Which is Healthier Carrot or Radish: हिवाळा सुरू झाला की बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी भाज्यांची रेलचेल वाढते. त्यातही गाजर आणि मुळा हे दोन भाजीपाला तर जणू हिवाळ्याचं ‘स्टार फूड.’ कुणी गाजराचा हलवा करतं, कुणी गाजराचं लोणचं… मुळ्याचे गरमागरम पराठे तर अनेकांच्या आवडीचे. दोन्हीही भाजीपाला पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याचं सर्वज्ञात आहे. पण, तरीही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम राहतो; शेवटी आरोग्यासाठी जास्त फायद्याचं कोण? गाजर की मुळा?
हा प्रश्न साधा वाटला तरी उत्तर मात्र तितकंसं सोपं नाही, कारण दोन्ही भाजीपाल्यांमध्ये शरीराला पोषण देणारे अत्यावश्यक घटक असतात. पण, त्यांच्या गुणधर्मांमध्ये फरक असल्याने कोणती भाजी कोणासाठी अधिक उपयुक्त आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
गाजरामध्ये दडलेलं पोषणभांडार
गाजर म्हणजे बीटा–कॅरोटीन, व्हिटॅमिन A आणि पोटॅशियमचं उत्तम साधन. याशिवाय त्यात व्हिटॅमिन K1, फायबर, B6, C आणि बायोटिनही मोठ्या प्रमाणात आढळतं, त्यामुळे गाजर खाण्याचे फायदे अफाट आहेत.
१. डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान
गाजरातील बीटा–कॅरोटीन शरीरात जाऊन व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवतं. रातांधळेपण दूर करणे, डोळे निरोगी ठेवणे यात गाजर अत्यंत उपयुक्त आहे.
२. पचनक्रिया सुधारते
गाजरामधील फायबर पचनसंस्था व्यवस्थित ठेवतं. बद्धकोष्ठतेपासून आराम देतं आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतं.
३. हृदयासाठी हितकारक
त्यात असलेले अँटीऑक्सिडेंट्स, पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब सुरळीत ठेवतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
४. वजन कमी करण्यास मदत
फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन घटण्यास मदत मिळते.
५. त्वचा व केसांसाठी उत्तम
गाजरातील अँटीऑक्सिडेंट्स त्वचेचे तेज वाढवतात, कोरडेपणा कमी करतात आणि सुरकुत्या लांब ठेवतात.
मुळ्याचे गुणधर्म – पचन आणि प्रतिकारशक्तीचा राजा
मुळ्यामध्ये व्हिटॅमिन C, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलॅट आणि भरपूर पाणी असतं. त्याशिवाय फायबर, कॅल्शियम आणि आयर्नही आढळतं.
१. पचनासाठी रामबाण
मुळ्यातील भरपूर फायबर बद्धकोष्ठता दूर करतं आणि आतड्यांची स्वच्छता राखतं.
२. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
मुळ्यातील व्हिटॅमिन C सर्दी–खोकला, संक्रमण आणि सूज यांच्याशी लढण्याची क्षमता वाढवतं.
३. शरीराला हायड्रेट ठेवतं
मुळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो.
४. हाडांना मजबुती
त्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना मजबूत ठेवतात आणि सांधेदुखीपासून बचाव करतात.
५. रक्तदाब नियंत्रित ठेवतो
पोटॅशियम रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करतं.
पण मग प्रश्न एकच, कोण जास्त फायदेशीर? गाजर की मुळा?
डोळ्यांच्या आरोग्याची समस्या असेल, व्हिटॅमिन A कमी असेल तर गाजर तुमच्यासाठी सर्वोत्तम.
पचन बिघडणं, वारंवार बद्धकोष्ठता, व्हिटॅमिन C ची कमतरता असेल, तर मुळा सर्वात उपयुक्त.
म्हणजेच दोन्ही भाजीपाल्यांचे फायदे वेगवेगळे असूनही दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. एक डोळ्यांना तेज देतो, तर दुसरा शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतो. एक रक्तदाब सुरळीत ठेवतो तर दुसरा पचनसंस्था सुधारतो.
तज्ज्ञांच्या मते “गाजर आणि मुळा दोन्हीही शरीरासाठी अमूल्य आहेत. मात्र, तुमच्या शरीराच्या गरजांनुसार त्यांच्या फायद्यांचं महत्त्व बदलतं.”
