|| डॉ. योजना गोखले
ऱ्हुमॅटाइट आर्थरायटिस (आरए) हा दाहक संधिवात आहे. १०० पैकी एक व्यक्ती या विकाराने ग्रस्त असते. हा संधिवात महिलांमध्ये अधिक आढळत असला तरी पुरुष आणि लहान मुलांनाही होतो. या विकारावर वेळीच उपचार सुरू केले नाहीत, तर यामुळे सांध्यांमध्ये विकलांगता निर्माण होण्याचा धोका आहे.
सुमारे ५० वर्षापूर्वी अनेक रुग्ण ऱ्हुमॅटाइट आर्थरायटिसमुळे (आरए) व्हीलचेअर किंवा अंथरुणाला खिळत होते. कारण त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते. परंतु आता यावर प्रभावी उपचार उपलब्ध असूनही या विकाराबाबत अनेक गैरसमजुती आहेत आणि त्यामुळे रुग्ण उपचार घेण्यास तयार नसतात. योग्य औषधे सुरू केल्यास रुग्ण पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीचे उपचार मिळाल्याने निराश होण्याचीही गरज नाही, कारण ‘आरए’वर कोणत्याही टप्प्यावर उपचार होऊ शकतात.
‘आरए’ची सामान्यपणे आढळणारी लक्षणे
या विकाराच्या सुरुवातीला रुग्णाला सांधेदुखी जाणवू लागते. कोणतेही सांधे दुखू शकतात, सामान्यपणे गुडघे, बोटांचे सांधे, मनगट आणि पाऊल दुखते. थकवा जाणवतो आणि सांधे ताठर होतात. काही जणांना ठरावीक ऋतूत सांधेदुखीचा त्रास होतो. म्हणजे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सांधे दुखतात, मूठ वळताना त्रास होतो. प्रभावित सांध्याला सूज येऊ शकते, तो गरम होतो, हुळहुळा (दाबल्यानंतर वेदना) होतो आणि हालचालींवर मर्यादा येतात.
निदान कसे करावे?
‘आरए’चे निदान वैद्यकीय पद्धतीने केले जाते. म्हणजेच रुग्णाला जाणवणारी लक्षणे आणि त्याच्या सांध्याची तपासणी करून हे निदान करतात. वैद्यकीय निदानाची पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांकडून सीबीसी, ईएसआर, लघवी, आरएफ, अँटिसीसीपी आदी चाचण्या करण्यास सांगितले जाते. आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच सांध्याचा एक्स-रे काढला जातो. ‘आरए’च्या ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये आरएफ चाचणी निगेटिव्ह येते. ‘आरए’ची शंका असेल तर काही जणांमध्ये एमआरआय चाचणी उपयुक्त ठरते.
उपचार
डीसीज मॉडिफायिंग अँटी ऱ्हुमॅटिक औषधे (डीएमएआरडी), वेदनाशामक औषधे (डीएमएआरडी औषधे सुरू करेपर्यंत) यांचा वापर केला जातो, तर काही वेळा दाह निर्माण झाल्याने सांध्यामध्ये स्टिरॉइडच्या इंजेक्शनचा वापर केला जातो. सांध्यांचा दाह खूपच तीव्र असेल तर स्प्लिंट (सांध्याचे हाड स्थिर बसविण्यासाठी छोट्या लाकडी फळीचा आधार) दिला जातो. दाह कमी झाला की आजूबाजूचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम सांगितले जातात. ‘आरए’वर १९९९ पासून अनेक नवीन औषधे उपलब्ध झालेली आहेत. ही औषधे म्हणजे बायोलॉजिक्स व स्मॉल मोलेक्युल आहेत. बायोलॉजिक्स इंजेक्शनद्वारे दिली जातात, तर मोलेक्युलच्या गोळ्या असतात. या नवीन औषधांमुळे ‘आरए’च्या उपचारांमध्ये खूपच
मदत झाली आहे. हे उपचार बहुतेक रुग्णांना आयुष्यभर घ्यावे लागतात. त्यामुळे औषधांच्या मात्रांचे समायोजन तसेच औषधांचे दुष्परिणाम यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासाठी नियमितपणे डॉक्टरांना भेट देणे गरजेचे आहे. रुग्णांनी अतिप्रमाणात स्टिरॉईड्स घेऊ नयेत यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त प्रमाणात आहे.
दुर्लक्ष केल्यास…
मधुमेह नियंत्रणात नसेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो, त्याच प्रमाणे ‘आरए’च्या रुग्णांच्या सांध्यामधील दाहावर नियंत्रण आले नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. त्यामुळे ‘आरए’कडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या सांध्याचे मोठे नुकसान झाल्यास सांध्याच्या जागी कृत्रिम सांधा बसवावा लागतो. योग्य उपचार घेतल्यास हे टाळता येते. प्रत्येक सांधेदुखी म्हणजे आरए नव्हे. सांधेदुखी हे निदान नाही, लक्षणे आहे. ते आरए, ल्यूपस(त्वचाक्षय) गाउट, सोरायटिक संधिवात, चिकनगुनिया इत्यादी आजारांमध्ये दिसू शकते. संधिवाताच्या प्रकारावर दिले जाणारे उपचार अवलंबून असतात. रुग्णाने अचूक निदान आणि उपचारासांठी तज्ज्ञांना दाखवणे महत्त्वाचे आहे.