या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचे केस हा तुमच्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आपले केस जहिरातीतील मुलामुलींसारखे छान सिल्की आणि शायनी असावेत असे प्रत्येकालाच वाटते. पण एकदा कंगवा घातला की हातात येणारे ढीगभर केस आणि कोंडा यामुळे आपण हैराण होऊन जातो. मग कोणता शाम्पू वापरलेला चांगला, कोणते तेल वापरल्याने केस दाट होतील यांसारख्या प्रश्नांनी अक्षरश: आपण बेजार होऊन जातो. मग या खराब झालेल्या केसांशी आपण आणखी चुकीचे वागतो आणि त्यांचा पोत आणखीनच खराब होतो. पाहूया कोणत्या चुकीच्या गोष्टींमुळे केस खराब होतात…

१. केसांना सतत हात लावणे
अनेकांना सतत केसांशी खेळण्याची सवय असते. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते. कोणाशीही बोलताना किंवा अगदी शांत बसलेले असतानाही अनेक जणी नकळत सातत्याने केसांशी खेळत असतात. त्यामुळे केसांचा पोत खराब होतो. सतत केसांना हात लावल्याने ते जास्त ऑईली होतात आणि चिकट दिसायला लागतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत केसांना हात लावण्याची सवय असेल तर ती पहिल्यांदा सोडून द्या.

२. केस सतत शाम्पूने धुणे
अनेकांना सारखे केस धुण्याची सवय असते. उन्हाळ्यात घाम येतो म्हणून, पावसाळ्यात ओले झाले म्हणून तर कधी कोणत्या कार्यक्रमाला जायचे म्हणून ही मंडळी सारखे केस धुतात. अनेक मुले तर जवळपास रोजच केस धुतात. अशाप्रकारे सतत केस धुतल्याने नैसर्गिकरित्या केसांमध्ये तयार होणारे तेल निघून जाते. हे नैसर्गिक तेल केसांच्या पोषणासाठी आवश्यक असते. मात्र सतत केस शाम्पूने धुतल्यास ते कोरडे होतात आणि त्याचा पोत खराब होतो.

३. खराब कंगवा वापरणे
आपल्या कंगव्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर घाण बसते. हा कंगवा वेळच्यावेळी साफ न केल्यास ती सगळी घाण केस विंचरताना नकळत आपल्या केसात जाते, ज्यामुळे केस खराब होतात. त्यामुळे कंगवा ठेवण्याची जागा स्वच्छ असायला हवी. तसेच दर काही दिवसांनी कंगवा साफ करण्याची सवय केव्हाही चांगली. दर काही महिन्यांनी कंगवा बदलावा. त्यामुळे तुमचे केस खराब होण्यापासून वाचतील.

४. सौंदर्यप्रसाधनांची निवड
आपले केस चांगले दिसावेत असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी मग केसांवर वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा मारा केला जातो. मात्र ही सौंदर्यप्रसाधने चांगल्या कंपनीची नसतील तर त्यापासून केस खराब होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणतीही उत्पादने केसांवर लावताना आधी त्याबाबत योग्य ती माहिती घेणे गरजेचे आहे. आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन योग्य तो शाम्पू, कंडिशनर, तेल यांचा वापर करणे गरजेचे आहे. विनाकारण केसांना जेल लावणे, कलर करणे केसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common mistakes done by you that making your hair greasy
First published on: 09-08-2017 at 11:30 IST