Morning Habits: सकाळचा नाश्ता हा दिवसाच्या सुरूवातीचा प्रमुख आहार असतो. तुम्ही सकाळी काय आहार घेता यावर तुमच्या उर्वरित दिवसाचा प्लॅन ठरतो. त्यामुळे तुमची ऊर्जा, लक्ष केंद्रित करणे, मूड आणि अगदी पचन देखील प्रभावित होते. जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केले नसेल, तर तुम्हाला सकाळी मध्यरात्री थकवा, पोट फुगणे किंवा काहीतरी खाण्याची इच्छा होऊ शकते. काहीतरी आहारात गडबड झाली तर त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो. तुम्हाला अगदी साध्या वाटणाऱ्या सवयीसुद्धा या दिवसभराच्या अस्वस्थतेला कारणीभूत असू शकतात.
आहारतज्ज्ञ सांगतात की, सकाळच्या काही सवयी तुमच्या शरीराची लय बिघडवू शकतात. सवयी वाईट नसल्या तरी वेळ महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आरोग्यदायी वाटत असलेल्या या सवयी पाळत असाल तर हे नक्की वाचा…
सकाळी भरपूर पाणी पिणे
हायड्रेटिंग चांगले असले तरी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाण्याचा अतिरेक करण्याबाबत आहारतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, सकाळी सकाळी ते पिणे टाळावे. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तीन ते चार ग्लास पाणी तुम्ही पिता, तेव्हा रात्री तुमच्या पोटात जमा झालेले सर्व गॅस्ट्रिक अॅसिड बाहेर काढत असता. ते अॅसिड अन्नाचे विघटन करते. ते जास्त प्रमाणात पातळ झाल्याने तुमची पचनक्रिया थांबते आणि परिणामी तु्म्ही नाश्ता करण्यापूर्वीच तुमचे पोट फुगते. त्याऐवजी सकाळी उठल्यावर फक्त एक ग्लास पाणी पिण्याचा आणि नंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
सकाळी फळांचा रस पिणे
फळे हे अनेक पोषक तत्वांचे ताजे स्त्रोत मानले जातात. म्हणूनच केळी, आंबा, बेरी किंवा संत्र्यापासून बनलेले फळांचे रस अतिशय लोकप्रिय आहेत. मात्र आहारतज्ज्ञांनी या आरोग्यदायी सवयीला आव्हान दिले आहे. फळांचा रस तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतो. फळांचे मिश्रण केल्यावर साखरेचे शोषण कमी करण्यासाठी बनवलेल्या फायबरचे तुकडे होतात. त्याशिवाय नैसर्गिक साखर तुमच्या रक्तप्रवाहात जलद वाहते. तुम्हाला सुमारे एक तास अद्भूत वाटते मात्र नंतर तुमची ऊर्जा कमी होते असे आहारतज्ज्ञ सांगतात.
रिकाम्या पोटी धावणे
दिवसाची सुरूवात जोमाने व्यायामाने केल्याने तुमच्या शरीराची क्रिया चांगली होते आणि कधीकधी लोक सकाळी लवकर रिकाम्या पोटी धावतात. पण तुमच्या तणाव संप्रेरकांनाच वाढवते आणि फिटनेसमुळे मिळणाऱ्या परिणामांमध्ये अडथळा ठरू शकते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढते. हे हार्मोन्स व्यायामाला दहापट अवघड बनवतात.
जेवणापूर्वी कॉफी
सकाळी उठल्यावर येणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी वगैरे आवर्जून प्यायले जाते. मात्र, रिकाम्या पोटी कॉफी पिणे तुमच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करू शकते. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. कॅफिनमुळे तुमच्या पोटात आम्ल वाढते. तेव्हा कॉफी पिण्यापूर्वी काही ड्रायफ्रुट्स किंवा टोस्ट खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
नाश्ता वगळणे
दिवसातून एक जेवण किंवा अधूनमधून उपवास याव्यतिरिक्त नाश्ता पूर्णपणे सोडून देणे ही अतिशय वाईट कल्पना आहे. सकाळी तुमच्या शरीराची चयापचय क्रिया शिखरावर असते. योग्य नाश्ता केल्याने परिस्थिती संतुलित राहते आणि अनेक जण दुपारी जास्त खाल्ले जाते आणि त्यानंतर आळस येतो, जड वाटते अशी तक्रारही करतात. मात्र सकाळचा नाश्ता स्किप केल्यामुळे तुम्हाला दुपारी जास्त भूक लागते. तेव्हा सकाळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे असते.
