार्ली हेब्दोच्या ऑफिसवरचा हल्ला झाला आणि तेव्हापासून वर्षभरच या ना त्या कारणानं अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुढं आला. त्याखेरीज आलिया भट, रामदास आठवले यांच्या नावावर खपवले जाणारे आणि रटाळवाण्या ‘होणार सून’च्या श्री-जान्हवीला शालजोडीतले हाणणारे जोक्स सातत्यानं काही ना काही कारणानं फॉरवर्ड होत होते.
यूटय़ूब चॅनेल ‘एआयबी’ने केलेल्या अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगचा व्हिडीओ गाजला तो वादामुळेच. यानिमित्तानं विनोदाच्या पातळीची, शेरेबाजी आणि त्याच अनुषंगानं आलेल्या ‘टीव्हीएफ’च्या ‘नो कंट्री फॉर फनी मॅन’ आणि पुढं आलेल्या ‘एआयबी पॅरेडी’ या व्हिडीओची जोरदार चर्चा झाली. मग माहोल क्रिएट झाला तो ‘वर्ल्ड कप क्रिकेट’चा. त्याच्या अपडेटसासाठी स्पेशल अ‍ॅप्स डाऊनलोड केले गेले. प्रत्येक मॅचदरम्यानच्या अ‍ॅड्स, अमिताभ बच्चनच्या कॉमेंट्रीवर होणाऱ्या पोस्ट्स, शेअरिंग आणि ‘मौका मौका’चं गाजणंही. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान सर्वाधिक ट्विट केलं गेलं होतं. त्याच वेळी ट्विटरवर पहिल्यांदा ‘जय हिंद’ हे हिंदीत लिहिलं गेलं. हा देवनागरीत लिहिलेला हॅशटॅग ग्लोबल ट्रेण्डिंग लिस्टमध्ये दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कडक शब्दांत निषेध केला गेला. पाठोपाठ अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखण्याचा निर्णय झाला. त्याचं निमित्त ठरली होती श्रेया सिंघलची याचिका. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी आक्षेपही घेतले. थोडंसं नॉस्टॅलजियात जाण्यासाठी ‘फेसबुक’च्या ‘ऑन धिस डे’ या सुविधेला अनेकांनी पसंती दिली. दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ व्हिडीओ यूटय़ूबवर भलताच गाजला. त्यानं मोठा गदारोळ उडाला होता. ‘मी काय करावं नि काय करू नये, हा सर्वस्वी माझाच निर्णय असायला हवा,’ असा आशय या व्हिडीओतून मांडला गेला. स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा होमी अडजानियाच्या हा बोल्ड व्हिडीओ व्हायरल न झाला तर नवल! ‘स्त्रियांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, त्यांचं स्वातंत्र्य यांचं प्रतिबिंब वेळोवेळी सोशल मीडियात पडलेलं दिसलं. मध्यंतरीचा सुजॉय घोषचा ‘अहल्या’ हा राधिका आपटे अभिनीत लघुपट व्हायरल झाला. ‘अनोक’ ब्रॅण्डच्या नुकत्याच ऑनलाइन रीलिज झालेल्या एका जाहिरातपटातदेखील राधिका दिसली. या व्हिडीओतून प्रेग्नसीदरम्यान स्त्रियांना मिळणारी वागणूक दाखवली गेली. असे जाहिरातपट असोत किंवा ‘निर्भया’च्या निमित्तानं तयार केलेली डॉक्युमेंटरी असो, सोशल मीडियावर या व्हिडीओच्या निमित्तानं मोठं वैचारिक वादळच उठलं होतं. तसंच व्हायरल झालं कर्नाटकमधल्या इंदुजा पिल्लईचं ‘मॅरेज प्रोफाइल’. तिनं स्वत:ची वेबसाइट बनवून त्यावर स्वत:चं ‘मेट्रोमोनियल प्रोफाइल’ अपलोड केलं. आय अ‍ॅम नॉट अ परफेक्ट मॅरेज मटेरिअल असं सांगणारी इंदुजा अनेकींना तिच्या धीट, स्पष्ट मतांमुळे आपलीशी वाटली. अलीकडंच शबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना असणारी प्रवेशबंदी आणि त्यामागच्या पाळीच्या कारणाचा असंख्य नेटकरांनी कडाडून विरोध केला. त्याविरोधात दिल्लीच्या तरुणीनं ‘हॅप्पी टू ब्लीड’ अशी ऑनलाइन मोहीम सुरू केली होती. त्यावरही दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली.
तांत्रिकदृष्टय़ा सोशल मीडिया अपडेट होत राहिला हे ट्विटर्स हार्ट आणि पोल्स, व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंग, फेसबुकवर डिसलाइक ऑप्शन, हाइकचे नवनवे इमोजीज यातून सिद्ध होत राहिलं. ‘बेस्ट सेल्फी’ पोस्ट करण्यासाठीच्या कोर्सच्या घोषणेपासून ते आजोबांच्या मृतदेहासोबत सेल्फी काढण्याच्या ‘सेल्फिशनेस’पणापर्यंत.. सेल्फीच्या वेडापायी जीव गमावण्याच्या घटनांवर भाष्य करण्यातही नेटकरांनी सजगता दाखवली. काही टॉपिक्स आणि व्यक्तीही दीर्घकाळ सोशल मीडियावर या ना त्या कारणांनी गाजत राहिलेल्या दिसल्या. ‘बाहुबली’त शेवटी ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ हा कळीचा प्रश्न उरलाच. सीरियातल्या निर्वासितांचा प्रश्न, मीट बॅन, पाणीबाणी, मिशन मंगळ, नॅशनल डेटा एन्क्रिप्शन, शांताबाई गाणं, पॅरिसवरचा हल्ला, मोदी सरकारची वर्षपूर्ती, सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणाचे अपडेट्स, आमिर खानचा असहिष्णुतेचा मुद्दा, झकेरबर्गचं मुलीला पत्र, ‘बाजीराव-मस्तानी’वरचा वाद आदी अनेक मुद्दय़ांचा सोशल मीडियावर सविस्तर ऊहापोह झाला.
वर्षांच्या सुरुवातीस चर्चेला आलेला अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुतेचा मुद्दा अनेक साहित्यिक-विचारवंत, कलाकारांनी अजूनही उचलून धरलेला दिसतोय. अनेक घटना घडण्यापूर्वीच त्यांच्याविषयी सोशल मीडियावर चर्चा होणं, त्या झाल्यावरही त्यावर प्रतिक्रिया, व्यक्त होणं हा मार्ग नेटकरांनी अवलंबलेला दिसला. मग अशा वेळी हे सगळं कशासाठी केलं जातंय, हाही प्रश्न नेटकरांनी विचारलाच. आधुनिक सोयींमुळं मिळणारी झटपट प्रसिद्धी, आपल्या शेअरिंगवर होणाऱ्या लाइक्सचा हव्यास, स्पीडी लाइफचं रिफेक्लेक्शन, सखोल विचारशक्तीचा अभाव आणि समुदायाचा प्रभाव हे मुद्दे सध्याच्या सोशल मीडियावर प्रभावी ठरताहेत. सोशल मीडियाचं हे सो कॉल्ड व्यसन दूर करायला पुन्हा आणखी अँप्स डेव्हलप होताहेत. ही भविष्यातल्या सोशल मीडियातल्या वाटचालीची नांदी तर नाही..
हा लेख लिहिता लिहिता, तो छापून येऊन तुम्ही वाचेपर्यंत अनेक अपडेट्स तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचले असतील. या माध्यमाची ताकद ओळखून त्याचा सशक्तपणे नि सकारात्मक पद्धतीने वापर करायला आपण अजूनही शिकू शकतोय. नेटकरांनी ही डिजिटलगिरी लवकरात लवकर अमलात आणण्याचा संकल्प नवीन वर्षांच्या निमित्तानं सोडायलाच हवा. सो, गेट सेट गो..
viva.loksatta@gmail.com