भारतीय-अमेरिकी वंशाच्या वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील हार्वर्डच्या पथकाने मूलपेशींच्या मदतीने मेंदूच्या कर्करोगाचा मुकाबला केला आहे.
हार्वर्ड स्टेम सेल इन्स्टिट्यूट या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संस्थेतील वैज्ञानिक डॉ. खालिद शाह यांनी उंदरांवर प्रयोग केले असून त्यात जनुकसंस्कारित मूलपेशी वापरल्या आहेत. या पेशी कर्करोगाच्या पेशींना मारणारे विष बाहेर टाकतात त्यामुळे निरोगी पेशींना धक्का लागत नाही.
संस्कारित पेशी या विष बाहेर टाकल्यानंतर मरत नाहीत. यातील प्रमुख संशोधक डॉ. शहा हे काश्मीरचे आहेत. त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी आम्ही औषधी म्हणजे कर्करोगाच्या पेशींना मारणारे विष बाहेर टाकणाऱ्या मूलपेशी पाहिल्या, पण त्या जनुकसंस्कारित करून त्या त्यांच्याच विषाने मरणार नाहीत याची काळजी घेतली. आता या पेशी त्यांच्या विषाच्या परिणामापासून मुक्त आहेत व त्या कर्करोगविरोधी द्रव्ये बाहेर टाकतात. मेंदूतील गाठींवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये गाठीच्या ठिकाणी एका जैवविघटनशील जेलमध्ये या मूलपेशी ठेवण्यात आल्या व त्यांनी कर्करोगकारक पेशींना नष्ट केले. कर्करोगकारक विष रक्ताच्या कर्करोगातही वापरता येतात पण त्यांचा वापर घन गाठींमध्ये करता येत नव्हता व त्यांना कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहोचता येत नव्हते.
डॉ. शहा यांचे हे संशोधन म्हणजे कर्करोग उपचारातील मोठी प्रगती मानली जात आहे. हे संशोधन मूलपेशी नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.