Consume These 5 Foods Daily To Eliminate Ldl Cholesterol : आजकाल अनेक जण खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल रक्तात आढळणारा असा घटक आहे, जो शरीरातील निरोगी पेशींसाठी आवश्यक असतो. कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात व्हिटॅमिन डी आणि हार्मोन्स तयार होतात, ते योग्य पचनासाठी पित्त तयार करते, जे पचनक्रियेस गरजेचे असते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, एक गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील अवयवांचे सुरळीतपणे कार्य होते, तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीर आजारी पडते.
अशावेळी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी, हृदयरोग, स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे.
आहारात जास्त फॅटयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, मादक पदार्थांचे सेवन यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हे कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोगाचा धोकादेखील वाढतो. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुमचा आहार आणि जीवनशैलीत बदल केला पाहिजे. तसेच आहारात काही पदार्थांचा समावेश आवर्जून केला पाहिजे.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधतज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी परिपूर्ण सूत्र सांगितले आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ५ पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या तुमच्या नसांमध्ये जमा झालेली घाण काढून टाकतात आणि हृदयरोगाचा धोकादेखील कमी करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी कोणते ५ पदार्थ फायदेशीर ठरू शकतात जाणून घेऊ…
बॅड कोलेस्टेरॉलचा वाढता धोका, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश ( Consume These 5 Foods Daily To Reduce Ldl Cholesterol)
१) फायबरचे सेवन
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर आहारात फायबरचे सेवन करा. तुम्ही तुमच्या आहारात ओट्स, ओटमील आणि ब्राऊन राईससारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. याशिवाय सफरचंद, संत्री आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे सेवनदेखील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. हे पदार्थ नियमितपणे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते आणि नसांमधील घाण काढून टाकण्यास मदत होते.
२) ओमेगा-३ फॅटी अॅसिड
तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करावा. विशिष्ट प्रकारचे मासे जसे की सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेल. ओमेगा-३ फॅटी अॅसिड शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, यामुळे नसांमधील जळजळ कमी होते आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो.
३) अक्रोड
जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही अक्रोड खावे. अक्रोड हे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहे. हेल्दी फॅट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले अक्रोड कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतात. दररोज दोन ते तीन अक्रोड खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
४) कडधान्यांचा समावेश करा
प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेले कडधान्य जसे की मसूर, राजमा, हरभरा आणि चवळी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. या कडधान्यांमध्ये फायबर असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. दररोज वेगवेगळ्या कडधान्यांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
५) ‘या’ भाज्यांचा करा समावेश
कांदा, लसूण आणि पालक या भाज्या नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते, जे हृदय निरोगी ठेवते आणि बीपी नियंत्रित करते.