काही वनौषधी कृत्रिम पूरकांच्या स्वरूपात घेतल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात असे दिसून आले आहे. परदेशात जास्त वापरल्या जाणाऱ्या क्रॅटोम या वनौषधीच्या पूरकांनी आरोग्याची हानी होत असल्याचे पुरावे सामोरे आले आहेत. क्रॅटोम ही वनस्पती परदेशात लोकप्रिय असून तिचे वैज्ञानिक नाव मिट्रॅगना स्पेसिओसा आहे. ती कॉफी वर्गातील वनस्पती आहे. ऊर्जा वाढवणे व वेदना कमी करणे या दोन कारणास्तव आग्नेय आशियात मजूर लोक या वनस्पतीची पाने चावून खातात.  क्रॅटोमचा वापर अमेरिकेत बेकायदेशीर मानला जात नाही. लोक ऑनलाईन त्याची खरेदी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरव्या पावडरच्या स्वरूपात ही पूरक औषधी मिळते. क्रॅटोमचा अर्क सुरक्षित व नैसर्गिक मानला जातो. पण तो शरीरात गेल्यानंतर निष्क्रिय राहात नाही असे संशोधकांचे मत असून अमेरिकेत त्याचा वापर अनेक वर्षे सुरू आहे. काहीजण त्याचा वापर नैराश्यावर करतात, तर काहींना वेदना कमी करण्यात फायदा होतो. त्यात मिट्रॅग्नाइन हा ओपिऑइड पदार्थ असतो. या औषधीच्या वापरासाठी कुठलेही वैद्यकीय पुरावे नसले तरी त्याचा वापर अफूसारखा केला जातो. बुप्रेनोफाइनपेक्षा ही औषधी स्वस्त असते. न्यूयॉर्क विद्यापीठाचे विल्यम एगलस्टन यांनी याबाबत केलेल्या संशोधनानुसार याचे काही विषारी परिणाम हे ते औषध बंद केल्यानंतर दिसून येतात. जर्नल फार्माकोथेरपी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. १ जानेवारी २०११ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान लोकांनी या औषधाच्या केलेल्या वापराची माहिती घेऊन हे संशोधन करण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, चिडचिडेपणा, गोंधळणे, वांत्या, भ्रम, कोमात जाणे, हृदयविकार असे परिणाम यातून होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crotons codiaeum variegatum mpg
First published on: 14-07-2019 at 01:14 IST