किडनी, फुफ्फुसांसाठीही धोकादायक
वात आजार नसून ते व्याधीचे चिन्ह आहे. वाताचे शंभर प्रकार आहेत. संधिवात आणि हाडांची झिज हे यातील सर्वाधिक धोकादायक आणि वेदनादायी प्रकार आहेत. एकूण लोकसंख्येच्या एक टक्का व्यक्तींमध्ये वातविकार आढळतो. वातामुळे शरीरातील किडनीपासून फुफ्फुस व इतर अवयवांवर परिणाम होतो. यामुळे वातचिन्ह दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वाताचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त आढळते, असा सूर नुकताच विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटी आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे ‘संधिवात’ विषयावरील चर्चासत्रातून निघाला.
ज्येष्ठ संधिवाततज्ज्ञ डॉ. निमिष नानावटी (मुंबई), डॉ. योजना गोखले (मुंबई), अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित पिस्पती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. नानावटी म्हणाले, कोणत्याही ‘वातां’चे मुळापासून उच्चाटन होत नाही. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये वाताचे प्रमाण अधिक आहे. वात आजार नसला तरी त्यामुळे किडनी, हृदय, त्वचा, डोळे तसेच हाडांवर परिणाम होतो.
‘गऊट’ वात प्रकारात युरिक अ‍ॅसिड हाडांच्या सांध्यात जमा होते. त्यामुळे सांधे सुजतात. डॉ. अमित पिस्पती म्हणाले की, वातामुळे रक्ताच्या पेशींची हानी होते. सांधेदुखीच्या वेदना असह्य़ होतात. आनुवंशिकतेसोबतच पर्यावरण आणि व्यसनामुळे वात होतो.
गेल्या काही वर्षांत वाताचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. याला धूम्रपान आणि मद्यपान कारणीभूत ठरत असल्याचे डॉ. पिस्पती म्हणाले. डॉ. योजना गोखले यांनी वाताच्या रुग्णांमध्ये पन्नास टक्के रुग्ण आनुवंशिक असल्याचे सांगितले. सांधे दुखणे म्हणजे संधिवात असतोच असे नाही.
दुखण्यात सातत्य आल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हाडांची झिज झाल्यानंतर वेदना वाढतात. गुडघ्यांवर तसेच सांध्यांवर कमीत कमी ताण आणणारे व्यायाम नियमित केले, तर संधिवातावर मात करून सामान्य जीवन जगता येते, असे डॉ. गोखले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arthritis disease more in women
First published on: 16-04-2016 at 02:00 IST