दिवसातील जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग आणि गेम खेळण्यात घालवणाऱया किशोरवयीन मुलांना उच्च रक्तदाबाचा किंवा स्थूलतेचा त्रास होऊ शकतो, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मैदानावरील खेळांपेक्षा घरात बसून इंटरनेटवर विविध गेम खेळणाऱ्या मुलांसाठी या संशोधनातील निष्कर्ष धोक्यांची घंटाच आहे.
साधारणपणे आठवड्यातील १४ तास इंटरनेटवर घालवणाऱ्या मुलां-मुलींना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसून आले. एकूण १३४ मुलांचे या संशोधनासाठी निरीक्षण करण्यात आले. ही सर्व किशोरवयीन मुले इंटरनेटचा सर्वाधिक वापर करणारी होती. यापैकी २६ जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसून आले. इंटरनेटचा वापर आणि त्याचा किशोरवयीन मुलांच्या तब्येतीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करणारे हे कदाचित पहिलेच संशोधन असावे. त्याचबरोबर इंटरनेटच्या वापराचा शरीरावर परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यातून मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. स्कूल नर्सिंग या जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
इंटरनेटचा वापर हा आता प्रत्येकाचा जीवनशैलीचा भाग बनला आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत त्याचा आहारी जाण्यात अर्थ नाही. आम्ही संशोधनामध्ये ज्या मुलांचा समावेश केला होता. ते आठवड्यातील २५ तास इंटरनेटवर घालवत होते, असे पब्लिक हेल्थ सायन्सच्या हेन्री फोर्ड विभागाचे संशोधक अॅण्ड्री कॅसिडी-बश्रो यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2015 4:37 pm