लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp मध्ये सातत्याने नवनवे फीचर्स अपडेट होत असतात. आता व्हॉट्स अ‍ॅपने आपल्या ‘व्हाटस अ‍ॅप फॉर बिझनेस’ या बिझनेस अ‍ॅप्लिकेशनमध्येही एक नवं फिचर दिलं आहे. ‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’वर युजर्सना नवीन ‘कॅटलॉग’ फीचर पाहायला मिळेल. हे फीचर म्हणजे छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांसाठी एकप्रकारे खास भेट म्हटलं जातंय. यात आता ‘प्रोडक्ट कॅटलॉग’ची सुविधा देण्यात आली आहे.

नव्या कॅटलॉग फीचरद्वारे व्यापारी आपल्या उत्पादनाची माहिती व भावफलक प्रसिद्ध करू शकणार आहेत. हे कॅटलॉग्स फीचर मोबाइल स्टोअरप्रमाणे काम करेल. यात संबंधीत प्रॉडक्टचे नाव, याचे विवरण, फोटो आणि मूल्यासह माहिती देता येणार आहे. उत्पादनाचा कोड, फोटो, किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर या सारखी आवश्यक माहिती व्यापाऱ्यांना जोडता येईल. संबंधीत प्रोडक्टबाबत अधिक माहिती देणारी लिंक किंवा सवलत प्रदान करणारा प्रोमो कोडदेखील टाकता येणार आहे.

अनेक व्यापाऱ्यांकडून या फीचरचं स्वागत केलं जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सुलभ असल्यामुळे कुणीही याला अगदी सहजपणे वापरू शकतो. “या फिचरच्या माध्यमातून कुणीही व्यावसायिक आपल्या ग्राहकासोबत अधिक उत्तम प्रकारे कनेक्ट होऊ शकतो. या फीचरमुळे केवळ तुमची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचणार असं नाही, तर ग्राहकांची आवड जाणून घेण्यास देखील मदत होईल”, असं व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकने म्हटलंय.