Ghee Making At Home Easy Steps: साजूक तुपाच्या सेवनाने अनेक मोठे आजार टळतात असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. पण अलीकडे पैसे कमावण्याच्या स्पर्धेत अगदी महागड्या साजूक तुपातही भेसळ करून विकले जाण्याचे प्रमाण अधिक आहे. आता नवरात्री संपताच तुम्ही सुद्धा दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागाल, अशावेळी तूप बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवण्याचा तुमचा विचार असेल तर आज आपण त्यासाठी खूप फायदेशीर टिप्स पाहणार आहोत. साधारण किलोभर तूप बनवायचं म्हटलं तरी त्यासाठी एक दोन आठवडे दुधाची साय साठवून ठेवावी लागते. साहजिकच दुसऱ्या- तिसऱ्या दिवसापासून या दुधाच्या सायीला बुरशी लागून दुर्गंधी लागू शकते. विशेष म्हणजे काही वेळा तर फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा सायीला बुरशी लागण्याची शक्यता असते. अशावेळी काय केल्याने हे बुरशी लागण्याचे प्रमाण कमी होईल व फ्रीजमध्ये पसरणारी दुर्गंधी सुद्धा संपून जाईल हे आज आपण पाहणार आहोत.
१ किलो तुपासाठी साय साठवताना, बुरशी लागू नये म्हणून काय करावे?
१) सर्वात प्रथम तुम्ही साय साठवण्यासाठी कोणतं भांडं वापरताय हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. शक्य असल्यास अन्य पदार्थ बनवण्या किंवा ठेवण्यासाठी न वापरलेलं भांडं वापरावं. कारण कितीही स्वच्छ केलं तरी काही प्रमाणात भांड्यांमध्ये बॅक्टेरिया राहूनच जातो. शिवाय प्लॅस्टिकचा डब्बा वापरणं तर टाळाच. तुम्ही काच किंवा चिनी मातीच्या भांड्याचा वापर करू शकता यामुळे बुरशीची वाढ होत नाही आणि दुर्गंधीही येत नाही.
२) नुसती साय ठेवल्यास त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे दरदिवशी या सायीमध्ये वाढ करताना त्यात थोडं दूधही टाका. नंतर हे दुध सायीमध्ये मिसळून जाईल पण तुम्ही तूप कढवायला घेईपर्यंत दुर्गंधी येण्याची शक्यता कमी होईल.
३) साय फ्रीजरमध्ये साठवून ठेवा जेणेकरून बुरशी किंवा फंगस लागण्याची शक्यता कमी होते, तूप कढवण्याआधी हा डब्बा काही वेळ बाहेर काढून ठेवला तरी गोठलेली साय पुन्हा मूळ रूपात येईल.
४) साय गरम ठिकाणी किंवा किचनमध्ये उघड्यावर अजिबातच ठेवू नका. गरम ठिकाणी फंगस वाढण्याचे प्रमाण जास्त असते.
५) इतकं करूनही जर सायीमध्ये काही प्रमाणात आंबटपणा किंवा कडवटपणा आलाच असेल तर तूप कढवताना विड्याचे पान किंवा सुपारी/तुळशीचे पान भांड्यात टाका, यामुळे दुर्गंध निघून जातो.
हे ही वाचा<< दिवसातून एकदा जेवून करताय उपवास? वजन कमी करण्याचे प्रयत्न आरोग्यावर काय परिणाम करतात, पाहा
या किचन टिप्स तुम्हीही वापरून पाहा व त्याचा कसा फायदा होतोय हे कमेंट करून कळवायला विसरू नका.