अवघ्या वर्षभरापूर्वी भारतात बंदी घालण्यात आलेला लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप अर्थात  TikTok आता TickTock या आपल्या नव्या रूपात येण्याची शक्यता आहे. ByteDance द्वारे दाखल केलेल्या नव्या ट्रेडमार्क अर्जानंतर देशात टिकटॉकची रिएन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. टिपस्टार मुकुल शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाईटडान्सने या महिन्याच्या सुरुवातीला कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सकडे ‘टिकटॉक’च्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला आहे. या माहितीनुसार, ६ जुलै रोजी हा ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या अ‍ॅपचं वर्णन “होस्टिंग मल्टिमीडिया एंटरटेनमेंट कॉन्टेन्ट, होस्टिंग ऑफ मल्टीमीडिया आणि इंटरॅक्टिव अ‍ॅप्लिकेशन्स” असं करण्यात आलं आहे.

कंपनीकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका ऑनलाईन रिपोर्टमध्ये बाईटडान्सच्या सूत्रांचा हवाला देत असं सांगण्यात आलं आहे कि, भारतात नवीन आयटी नियम लागू झाल्यानंतर आम्ही पुन्हा कंपनी सुरू करण्यास उत्सुक आहोत. दरम्यान, भारतात वर्षभरापूर्वी टिकटॉकवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर लगेच इन्स्टाग्राम, युट्यूब आणि स्नॅपचॅट सारख्या बर्‍याच टेक कंपन्यांनी युजर्ससाठी रील्स, शॉर्ट्स आणि स्पॉटलाईटसारखे छोटे व्हिडिओ प्लॅटफॉर्म सुरु केले आहेत.

PUBG आणि Shien चा भारतात परतण्याचा मार्ग

जुलै २०२१ च्या सुरूवातीला दक्षिण कोरियन डेव्हलपर क्राफ्टनने PUBG मोबाईलचं इंडिया स्पेसिफिक व्हर्जन म्हणून बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया लॉन्च केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ह्यावर देखील चीनी अ‍ॅप बंदीचा एक भाग म्हणून बंदी घालण्यात आली होती. Google Play वर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या प्री-रजिस्ट्रेशन्सनी तब्बल ४० मिलियनचा आकडा गाठला. तर या खेळाच्या अर्ली एक्सेस लॉन्चमध्ये तब्बल २ कोटी लोक भाग घेत आहेत. Google Play Store वर बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया ने १८ मे रोजी प्री रजिस्ट्रेशन लाईव्ह केलं होतं. यावेळी डेव्हलपर क्राफ्टन यांनी मात्र यावेळी पुन्हा नमूद केलं आहे कि, बॅटलग्राउंड्सच्या भारतातील रिएन्ट्रीसाठी कंपनीने चीनमधील टेंन्सेंटशी करार केला आहे. दरम्यान, जर टिकटॉक देशात पुन्हा येणार असेल तर कंपनीला गेल्या वर्षी बंदी घालण्यात आलेल्या सुरक्षाविषयक समस्यांवर ठोस मार्ग शोधावा लागेल.

Shein हे चीनमध्ये मुख्यालय असलेलं एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये भारत सरकारने बंदी घातली होती. हे प्लॅटफॉर्म देखील भारतात पुन्हा येणाच्या मार्गावर आहे. मात्र, यावेळी ते पूर्ण विकसित अ‍ॅप म्हणून येणार नाही. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलदरम्यान ते अ‍ॅमेझॉनचा भाग असेल. अॅमेझॉन प्राईम डे सेल २०२१ हा येत्या २६ आणि २७ जुलै या २ दिवशी असणार आहे. २६ जुलै रोजी मध्यरात्रीपासून तो सुरु होईल. दरम्यान, भारतात बंदी घातली गेल्यानंतर हे चिनी अ‍ॅप्स देशातील गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन्ही ठिकाणांहून काढून टाकण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

TikTok हे ३ अब्ज डाऊनलोड्स पूर्ण करणारं पाचव्या क्रमांकाचं नॉन-गेम अ‍ॅप

भारतात बंदी असली तरीही टिकटॉक हे जगभरात लोकप्रिय आहे. अलीकडेच जगभरात टिकटॉकच्या ३ अब्जांहूनही अधिक डाऊनलोड्सची नोंद केली गेली आहे. नवीन सेन्सर टॉवरच्या आकडेवारीनुसार, ३ अब्ज डाऊनलोड्स पूर्ण करणारं टिकटॉक हे पाचव्या क्रमांकाचं नॉन-गेम अ‍ॅप आहे. दरम्यान, जानेवारी २०१४ पासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिल्यास टिकटॉक व्यतिरिक्त ३ अब्जांहून अधिक डाउनलोड्सपर्यंत पोहोचलेल्या अॅप्समध्ये फेसबुक आणि त्याच्याच व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या अॅप्सचा समावेश आहे.