केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

‘मेकिंग इंडिया’ या केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आरोग्य सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘परिपूर्ण रुग्णालय’ ही संकल्पना सरकार राबवत असून या योजनेला बळकटी देणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
कोची येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नड्डा यांनी असे सांगितले. भविष्यात लहान शहरांमधील आरोग्याशी निगडित पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ‘परिपूर्ण रुग्णालया’च्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांच्या निगडित असलेल्या विविध समस्यांचेही निराकरण करण्यात येणार आहे. रुग्णांमधील रोगप्रतिकारकशक्ती वृद्धिंगत होण्याबरोबरच, आवश्यक सेवांबाबतचा समन्वय, रुग्णांची सुरक्षा, रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न यावर भर देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे रुग्णांसोबत त्यांची काळजी घेणाऱ्यांचाही अतिरिक्त ताण कमी होणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
भारताची आरोग्य व्यवस्थेत झपाटय़ाने सुधारणा होत आहे. २०१७ पर्यंत खासगी आणि सरकारी क्षेत्रात साधारण १६० दक्षलक्ष रुपयांची गुंतवणूकही होत असून यामुळे आरोग्य पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे, अशी माहितीही नड्डा यांनी दिली.
रुग्णालयांकडून जवळपास ६८ टक्के गुंतवणूक फार्मा आणि विविध आरोग्यविषयक साधनांमध्ये केली जात आहे. या रुग्णालयांपैकी ३३ टक्के रुग्णालये महानगरांमध्ये आहेत. त्यामुळे लहान शहरांमधील आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा होणे गरजेचे आहे. येत्या दोन वर्षांत अत्याधुनिक आणि आधुनिक रुग्णालयांमुळे आरोग्य पर्यटन क्षेत्रातील गुतंवणूक आपले निश्चित लक्ष्य पूर्ण करेल. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातूनही आरोग्य सेवा पर्यटन सेवेला चालना देताना भारताची ओळख जागतिक आरोग्य केंद्र अशी करण्याकडे आपला भर आहे, असे नड्डा यांनी सांगितले.