डॉ. छाया वजा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेले बदल. पावसामुळे तापमानात झालेली घट यांमुळे श्वसनासंबंधी विकारांचे प्रमाण वाढले आहे. हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण यांमुळे श्वसनमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाटय़ाने वाढण्यास मदत होते. न्यूमोनिया आणि साधा इन्फ्लुएन्झा यांची लक्षणे बरीचशी समान असली तरी यातील फरक ओळखता आल्यास वेळीच योग्य उपचार घेण्यास मदत होईल.

न्यूमोनिया हा बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस आणि न्यूमोकोकस, व्हायरस आणि मायकोप्लाझ्मा बुरशीमुळे होतो. यामध्ये फुप्फुसांना सूज आल्याने त्या भागामध्ये कफ जमा होतो. स्पंजसारखा नरम असणारा फुप्फुसाचा बाधित हिस्सा घट्ट बनतो आणि तो श्वसनक्रियेत भाग घेऊ शकत नाही. रुग्णाला खोकला, ताप येऊ  लागतो. फुप्फुसाचा बराच भाग बाधित झाला असेल तर श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते. रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते.

प्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींमध्ये न्यूमोनिया अनेकदा साध्या उपायांनी बराही होतो. मात्र वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना न्यूमोनिया झाल्यास तो गंभीर होण्याची शक्यता वाढते. वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने तसेच लक्षणांवरून सुरुवातीच्या काळात हा आजार लक्षात येत नसल्याने काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यूही येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच या आजारावर उपचार सुरू करणे, आजार ओळखणे अतिशय गरजेचे ठरते. न्यूमोनियाचे प्रकारही आहेत त्यानुसार त्यांची लक्षणे बदलतात. पण या आजारामध्ये काही ठरावीक लक्षणे सर्वसाधारणपणे एखाद्या फ्लूसारखी असतात.

न्यूमोनियाचा संसर्ग प्रथमत: छातीत होतो. तसेच रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर येणे, तोल जाणे, मानसिक धक्का बसल्यासारखी अवस्था होते. त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर न्यूमोनियाचे परिणाम अधिक गंभीर रूप धारण करू लागतात. न्यूमोनियामुळे मेंदूज्वर (मेनिन्जायटिस), किडनी विकार, सांधेदुखी, हृदयदाह असे त्रास सुरू होतात. आधीच प्रतिकारशक्ती कमकुवत झालेल्या वृद्धांना त्यावर मात करणे अवघड होते. श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुप्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतराचे काम करतात त्या न्यूमोनियाकोकस जिवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुप्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. या द्रवामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यात कफसारखा द्रव जमून राहतो.

न्यूमोनियाची लक्षणे कोणती?

  • ताप येणे ’ थंडी वाजणे ’  खोकला येणे ’  श्वासाची गती वाढणे ’  श्वास घेताना धाप लागणे ’  छातीत आणि पोटात दुखणे ’  अशक्तपणा येणे ’  उलटय़ा

विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा. याशिवाय १२ ते ३६ तासांत रुग्णास श्वास घेण्यास अधिकाधिक अडचणी जाणवू लागतात. श्वसन अपुरे होते, कफ तीव्र होतो तसेच कफ पडतो. तापाची तीव्रता वाढते. श्वास घेणे कठीण होते आणि ओठ निळे पडतात.

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत्या वयानुसार विकसित होत असते, त्यामुळे कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी ती सक्षम नसते. म्हणूनच मुलांना एखादा आजार चटकन होण्याचा धोका अधिक  असतो. म्हणूनच लहान बाळांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे न्यूमोनिया होय. माइकोप्लाज्मा निमोनी आणि क्लेमिडोफिला निमोनी या विषाणूंमुळे न्यूमोनिया झाल्यास लहान मुलांमध्ये सामान्यत: साधी आणि हलकी लक्षणे दिसून येतात. यात बाळ  जास्त आजारी असल्यासारखे वाटत नाही; परंतु खोकला येणे, हलकासा ताप, डोकेदुखी, थकवा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा प्रकराची लक्षणे दिसल्यासही ती दुर्लक्षित करू नयेत. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावा. प्रतिजैविके (अ‍ॅन्टिबायोटिक) उपचार पद्धतीचा वापर यात केला जातो. लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाही दिसून येतो. तीव्र ताप, थंडी वाजणे, नखे किंवा ओठ निळे पडणे, छातीत घरघर होणे आणि श्वास घेण्यात अडचणी ही गंभीर लक्षणे आहेत.

लक्षणे दिसल्यास काय कराल?

न्यूमोनियामुळे आजारी पडलेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल झाल्याच्या पहिल्याच तासात उपचार सुरू केले जातात आणि विविध चाचण्या केल्या जातात. रुग्ण दाखल झाल्यानंतर विषाणूमुळे झालेल्या न्यूमोनियाची ओळख पटविण्यासाठी आवश्यक सर्व चाचण्या केल्या जातात. ज्या विषाणूमुळे न्यूमोनिया झालेला आहे, त्याची ओळख पटल्याशिवाय विशिष्ट असे उपचार डॉक्टरांना करता येत नाहीत. कृत्रिम श्वसन यंत्रणेमुळे रुग्णांना श्वास घेणे सोपे होते. ज्या रुग्णांची स्थिती नाजूक असते, त्यांनाच याची आवश्यकता भासते.

होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?

  • शरीर सतत ओले ठेवू नका. त्यामुळे ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप वेळ पाण्यात राहात असाल तर त्यानंतर संपूर्ण शरीर स्वच्छ आणि कोरडे करा आणि लगेचच कपडे बदला.
  • सर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण शरीरातील कफ वाढला की न्यूमोनियाचा त्रास बळावण्याची दाट शक्यता असते.
  • दमा किंवा अस्थमाचा त्रास असल्यास तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. न्यूमोनियामुळे होणारी गुंतागुंत टाळता येऊ  शकते. हा संसर्गातून होणारा आजार असल्याने स्वच्छतेचे पालन करा.
  • काही जीवनसत्त्वे आपल्याला नैसर्गिकपणे मिळत नाहीत. यापैकीच एक आहे जीवनसत्त्व ड जे सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला मिळत असते. शरीरात त्याची उत्पत्ती आपोआप होत नाही. त्यामुळे तुम्ही योग्य आणि पूरक आहाराचे सेवन करा.
  • आइस्क्रीम, थंड पाणी इत्यादी थंड गोष्टी टाळा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common flu pneumonia ysh
First published on: 24-11-2021 at 01:10 IST