केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
भारतीय उपचार पद्धतीनुसार असंसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि गुजरात यांसमवेत देशातील अन्य सहा राज्यांची निवड केल्याची माहिती आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी दिली.
या प्रकल्पाअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांनुसार निवडण्यात आलेल्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्य़ांमध्ये तपासणी केंद्र उभारताना मधुमेह, कर्करोग यांसारखे आजार झालेल्यांना आयुषअंतर्गत (आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) उपचार केले जाणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. या वेळी या सुविधा भारतातील पारंपरिक औषध-उपचारांतर्गत देण्यात येणार असून आजारांच्या उच्चाटनासाठी योगाचा वापर हा नियमितपणे तर आयुर्वेदिक, युनानी, सिद्धहा किंवा होमिओपॅथी यापैकी एकाचा वापर हा आजाराच्या तीव्रतेनुसार केला जाणार आहे, तर या सुविधांसोबतच दीर्घ आजारांवरही उपचार केले जाणार असून एखाद्या रुग्णांवर संबंधित आजारांवर जर उपचार करणे शक्य होणार नसेल त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसीएस) पाठविण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयाकडून ग्रामीण भागात आणि आयुषमार्फत पुरविल्या जाणाऱ्या भारतीय पारंपरिक औषधांच्या वाढत्या मागणीसाठी २ हजार ५०० कोटीची आर्थिक तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्याची विंनती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.
नाईक यांच्या मते, परदेशातून भारतीय पारंपरिक औषधांना मोठय़ा प्रमाणात मागणी असून ३० ते ३५ टक्के ‘स्पा’च्या माध्यमातून विदेशी नागरिकांना ही सेवा पुरवली जात आहे. त्याचबरोबर आयुषच्या प्रसारासाठी २० देशांमध्ये सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून प्राचीन हिंदू परंपरेनुसार विश्वभरात आयुर्वेदातून केल्या जाणाऱ्या २५ हून अधिक उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी अमेरिकेतील १५ हून अधिक संशोधकांनी भारतात येणे म्हणजेच विश्वपातळीवर आयुषच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेचे प्रमाण सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)