कॉफी नियमित घेणाऱ्या कॉफीप्रेमींसाठी आनंदाची बातमी.. दररोज एक कप कॉफी घेतल्यामुळे आयुष्यमानात वाढ होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कॉफी, हृदय व रक्तवाहिन्यांसदर्भातील आजार आणि वाढते वय यासंबंधी हे संशोधन मांडले आहे. काही वयस्कर लोकांमध्ये काही हृदयाला पुरवठा करणाऱ्या धमन्यांची पोकळी कमी होऊन दाहक प्रक्रिया घडतात आणि त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार होतात. त्यामुळे आयुष्यमान घटते आणि मृत्यूचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढतो. मात्र, कॅफेनयुक्त पदार्थ म्हणजेच कॉफी घेतल्यास ही प्रक्रिया रोखण्याबरोबरच हृदय व रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त दाब टाळता येणे शक्य आहे. त्यामुळेच कॉफी घेणे हितावह ठरते.

रक्ताचे नमुने, सर्वेक्षणातील माहिती, वैद्यकीय आणि कौटुंबिक माहिती या आधारे सहभागी झालेल्या १०० जणांची तपासणी करण्यात आली. सहभागींमध्ये अनेकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होते. चयापचय, शरीरात बिघाड करणारे पदार्थ, न्यूक्लिअस अ‍ॅसिड यांमुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि हृदयविकाराला चालना मिळते. मात्र, या सगळ्यावर कॉफी हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे कॉफीमुळे आयुष्यमानात कशी वाढ होऊ शकते हेदेखील संशोधकांनी स्पष्ट केले. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील पोकळी कमी होत गेल्यामुळे कर्करोग, अल्झायमर आणि इतरही आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)