झोपेतून उठताना कर्णकर्कश गजर ऐकल्यानंतर आपल्याला अनेकदा चिडखोरपणा जाणवतो याचे कारण गाढ झोपेतून उठणे कुणालाच सुसह्य़ वाटत नसते. अशा परिस्थितीत जर सुश्राव्य असा लयबद्ध गजर लावला तर झोपेतून उठताना चिडखोरपणा होणार नाही, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. प्लॉस वन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की, बीच बॉइजची लय किंवा स्थानिक संगीतातील सुयोग्य सुरावटी गजरासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण ही सोय फक्त मोबाईलवर गजर लावला तरच करणे शक्य आहे. ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठातील संशोधनात असे दिसून आले की, सुश्राव्य गजरामुळे झोपेतून उठताना होणारा त्रास कमी होऊन व्यक्ती हळूहळू जागेपणात येते. कर्कश गजर हे झोपेच्या आरोग्यास घातक असतात त्यामुळे चिडखोरपणा वाढतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या लोकांना आपत्कालीन कामे करावी लागतात किंवा ज्यांना पहाटे किंवा मध्यरात्री कामावर जाण्यासाठी उठावे लागते ते लोक गजर लावून झोपतात, पण अशा विचित्र वेळी उठताना त्यांना खूप जड जाते त्यातच कर्णकर्कश गजराने ते चिडतात. त्यांच्यासाठी सुश्राव्य, संगीतमय गजर हा आल्हाददायक असू शकतो. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात काम करणाऱ्या अवकाशवीरांनाही त्यांच्या कामावर अशा झोपेतून उठतानाच्या चिडखोरपणाचा सामना करावा लागत असतो, असे प्रा. अड्रियन डायर यांनी म्हटले आहे. कर्णकर्कश गजर वाजल्यास मेंदूतील गोंधळ जाग येत असतानाच वाढतो. ‘बीच बॉईज’ सारख्या चांगल्या स्पंदनात्मक गजराने किंवा ‘दी क्युअर’च्या ‘क्लोज टू मी’ गजराने झोपेतून उठणे आल्हाददायक होते. बीच बॉइज ही सुरावट अमेरिकन रॉक संगीतातील असून ती १९६१ मध्ये कॅलिफोर्नियात तयार करण्यात आली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alarm to get out of bed nck
First published on: 18-02-2020 at 08:11 IST