21 January 2019

News Flash

जाणून घ्या रमजानच्या महिन्याचे महत्त्व

साधारणपणे जून महिन्यात असणारा रमजान यंदा बराच लवकर आला आहे. यंदा ईद १६ जून रोजी आहे.

संग्रहित छायाचित्र

रमझानचा हा इस्लाममधील सर्वात पवित्र महिना आजपासून सुरु होत असून तो मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण मानला जातो. कॅलेंडरनुसार हा वर्षाचा नववा महिना असतो. यामध्ये मुस्लिम बांधव महिनाभर रोजाचे उपवास करतात. या काळात चांगल्या गोष्टी करुन वाईट गोष्टी करु नये असे म्हटले जाते. ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. मात्र रमजान का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व काय, इतिहास काय, यंदाच्या तारखा आणि वेळा याबाबतची माहिती घेऊया…

यंदा १७ तारखेच्या पहाटे ३.३३ मिनिटांनी सहेरी असून इफ्तार सायंकाळी ६.५७ मिनिटांनी आहे. रोजा करणारे मुस्लिम लोक पहाटे आणि सायंकाळी या दोनच वेळेस खातात. अनेक जण तर मधल्या काळात पाणीही पित नाहीत. खजूर, सुकामेवा, शेवया, दूध यांबरोबरच चिकन, अंडी यांसारखे पदार्थ या काळात प्रामुख्याने खाल्ले जातात. कधी रमजान २५ दिवसांचा येतो तर कधी ३० दिवसांचा. साधारणपणे जून महिन्यात असणारा रमजान यंदा बराच लवकर आला आहे. यंदा ईद १६ जून रोजी असून ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. तसेच महिनाभराचे उपवास या दिवशी संपतात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन गोडधोड पदार्थ खात हे उपवास सोडतात.

पवित्र कुराणचे या महिन्यात अवतरण झाल्याने या दिवसाला आणि महिन्यालाही धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात जास्तीत जास्त सत्कृत्य करावे असे म्हटले जाते. आपल्याला ते जमत नसेल तर दुसरे करत असलेल्या चांगल्या कामात सहभागी व्हावे असेही म्हटले जाते. रमजान महिन्यातले शेवटचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या १० दिवसांत अल्लाहच्या कृपांचा वर्षाव होतो. रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केले जातात. सलग ३० दिवसांच्या उपवासामध्ये साधारणपणे १२ तासांसाठी अन्नपाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्याचे पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे आणि शेवटचे १० दिवस कुराण पठणासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी राहा असाच आहे.

First Published on May 16, 2018 8:33 pm

Web Title: ramadan 2018 date time in india history importance of ramadan festival