या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉशिंग्टन : ठरावीक अन्न ठरावीक वेळी खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांत हृदयविकाराचा धोका वाढतो, असा निष्कर्ष एका अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे. म्हणजेच आहाराच्या वेळांचा मधुमेहींच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे हा अभ्यास सांगतो. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ या संस्थेच्या मतानुसार मधुमेह विकारात रक्ताद्वारे शरीरातील पेशींत शर्करा पोहोचवण्याच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम होतो. रक्तशर्करेच्या प्रमाणावर इन्शुलिन नियंत्रण ठेवत असते. जर माणसाचे शरीर या इन्शुलिनला प्रतिसाद देईनासे झाले किंवा शरीरात इन्शुलिनची निर्मितीच होणे बंद झाल्यास रक्तशर्करा अनियंत्रित होते. मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकार, पक्षाघाताचाही धोका असतो. त्यामुळे आहारात बदल केल्यास मधुमेहाला प्रतिबंध करता येतो का किंवा त्याचा प्रभाव कमी करता येतो का, यावर संशोधन करण्यात आले.

मधुमेहींमधील हृदयविकारास प्रतिबंधासाठी संबंधित व्यक्ती काय खाते व केव्हा खाते, याचा अभ्यास करण्यात आला. ‘क्रोनो न्युट्रिशन’ असे या नव्या संशोधनास संबोधले जाते. यामध्ये आपल्या आहारांच्या वेळांचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला जातो. अमेरिकेतील ‘नॅशनल हेल्थ आणि न्युट्रिशन एक्झामिनेशन सव्‍‌र्हे’च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ठरावीक वेळी ठरावीक आहार घेतलेल्या मधुमेहाच्या रुग्णांत हृदयविकाराने मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून आले.

उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती बटाटय़ासारखे पदार्थ सकाळी खातात, धान्यापासून बनवलेले पदार्थ दुपारी आणि ब्रोकोलीसारख्या भाज्या किंवा पालेभाज्या व दूध संध्याकाळी घेत होत्या, त्यांच्यात हृदयविकाराने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळले. आपल्या शरीरातील चयापचयाच्या लयीनुसार आहाराच्या वेळा ठरवणे महत्त्वाचे आहे. तसेच हा आहार नेमका कोणता असावा, याचेही भान बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मधुमेह रुग्णांनी दैनंदिन आहार ठरवावा, असे या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dietary planning important diabetics patients heart disease danger grows ysh
First published on: 03-04-2022 at 00:02 IST