मितेश जोशी

चौसष्ट कला व चौसष्ट विद्यांचा अधिपती गजानन सर्वाचाच लाडका आहे. दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, अशा त्या मंगलमूर्तीला घडवणाऱ्या मूर्तिकारांची संख्यादेखील दरवर्षी वाढते आहे, मात्र तरुण मूर्तिकारांची संख्या यात लक्षणीय आहे. अशाच काही निवडक तरुण मंगल ‘मूर्ती’कारांशी संवाद साधून ते याकडे छंद म्हणून पाहतात की फक्त व्यवसाय म्हणून करतात की आणखी काही हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

नवरात्रीचा उत्सव संपला की पुढच्या वर्षीच्या गणेशमूर्तीच्या कामाची नांदी होते. अक्षय्यतृतीयेच्या आसपास कामाला वेग येतो. पावसाळा सुरू झाला की मूर्तिकारांच्या कारखान्यात एक वेगळंच चैतन्य, एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. आणि गणेशोत्सवाच्या शेवटच्या दहा दिवसांत तर एकच धावपळ असते. रात्रीचा दिवस करून त्याच जोशात काम करणारे मूर्तिकार मूर्तीत जीव ओतून काम करतात. गणेशोत्सव काळात घरात अनुभवायला मिळणारं चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा ही खरं तर याच मूर्तिकारांमुळे अनुभवायला मिळते. शहरी भागात हल्ली अनेक तरुण मूर्तिकार नोकरीधंदा सांभाळून वर्षांतील काही महिने मूर्तिकामासाठी देत आहेत. यातील बरेच मूर्तिकार वडिलोपार्जित चालत आलेली मूर्तिकामाची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ठाण्यातील मूर्तिकार समीर नागावकरने रहेजामधून कमर्शियल आर्टिस्टची पदवी घेतली आहे. त्याचे बाबा मूर्तिकार आहेत. त्याच्या वडिलांना त्याच्या आईचा भक्कम पाठिंबा होता. जो पाठिंबा आता समीर आपल्या बाबांना देतो आहे. समीर खोपोलीच्या इमॅजिकामध्ये पेंटिंग पर्यवेक्षक आहे. त्यामुळे त्याने त्याचा कारखाना ऑफिसच्या समोरच थाटला आहे. सकाळी १० ते ६ ऑफिसमध्ये काम करून संध्याकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत समीर मूर्तिकाम करतो. समीरचे बाबा पहिल्यापासूनच शाडू मातीची मूर्ती तयार करायचे. म्हणून आता समीरदेखील शाडूचेच गणपती तयार करतो. शाडूची एक मंगलमूर्ती तयार करायला ३६ तासांचा अवधी लागतो. एवढय़ा ३६ तासात पीओपीच्या किमान आठ मूर्ती सहज तयार होतात. परंतु समीरने तसं कधीच केलं नाही. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा घेतलेला वसा तो उत्तमरीत्या सांभाळतोय.

समीर म्हणतो, ‘शाडूच्या गणेशमूर्ती वजनाला जड, सांभाळायला कठीण आणि त्यात खूप महाग असतात. सत्तर टक्के जनता या वरील तीन कारणांमुळे शाडूच्या गणेशमूर्ती विकत घेत नाहीत. पीओपीच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि स्वस्त असल्याने ते त्याच मूर्त्यांचा स्वीकार करतात. माझ्या कारखान्यात येणाऱ्या ग्राहकांची तरुण मुलं आज त्यांच्याजवळ शाडूच्या मूर्तीसाठी हट्ट करताना दिसतात. त्यामुळे भविष्यात ही भावी पिढी पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करतील यात शंका नाही.’ नोकरी सांभाळून समीर आपली कला व पारंपरिक ठेव जपत असल्याने यंदाच्या वर्षी त्याने केवळ ५० मूर्त्यां बनवल्या आहेत. मूर्तीमधील डोळ्यांची ठेवण हे समीरच्या मूर्तीचं वैशिष्टय़ आहे.

पारंपरिक गणपतीच्या मूर्तीऐवजी हटके गणपतीच्या मूर्तीसाठी मागणी अधिक आहे. वरळीत राहणाऱ्या विशाल शिंदे या तरुण मूर्तिकाराचे गणपती तरुणवर्गात भलतेच प्रसिद्ध आहेत. समाजमाध्यमात वाऱ्यासारखे फिरणारे विशालचे गणपती चित्ताकर्षक आहेत. विशालने जे. जे. मधून मूर्तिकलेचं शिक्षण घेतलं. विशालचे वडील मूर्तिकार आहेत. वयाच्या आठ वर्षांपासूनच तो वडिलांना मूर्तिकामात मदत करत असे. लहानपणापासूनच त्याला गणेशमूर्तीमध्ये वेगळेपण आणायचं होतं. त्याने आतापर्यंत कैक बालमूर्ती घडवल्या आहेत. विशालच्या गणपतीत एक गोंडस व निरागसपणा ठासून भरलेला दिसतो. कधी त्याच्या गणपतीचा गाल वासरू चाटतो, कधी पार्वती आई लहानग्या गणूला आंघोळ घालते, कधी गणपती मोदकाला कवटाळून बसतो, अशा नानाविध कल्पनांवर आधारित गणेशमूर्ती तो घडवतो. ‘गजमुखी विनायक’ म्हणजेच गणपतीला हत्तीचं मुख लावण्यात आलं ही कथा डोळ्यांसमोर ठेवून त्याने हत्तीच्या त्वचेसारखे मुख असलेल्या मंगलमूर्तीदेखील घडवल्या आहेत. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आणि दागिने हे त्याच्या मूर्तीचं वैशिष्टय़ आहे. हुबेहूब वाटावेत असे दागिने तो घडवतो. यंदाच्या वर्षी विशालच्या २५० गणेशमूर्ती विकल्या गेल्या. त्यातल्या काही महाराष्ट्राबाहेर तर काही थायलंडपर्यंत गेल्या. भविष्यात विशालला स्वत:चा कारखाना थाटायचा आहे.

‘गो ग्रीन बाप्पा’ ही अनोखी संकल्पना सध्या ठाणे शहरात चांगलीच चर्चेत आहे. ही संकल्पना ठाण्याच्या सोनाली कुंभारची आहे. सासरी मूर्तिकलेची परंपरा असलेली, सोनाली इनडोअर झाडं पुरवते. माती, शेणखत, बी-बियाणे याची ती दररोज देवाणघेवाण करत असते. यातूनच तिला एक हटके संकल्पना सुचली. लाल माती, कागदाचा लगदा व शेणखत याच्या साहाय्याने गणेशमूर्ती तयार करून विकण्याची.. या संकल्पनेला तिने ‘गो ग्रीन बाप्पा’ हे नाव दिलं. यंदाचं हे पहिलंच वर्ष असून सोनालीला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. तिला तिच्या या कामात दिराची साथ लाभली आहे. गणेशमूर्तीसोबत सोनाली एक जास्वंदाचं किंवा बेलाचं झाड ग्राहकांना भेट देणार आहे. या मूर्तीचं तुम्ही कुंडीत विसर्जन करा आणि त्यावर भेट दिलेल्या झाडांचं वृक्षारोपण करा, अशी त्यामागची तिची कल्पना आहे. जो कोणी हे झाड कुंडीत लावून जगवील त्याला पुढल्या वर्षी मंगलमूर्तीत दहा टक्के सूटदेखील सोनालीने देऊ केली आहे.

मूर्तिकलेचं बीज हे लहानपणापासूनच शरीरात रुजवावं लागतं. प्रयत्नांचं व अनुभवांचं खतपाणी एकदा घातलं की त्याचा डेरेदार वृक्ष तयार व्हायला वेळ लागत नाही. लालबागच्या किरण शिंदेचं काहीसं असंच झालं. लहानपणापासूनच किरणला गणेशमूर्तीची एक विलक्षण ओढ होती. किरण शाळेत न जाता दिवसदिवस गणेश कारखान्याच्या बाहेर उभा असे. मूर्तिकाराची बोटं, त्याच्या डोळ्यांतली कल्पकता व त्याच्या बोटातून साकारला जाणार विनायक न्याहाळत बसणे हा लहानपणी किरणचा छंद होता. हा छंद सर्वप्रथम त्याने पिठाच्या कणकेवर उतरवायला सुरुवात केली. परंतु त्याला दुसऱ्या दिवशी बुरशी लागत असे. मग त्याच्या आईनेच किरणला कारखान्यात न्यायला सुरुवात केली. हातात माती आली म्हटल्यावर त्याला आकाश ठेंगण झालं. तेव्हापासूनच तो ओबडधोबड मूर्ती तयार करू लागला. सध्या किरण अनेक मंडळांच्या सजावटीसाठी मिनिएचर गणपती साकारतोय. केवळ तीनच ऑर्डरचे गणपती तो स्वीकारतो. मुहूर्त व शास्त्राचा आधार घेत तो गणपती घडवतो. गणपतीच्या मुख्य तीन चक्रांमध्ये तो यंत्रांची त्या त्या मुहूर्तावर स्थापना करतो. किरणच्या गणेशमूर्ती व त्यावरील दागिने हे हुबेहूब असल्याचा भास होतो. दागिन्यांसाठी तो डेरीमिल्क कॅडबरीच्या सोनेरी कागदांचा वापर करतो. किरणने आयटी इंजिनीयिरग पूर्ण केले असून बीडी सोमाणीमधून फॅशन डिझायनिंगही केले आहे. याव्यतिरिक्त तो पौराणिक मालिके साठी संशोधन लेखनदेखील करतो. ‘खरे कौशल्य या मिनिएचर मूर्तीमध्येच पणाला लागते. मोठे नजरेत भरणारे असते असे म्हणतात, पण या मिनिएचर गणपतींचा अनुभव सांगतो की लहान मूर्तीतील बारकावे नजर खिळवून ठेवतात,’ असे तो म्हणतो.

गणेशमूर्तीकडे बघताना सर्वप्रथम नजरेत भरतात मूर्तीचे डोळे. मूर्ती सजीव असल्याचा भास हे डोळेच निर्माण करतात. जे कलाकार उत्तम डोळे काढतात त्यांना मार्केटमध्ये मागणी अधिक असते. पूर्वी मूर्ती हाताने घडवल्या जात. आता त्याची जागा साच्यांनी घेतली आहे. रंग देण्यासाठीही मशीन्स आहेत. पण मूर्तीचे डोळे कोरण्यासाठी अद्याप कोणतेच मशीन किंवा साचा नाही. त्याला आजही मानवी स्पर्श आणि कलेवरची श्रद्धा लागते. सिद्धेश सकपाळ या तरुणाची देखील या कलेवर अशीच जिवापाड श्रद्धा आहे. सिद्धेशसाठी मूर्तिकाम ही आधी कला तर आता उपजीविकेचे साधन झालं आहे. सिद्धेशला डोळे रंगवण्यासाठी मूर्तिकार विशेष बोलावून घेतात. मूर्तीत दृष्टी व एक प्रकारे जिवंत भाव आणण्याचं काम तो करतो. सिद्धेश घरगुती गणपतीच्या डोळ्यांचं गुपित उलगडताना सांगतो, ‘मोठय़ा गणपतींची नजर किंचित खाली आणि छोटय़ा गणपतींची नजर किंचित वर असते. घरातला गणपती कुठूनही बघा आपल्याकडेच पाहतोय असे वाटते. कारण, घरातल्या गणपतीची नजर सरळ रेषेत नजरेला नजर भिडवणारी असते. गणेशमूर्तीचे डोळे रंगवणे हे खूपच जबाबदारीचे काम आहे, असे तो म्हणतो. त्याच्यासाठी हे काम म्हणजे कलेची साधना आहे. प्रत्येक मंगलमूर्तीच्या डोळ्यांची सुंदरता आणि मोहकता वेगळी असते. मूर्तीकडे पाहून लोकांना समाधान आणि शांत वाटले पाहिजे, असे त्याला वाटते.

एकंदरीतच पूर्वापार चालत आलेला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न असेल किंवा केवळ मूर्तिकलेची आवड म्हणून असेल त्यात आपला काही वेगळेपणा देत या गणेशमूर्ती साकारण्याचे काम या तरुण पिढीतील हे अवलिया मूर्तिकार करताना दिसतात.

viva@expressindia.com