आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींना पटकन नोकरी मिळते. त्यांना पदोन्नतीही पटकन मिळते आणि इतर सहका-यांच्या तुलनेतही त्यांना तीन ते चार टक्के पगार जास्त मिळतो. कमी आकर्षक व्यक्तिमत्त्वांच्या वाटेला या बाबी येत नाहीत, असा दावा संशोधकांनी केला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या कारकीर्दीत मिळणा-या यशात त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा किती वाटा असतो, या विषयावर टेक्सास विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॅनियल हॅमरमेश यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन झाले. आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीचा कंपनीला जास्त पैसे मिळवून देण्याकडे कल असतो. त्यामुळे कंपनीसाठी असे कर्मचारी बहुमोल व कष्टाळू ठरतात. आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती विरुद्धलिंगी व्यक्तीला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्याशी बोलावेसे वाटते. त्यांच्या सहवासात राहावेसे वाटते. त्यांच्याकडून अनेक सेवा घ्याव्याशा वाटतात आणि म्हणूनच अनेक कंपन्यांना अशा आकर्षक व्यक्तिमत्त्वांना आपल्या सेवेत ठेवावेसे वाटते,’ असे शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक डॅरिओ मेस्ट्रीपेरी यांचे म्हणणे आहे.
मात्र, हॅमरमेश यांच्या मते फक्त आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ते आयुष्यात यशस्वी होत नाहीत. त्याला अनेक कारणे असतात. त्यांच्या मते, आकर्षक व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असतो. त्यामुळेही कंपनीचे अधिकारी किंवा मालकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. त्यांच्या देखणेपणातून किंवा सौंदर्यातून त्यांचा स्वाभिमानही प्रतिबिंबीत होतो. अशा व्यक्तींच्या वागणुकीतही एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवतो. त्यांचा स्वाभिमानच त्यांना योग्य अशा पदावर बसवतो आणि सर्वात जास्त पगार घेणारी व्यक्तीही बनवतो, असेही हॅमरमेश यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attractive personality gives attractive salary
First published on: 22-10-2013 at 01:05 IST