15 August 2020

News Flash

‘ती’ झटतेय पुरणपोळी आणि मोदक सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी

आयटी गर्लचा नऊवारीतील ठसका

ती आयटीमध्ये नोकरी करणारी गलेलठ्ठ पगार असलेली तरुणी…अनेक वर्षं परदेशातही राहिली…पण महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे घरात होणारे पदार्थ तिला स्वस्थ बसू देईनात. बाहेर देशात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर चायनीज, पंजाबी, इटालियन असे वाटेल ते पदार्थ खाण्यापेक्षा माझ्या मातीत होणारे, घरची चव देतील असे पदार्थ मी देशात आणि परदेशात का पोहोचवू नयेत या गोष्टीने ती अस्वस्थ झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक दिवस तिने आयटीतील सुखाची नोकरी सोडविण्याचे ठरवले आणि बँगलोरमध्ये ‘पुर्णब्रह्म’ नावाचे हॉटेल सुरु केले. मराठी माणसाकडे स्वयंपाकातील इतकी चांगली कला आणि परंपरा असताना ते पदार्थ अमराठी माणसांपर्यंत आणि परदेशात का पोहोचू नयेत या एकाच ध्येयाने तिचा प्रवास सुरु झालाय. या जिद्दी महिलेचं नाव आहे जयंती कठाळे.

स्वयंपाकाची उपजत असणारी आवड, मराठी खाद्यसंस्कृती पोहचविण्याची धडपड हे जपत असतानाच महिलांनी व्यवसायात यावे. त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी जयंती विशेष प्रयत्नशील आहेत. येत्या काळात ५ हजार नवीन शाखा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. परदेशातील मराठी माणसाला आपल्या देशाची कमी भासू नये म्हणून त्याला अगदी गरम तूप, भात आणि मेतकूट मिळावे यासाठी त्या अक्षरश: दिवस रात्र एक करत आहेत. गर्भवती स्त्रियांना आपल्या हॉटेलमध्ये आल्यावर खुर्चीत बसण्यास आराम वाटावा यासाठी विशेष खुर्च्या तयार करण्यात आल्यात. इतकेच नाही तर परदेशात सहज मिळू शकत नाहीत असे अळीवाचे लाडूही याठिकाणी मिळतात.

हॉटेलमध्ये आल्यावर लहान मुले खाण्यासाठी त्रास देतात. त्यांच्यासाठी पौष्टीक आणि तरीही वेगळ्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ पूर्णब्रह्ममध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये त्यांना आपला पती प्रणव याच्याबरोबरच खंबीर साथ आहे त्यांचा मित्र मनिष शिरसाओ आणि वृषाली शिरसाओ यांची. विशेष म्हणजे आपले हॉटेल चालविण्यापासून ते देशातील आणि परदेशातील महिलांना पूर्णब्रह्मच्या शाखा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना सगळीकडे त्या फक्त नऊवारी नेसून फिरत आहेत. आता आधी फॉर्मल शर्ट आणि पँट घालणारी महिला मागच्या ६ वर्षांपासून अचानक सतत नऊवारीमध्ये कशी राहू शकते, तेही या काळात. असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या लहान मुलांपासून ते मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या बदलामध्ये मोलाचा वाटा आहे.

जयंती आपल्या या सगळ्या उपक्रमाबाबत बोलताना सांगतात, महिला एखादी गोष्ट ठरवते तेव्हा ती स्वत:ला सिद्ध करुन दाखवते. तिचे अवकाश आता विस्तारले आहे. चूल आणि मूल हे करतानाच ती आणखीही अनेक गोष्टींना गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मला मिळत असलेला पाठिंबा खूप मोठा असतो. स्त्रीला सक्षम करायचे असेल तर तिच्या पाठिमागे नाही तर तिच्या साथीला उभे राहण्याची आवश्यकता आहे. तिच्यावर विश्वास ठेऊन आपण तिच्या सोबत आहोत हा विश्वास द्यावा लागेल. आपला वेगळा ट्रेंड सेट करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच पुरणपोळी चुलीवरुन हॉटेलच्या ताटात येऊ शकेल असा आत्मविश्वासही जयंतींच्या बोलण्यातून जाणवतो. आपल्या मराठी पदार्थांना ओळख मिळायला हवी ही तमाम मराठीजनांच्या डोक्यात असलेली गोष्ट माझ्याकडून प्रत्यक्षात घडली इतकंच. या सर्व प्रवासात मला अनेकांची साथ गरजेची असून आपले मराठी पदार्थ प्रसिद्ध करण्यासाठी मिळून प्रयत्न करुयात असे त्या अतिशय उत्साहाने सांगतात.

 

sayali.patwardhan@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2018 1:35 pm

Web Title: jayanti kathale purnabrahma marathi maharashtra food women empowerment womens day special
Next Stories
1 Women’s day 2018 : मी तीच महिला आहे !
2 Women’s day 2018 : रिअल इस्टेटमध्येही तिचाच डंका
3 Happy International Women’s Day 2018 : ‘लेडी डॉन’ नाही, लेडी बॉसच! कारण की…
Just Now!
X